

Geopolitics of India
esakal
श्रीराम कुंटे - वळणं इतिहास-भूगोलाची
भारताचं परराष्ट्र धोरण घडण्यामागे जवाहरलाल नेहरूंचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा महत्त्वाचा होता. संकुचित राष्ट्रवाद भारतासाठी धोकादायक ठरू शकतो असा अगदी अचूक निष्कर्ष त्यांनी काढला. नेहरूंनी मुद्दामच पुन्हा एकदा जागतिक भूमिका स्वीकारून त्यांनी ब्रिटिशांच्या ओंजळीतून पाणी पिण्याच्या मानसिक गुलामगिरीतून भारताला बाहेर काढलं.
एखाद्या देशाचा इतिहास आणि भूगोल त्या देशाच्या धोरणकर्त्यांच्या आकलनावर थेट परिणाम करतात. या आकलनातूनच देशाचं परराष्ट्र आणि संरक्षण धोरण घडत असतं. पण म्हणून फक्त इतिहास आणि भूगोल म्हणजे त्या देशाचं परराष्ट्र धोरण किंवा भू-राजकारण नाही. ते समजून घ्यायचं असेल, तर धोरणकर्त्यांच्या मनात डोकावून पाहिलं पाहिजे. भारताचं परराष्ट्र धोरण आणि पर्यायाने भू-राजकारण कसं घडत गेलं हे समजून घेण्यासाठी आपण त्या धोरणाचे प्रमुख शिल्पकार नेहरूंच्या मनात डोकावून पाहू या.