
अनिरुद्ध प्रभू
‘असद पुस्तकवाला’
इतिहासातील सार्वकालीन महान नाटककार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विल्यम शेक्सपिअरच्या नाटकांविषयी अनेक रंजक दंतकथा प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे जगभरात सगळीकडे त्या खऱ्या मानल्या जातात. शेक्सपिअर आणि त्याच्याशी घट्ट नाळ जुळलेल्या शापांची, त्या संदर्भातल्या दंतकथांची ही कहाणी!
मला वाटतं, २०१८चा नोव्हेंबर महिना असावा; वर्षात घोळ असू शकतो पण महिना नोव्हेंबरच. कारण मला तो भेटला तोच ‘इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’मध्ये - ‘इफ्फी’मध्ये, गोव्यात! आता त्याचं नाव, गाव बाकी काही आठवत नाही, पण इतकं नक्की, की तो इंग्लंडमध्ये कुठेतरी नाटकाचं शिक्षण घेत होता. भारतात पहिल्यांदाच आला होता आणि त्याची मैत्रीण सिनेमाची विद्यार्थिनी असल्यानं तिच्यासोबत तो इफ्फी बघायला आला होता.