

National Chemical Laboratory
esakal
डॉ. आशिष लेले, संचालक, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल)
देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र म्हणून ओळख मिळवायची असल्यास, आपल्या अर्थव्यवस्थेबरोबरच सर्वसामान्यांच्या जीवनाचा दर्जाही सुधारणे आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टी साध्य करण्यात विज्ञान-तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची असेल. देशाला प्रगतीपथावर घेऊन जाणारे विज्ञान-तंत्रज्ञान आणि ते घडवणारे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आपल्या देशातच उपलब्ध आहेत. पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेकडे (एनसीएल) स्वदेशी वैज्ञानिक प्रगतीचे प्रारूप म्हणून पाहता येईल.
देशाची वैज्ञानिक प्रगती म्हटल्यावर बहुतेक वेळा आपल्या डोळ्यांसमोर रॉकेट, क्षेपणास्त्र अशाच गोष्टी समोर येतात. रॉकेटचे अत्यंत क्लिष्ट तंत्रज्ञान अवगत असलेल्या मोजक्या देशांमध्ये भारताची गणना होते, त्या तंत्रज्ञानाचे देशाच्या प्रगतीत महत्त्वाचे योगदानही आहे. मात्र, भारतीय विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती तेवढ्यापुरती मर्यादित नाही. विविध विषयांना वाहून घेतलेल्या अनेक प्रयोगशाळांमधून सुरू असलेल्या संशोधनाने संबंधित क्षेत्रांच्या विकासात मोठी भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील औद्योगिक विकासात ‘एनसीएल’ने दिलेले योगदान जाणून घेतल्यास आपल्याला ‘इस्रो’इतकाच ‘एनसीएलचा’ही अभिमान वाटेल.