200 वर्षांपूर्वीचा मुंबई-पुणे प्रवास

200 वर्षांपूर्वीचा मुंबई-पुणे प्रवास

Summary

सुटीच्या दिवशी लाँग ड्राईव्‍हसाठी अनेक मुंबईकर हल्‍ली सहज एक्‍स्‍प्रेस वेवर चक्‍कर मारून येतात. अवघ्‍या तीन-चार तासांच्या या प्रवासासाठी दोनशे वर्षांपूर्वी तब्‍बल पाच दिवस लागायचे.

हर्षल भदाणे-पाटील

पनवेल : सुटीच्या दिवशी लाँग ड्राईव्‍हसाठी अनेक मुंबईकर हल्‍ली सहज एक्‍स्‍प्रेस वेवर चक्‍कर मारून येतात. अवघ्‍या तीन-चार तासांच्या या प्रवासासाठी दोनशे वर्षांपूर्वी तब्‍बल पाच दिवस लागायचे. नागमोडी वळणे, निसर्गाच्या कुशीतील हा प्रवास आज आनंददायी वाटत असला, तरी त्‍या काळीही अवर्णनीय असाच असल्‍याचे ब्रिटीश लेखिका मारिया ग्रॅहम यांनी आपल्‍या प्रवासवर्णनात लिहिले आहे.

१८०९ मध्ये मारिया भारत भ्रमंतीसाठी आल्‍या होत्‍या. या वेळी त्‍यांनी मुंबई - पुणे प्रवास केला. प्रवासातील आठवणी त्‍यांनी Journal Of A Residence In India या पुस्‍तकात नमूद केल्‍या आहेत. प्रवासादरम्‍यान त्‍यांना जवळपास दोनशे व्यक्‍ती भेटल्‍या. त्‍यांची भाषा, राहणीमान, जीवनशैली, आदरातिथ्‍य याचे सुरेख वर्णन मारिया यांनी आपल्‍या प्रवासवर्णनात केले आहे.

मुंबईहून पुण्याला निघण्यापूर्वी मारिया आणि त्‍यांच्या ब्रिटिश सहकाऱ्‍‌यांनी प्रवासादरम्‍यान लागणारे तंबू, भांडीकुंडी आणि स्वयंपाकाच्या सामानासह नोकर-चाकर, पालखीवाहक, घोडेवाले यांनाही सोबत घेतले होते. मुंबई बंदरातून पनवेल बंदरापर्यंतचा प्रवास त्‍यांनी बोटीने तीन तासांत केला. त्‍यानंतर पनवेल बंदरापासून दोन मैल अंतरावर असलेल्या एका शेतात विश्रांतीसाठी तंबू ठोकले होते. शेतालगत असलेल्‍या आंब्‍याची बाग, तलाव आणि तलावातील कमळाच्या फुलांनी मारिया यांना चांगलीच भुरळ घातली होती. त्‍या काळी पनवेल हे मुख्य बाजारपेठेचे केंद्र होते. त्‍यामुळे चोऱ्यामाऱ्या रोखण्यासाठी आणि स्‍वरक्षणासाठी छोट्या-मोठ्या प्रत्‍येक दुकानात तलवारी, भाले लटकलेले दिसायचे.

200 वर्षांपूर्वीचा मुंबई-पुणे प्रवास
केवळ महाराष्ट्रात आढळते हे झाड; 170 वर्षांपूर्वी अस्तित्वाचे पुरावे

पनवेलवरून निघाल्‍यावर मारिया आणि त्‍यांच्या सहप्रवाशांनी विश्रांतीसाठी खोपोलीची निवड केली; मात्र हा प्रवास त्‍यांना दोन टप्प्यात करावा लागला. पनवेल ते चौक हे अंतर रात्रीपर्यंत कापले गेले. घाटाचे आणि दऱ्याखोऱ्यांचे सौंदर्य मावळत्या सूर्याच्या साक्षीने पाहताना खूप मजा आल्‍याचे मारिया यांनी नमूद केले आहे. ज्‍या दिवशी त्‍यांचा ताफा चौकला पोहोचला तो दिवस बाजाराचा होता. त्‍यामुळे आजूबाजूच्या गावांतील, बंदरातील जवळपास ५०० बैलगाड्या या ठिकाणी खरेदी-विक्रीसाठी आल्‍या होत्‍या. अंधार पडल्‍यावर बाजारासाठी आलेल्या लोकांच्या पेटलेल्या चुली आणि शेकोट्यांच्या प्रकाशात परिसर न्हाऊन निघाला होता.

मारिया आणि त्‍यांच्या सहकाऱ्यांच्या दिमतीला असलेला नोकर-चाकरांचा ताफा त्‍यांची खाण्या-पिण्याची, राहण्यासाठी तंबूची व्यवस्‍था बघायचा. चौकवरून खोपोलीकडे निघताना त्‍यांच्या पालखीतील थर्मामीटर ६८ फॅरनहिट तापमान दाखवत होता. सूर्य आग ओकत असल्‍याने खोपोली येथून निघून घाट चढायला १२ मैलांच्या प्रवासाला त्‍यांना चार तास लागले. मात्र घाटातून प्रवास करताना आणि घाटाचे सौंदर्य न्याहाळताना ‘स्कॉटलंड’ येथील निसर्गरम्यतेची आठवण झाल्‍याचे मारिया यांनी आपल्या प्रवास वर्णनात लिहिले आहे.

200 वर्षांपूर्वीचा मुंबई-पुणे प्रवास
अजिंक्य पंजशीर

मोरया गोसावींच्या शिष्‍याशी संवाद

मजल दरमजल करीत १९ डिसेंबर रोजी मारिया चिंचवडला पोहोचल्‍या. या ठिकाणी त्‍यांनी देव वाड्यामध्ये ''मोरया गोसावी'' यांच्या शिष्याचे दर्शन घेतले. ब्राह्मण दुभाषाच्या मदतीने त्‍यांनी एकमेकांशी संवादही साधला. जवळपास पाच दिवसांनी म्हणजे १९ डिसेंबर रोजी मुळा-मुठा नद्यांच्या संगमावर बांधलेल्या रेसिडेंटच्या निवासस्थानी मारिया आणि त्‍यांचे सहप्रवासी पोहोचले. जो प्रवास आज अवघ्‍या तीन-चार तासांत पूर्ण होतो, त्‍या प्रवासासाठी दोनशे वर्षांपूर्वी तब्‍बल पाच दिवस लागायचे. मात्र त्‍ यावेळी हा प्रवास अविस्‍मरणीय होता आणि आजही तितकाच निसर्गरम्‍य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com