esakal | खेळाडूंचा 'मानसिक खेळ'
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal}

खेळाडूंचा 'मानसिक खेळ'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अभिषेक सांडीकर

प्रत्येक वर्षी जगभरात अनेक क्रीडा स्पर्धा होत असतात. पण मागील काही दिवसांपासून कोरोनामुळे या स्पर्धांना ब्रेक लागला होता. नंतर 'बायोबबल' संकल्पना आल्यानंतर या स्पर्धा कोरोनाकाळातही होऊ लागल्या होत्या. पण त्यामध्ये कोरोनाची बाधा होण्याचा धोका काही प्रमाणात होताच. दुसऱ्याबाजूला अनेक खेळाडू बायोबबलमध्ये असूनही त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन हे या काळातील मोठं धाडसाचे पाऊल मानले जात आहे. गेल्या 3-4 काही महिन्यांपूर्वीही टोकियो ऑलिंपिकवर अनिश्चिततेचे सावट होते. पण शेवटी जपानने त्यांची संधी न दवडता या स्पर्धांचे आयोजन केले आहे आणि ऑलिंपिक व्यवस्थितरित्या पार पाडले जात आहे. या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूला कोरोनाचे सर्व नियम पाळून बायोबबलमध्ये राहणे बंधनकारक आहे.

जगात सध्या ऑलिंपिक स्पर्धा जी सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते ती होत असल्याने क्रीडाप्रेमीही खूश असून ते घरूनच या स्पर्धांचा आनंद घेत आहेत. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच युरोपातील प्रसिद्ध फुटबॉल स्पर्धा युरो चषक, दक्षिण अमेरिकेतील कोपा, क्रिकेटचा विचार केला तर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि विंम्बलडन स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांवरही कोरोनाचे सावट होतेच. दुर्दैवाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.

क्रीडा किंवा विविध खेळ हा आता प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनले आहेत. कारण भारतासारख्या देशाचा विचार केला तर इथं सचिन तेंडूलकर हा खेळाडू माहित नसणारा क्वचितच सापडेल. कारण भारतात मागील चार ते पाच दशकांपासून क्रिकेट हा एक प्रसिध्द खेळ म्हणून समोर आला आहे. पाश्चिमात्य देशांचा विचार केला तर तिथं फुटबॉलला लोकांची जास्त पसंती दिसते. तसेच विविध अॅथलेटिक्स गेमही तिथं प्रसिध्द आहेत. जसा देश तशी तिथली क्रीडा संस्कृती बदलत जाताना दिसते. खेळ हा आपल्याला एकमेकांशी बांधून ठेवतो. समाजात त्यामुळे समावेशकतेची आणि एकतेची भावना निर्माण होते. जर एखादा देश एका विशिष्ट क्रीडा प्रकारात सरस असेल तर त्यामुळे त्या देशाचा आदर आणि दबदबाही वाढतो. शीत युद्धादरम्यान जागतिक स्पर्धांमध्ये मोठी चुरस दिसत होती कारण त्यावेळेस जगभरात विभाजनवादी विचारसरणी बळकट होऊ पाहत होती. पण कधीकाळी या स्पर्धांनीची जगाला एकत्र ठेवल्याचेही दिसते.

आपण घरी बसून विविध स्पर्धा पाहत असतो. त्यावेळेस आपल्या मनात एकच विचार असतो की आपला देश किंवा आपण ज्या खेळाडूंना पाठिंबा देत आहोत तोच जिंकावा. पण प्रत्यक्षात स्पर्धा मैदानावर खेळल्या जात असताना त्या खेळाडूच्या मनात काय सुरू आहे याचा आपण कधी विचार करत नाही. तसं ते आपल्याला महत्वाचंही वाटत नाही. खेळाडूला ताण, प्रचंड दबाव आणि देशाच्या अपेक्षांचा विचार करत मार्ग काढावा लागतो. कधीकधी तो ताण एवढा वाढतो की खेळाडू स्पर्धेतील हार-जीत नंतर अनपेक्षित निर्णयाकडे ओढले जातात. त्यामुळे एक क्रीडाप्रेमी म्हणून तुम्ही कधी त्या खेळाडूच्या मनात काय सुरू असेल याचा यापूर्वी कधी विचार केला होता का?

सध्याच्या काळात तर प्रत्येक खेळाडूला कोरोनामुळे बायोबबलमध्ये रहावे लागत आहे. हे खेळाडू त्यांच्या आप्तांपासून, घरच्यांपासून लांब कोसो दूर खेळत असतात. वरून या खेळाडूंना 'जर आपण हारलो तर...', याचीही भीती सतावत असते. त्यामुळे स्पर्धेच्या अगोदर आणि स्पर्धेदरम्यान हे खेळाडू प्रचंड दबावात असतात. तर दुसऱ्या बाजूला चाहत्यांच्या आणि देशवासियांच्या अपेक्षांचं ओझही या खेळाडूंना वाहवे लागत असते. याचा खेळाडूच्या मानसिक आणि शाररिक स्वास्थ्यावर मोठा परिणाम होत असतो. त्याचाच परिणाम म्हणून या खेळाडूंना विविध आजारांवा समारे जावे लागते.

अनेक खेळाडू मानसिक आजाराचे बळी-

अजूनही बऱ्याच स्पर्धांमध्ये खेळाडूंच्या मानसिक स्वास्थ्यावर म्हणावे तेवढे लक्ष दिले जात नाही. भारतासारखा देश तर याबाबतीत बराच मागास आहे. भारतात मानसिक विकार तज्ज्ञांचे प्रमाणही अल्प आहे. सामान्यांसारखेच खेळाडूंनाही मानसिक आजारांना समाोरे जावे लागत असते. पण त्याकडे म्हणावे तसे लक्ष नाही दिले तर त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात. तसेच आपल्यामध्ये मानसिक आरोग्याबद्दल खूप कमी प्रमाणात जागरूकता आहे. कमी असलेल्या जागरूकतेमुळे अनेकांना याचा तोटा होत आहे.

५ ते ३५ टक्के प्रसिद्ध खेळाडू मानसिक आजाराचे शिकार-

Physiopedia मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात जगभरातील अनेक प्रसिद्ध खेळाडू मानसिक आजाराचे रुग्ण आहेत. पण ते याबद्दल कुणालाही सांगत नाहीयेत. याची कारणे पाहिली तर, मानसिक आजाराबद्दल समाजात असणारी कमी जागरूकता आणि असाक्षरता. तसेच याचा आपल्या खेळावर परिणाम होईल या कारणानेही अनेक खेळाडू हा आजार लपवून याची ट्रिटमेंट घेण्यास नकार देतात. आपण या आजाराचे रुग्ण आहे हे समजल्यावर आपण दुसऱ्यांच्या नजरेत दुबळे ठरू आणि संघामधूनही डच्चू मिळू शकेल या कारणानेही अनेक खेळाडू याकडे दुर्लक्ष करतात. अशाने जर योग्य वेळेस ट्रिटमेंट नाही घेतली तर हा आजार आणखी बळावण्याची शक्यता असते.

काही खेळाडू यावर बोललेही...

१. नाओमी ओसाका-

बरेच खेळाडू या त्रासाबद्दल माध्यमांसमोर बोललेही आहेत. बरेच खेळाडू जास्त न बोलता त्यांनी त्यांच्या संघर्षाची पुसटशी कल्पनाही दिली आहे. सध्याचे ताजे उदाहरण जपानच्या टेनिस खेळाडू नाओमी ओसाकाचे आहे. तिने आपण मानसिक दबावात असल्याचे मान्य केले होते. तिने स्पर्धेतूनही माघार घेतली होती.

२. सेरेना विलियम्स-

२३ वेळा ग्रॅंडस्लॅम विजेती आणि अमेरिकेचा प्रसिद्ध खेळाडू सेरेनाही यावर बोलली आहे. तिनंही मान्य केलं होतं की ती काहीकाळ तणावात होती. तिने तिचा प्रवास कसा संघर्षाने आणि मानसिक आजाराचा सामना करत गेला याचा खूलासा केला होता. सेरेनाने नाओमीला पाठिंबाही दर्शवला आहे. ती म्हणाली की, मला खरंतर नाओमीला घट्ट मिठी मारावीशी वाटत आहे. कारण मला माहितेय की या भावना काय असतात, मला याचा सामना करावा लागला होता. सेरेनाने २०१८ साली तिच्या इंस्टाग्राम पोस्टमधूनही या प्रकारच्या भावना व्यक्त केल्या होत्या. तसेच खेळ आणि कुंटूंब मॅनेज करताना येणाऱ्या बाबींवरही ती बोलली होती.

3. हरमनप्रित कौर-

भारतीय क्रिकेट टीमची कॅप्टन हरमनप्रित कौरने मानसिक आजारांबद्दल आणि तणावाबद्दल भाष्य केले होते. हे भाष्य तिने २०१९ च्या एका मुलाखतीत केले होते. तिने मानसिक आरोग्याचे महत्त्व सांगत बीसीसीआयला टीमच्या सोबत एक मानसिक आरोग्य तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याची विनंतीही केली होती. हरमनप्रितच्या मते आपण कुणाजवळतरी आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत. यामुळे आपला तणाव कमी होण्यास मदत होते.

४. केव्हिन लव-

२०१६ एनबीए चॅम्पियन आणि प्रसिद्ध खेळाडू केव्हिन लव यानेही मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे असं मत मांडलं आहे. लवने स्वतः कशाप्रकारे मानसिक तणावाचा सामना केला हेदेखील सांगितले आहे. त्याने २०१८ मध्ये एक लिहला होता ज्यात त्याने मानसिक तणावाबद्दल खुलासा केला आहे. या लेखात त्याने या आजाराचा कसा त्याच्या करियरवर परिणाम झाला आणि कसा तो यातून सावरला हे सांगितले आहे. त्यामुळे मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष न करता त्यावर योग्य उपचार घेण्याचा सल्लाही लवने दिला आहे.

क्रीडा संघटना खेळाडूंना मदत करू शकतात का?

खेळाडूंचे मानसिक स्वास्थ ठिक राहण्यासाठी क्रिडा संघटनेची महत्त्वाची भूमिका असते. पुढीलप्रकारे ते खेळाडूंना मदत करू शकतात.

- तणावमुक्तीसाठी विविध कार्यक्रम आयोजित करू शकतात.

- मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता पसरवणे.

- खेळांडूंवर वैयक्तिक लक्ष देणे.

- टीमसोबत तज्ज्ञांची टीम ठेवणे.

- वातावरण नेहमी खेळकर ठेवणे.

go to top