कोरोनातील अनलॉकनंतर ‘हाय डिमांड’ असणाऱ्या नव्या संधी!! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनातील अनलॉकनंतर ‘हाय डिमांड’ असणाऱ्या नव्या संधी!!}

कोरोनातील अनलॉकनंतर ‘हाय डिमांड’ असणाऱ्या नव्या संधी!!

sakal_logo
By
मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

खरंतर, गेल्या दिड वर्षांहुन अधिक काळ हर्षदा पाटील (नाव बदललेले आहे) माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात (आयटी) वर्क फ्रॉम होम करत आहे. परंतु अचानकपणे कंपनीकडून इनबॉक्समध्ये येऊन पडलेल्या ‘ई-मेल’ने तिची झोप उडवली आहे. कंपनीच्या एचआरकडून आलेला ई-मेल म्हटल्यावर सहाजिकच तिने तो प्राधान्याने पाहिला. ‘पोस्ट कोविड’नंतर आता प्रत्येक कर्मचाऱ्याला नव्याने काही बदल करावे लागणार आहे. तर तुम्ही तुमच्या जॉब प्रोफाइलमध्ये अमूक-अमूक गोष्टींना प्राधान्य द्या, अमूक-अमूक गोष्टींवर जास्त भर द्या', अशी भली मोठी यादी ई-मेलवर दिली होती. वर्षानुवर्ष जे काम करत होतो, त्यात आता वेगळा काय बदल करायचा हे, तिला समजेना!

उत्पादननिर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या निखिल जाधव (नाव बदललेले आहे) तर भलतच टेन्शनमध्ये आलायं. ‘पोस्ट कोविड’नंतरचा काळ हा तुमच्यासाठी टर्निंग पॉंईट आहे. जॉब प्रोफाईलमध्ये बदल करा’, असे वयाची चाळीशी उलटून गेलेल्या निखिलसह अन्य सहकार्यांना कंपनीच्या बॉसकडून सांगण्यात आले. अशा टप्प्यावर आता काय नवीन येऊन ठेवलयं, या चिंतेत सध्या निखिल आहे.

अर्थात हर्षदा असो किंवा निखिल यांच्यासारखे अनेकजण या काळात मोठ्या पेचात सापडले आहे. काय आहे हा पेच?? तर लॉकडाऊनच्या काळात नोकरी टिकवायची कशी ? आणि आता अनलॉक झालयं तर नोकरीतील प्रोफाईल गरजेनुसार कसा बदलायचा, असा हा पेच आहे. आता जॉब प्रोफाईलमध्ये बदल काय असू शकतो, तर विशेषत: लॉकडाऊननंतर होणाऱ्या बदलाना अनुसरून तुम्हालाही तुमच्या जॉब प्रोफाईलमध्ये कामाच्या स्वरुपात मार्केटच्या गरजेनुसार बदल करावे लागणार आहेत. पण सगळ्यात आधी अनलॉक होत असताना कोणत्या क्षेत्रात संधी सर्वाधिक संधी उपलब्ध होऊ शकते? म्हणजेच ‘हाय डिमांड’ असणाऱ्या नोकऱ्या कोणत्या हे पाहणे तितकेच औसुक्‍याचे राहील. पण त्यापूर्वी कोरोना काळात धोक्यात आलेली उद्योग क्षेत्र कोणती ही देखील पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. जेणेकरून त्या क्षेत्रात पुन्हा जोमाने उभे राहण्यासाठी काय करणे अपेक्षित आहे, हे कळू शकेल.

कोरोना काळात पर्यटन, हॉटेलिंग, वाहन उद्योग, वाहतूक, रिसॉर्ट, इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसायाला सर्वाधिक फटका बसला. हॉटेल व्यवसाय, मोठ-मोठी रिसॉर्ट आणि ट्रॅव्हल टुरिझम, प्रवासी वाहतुक यावर दीर्घ परिणाम जाणविला. आता अर्थात या क्षेत्राची गाडी हळूहळू रूळावर येत आहे. परंतु नवे बदल या क्षेत्राला उभारी घेण्यासाठी फायदेशीर ठरत आहेत.

हेही वाचा: जीवनाचा नाही भरवसा! कुटंबीयांसाठी एवढं कराच

आता नव्याने येणाऱ्या संधीविषयी माहिती जाणून घेऊ यात...

‘हाय डिमांड असणारी’ क्षेत्र :

कंपन्यांकडून मार्केटच्या गरजेनुसार नोकरदारांना वेगळ्या कौशल्यासाठी तयार रहा, असे सांगितले जाईल. पण, अनलॉकमध्ये गरजेनुसार वेगळी कौशल्य आत्मसात करणाऱ्यांना चांगली संधी असेल, हे निश्‍चित.

  • डिजिटल मार्केटिंग, सॉफ्टवेअर डेव्हल्पअर, वेब डिझायनर, स्टॅटेजिक प्लॅनर, फ्रंडएन्ड डेव्हल्पअर, पायथॉन डेव्हल्पअर, फुल स्टॅक डेव्हल्पअर, बॅकएन्ड डेव्हल्पअर, क्‍लाऊड कम्प्युटिंग तज्ञ, सायबर सिक्‍युरिटी तज्ञ, ऑनलाईन सर्व्हिस प्रोव्हायडर यात खूप संधी असेल.

  • लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन यात नव्या संधी उपलब्ध होतील. औषध, धान्य तसेच जीवनावश्‍यक वस्तू सहजतेने पोचविणे, त्यातील कच्चा माल आणि अंतिम उत्पादन निर्मिती क्षेत्रात संधी असेल.

  • आरोग्य क्षेत्र, सेवा क्षेत्र आणि औषधनिर्माण, संशोधन, हॉस्पीटल्स्‌ येथे लोकांची गरज सर्वाधिक असणार आहे.

  • समुपदेशन, मार्गदर्शन, सल्ला देण्याच्या क्षेत्रात मोठी संधी असेल. अगदी लाईफस्टाईल, फिटनेस, आरोग्य, वैद्यकीय, आहार यापासून ते करिअर, गुंतवणूक कशात करावी, कौशल्य आत्मसात कशी करावीत, सायबर सिक्‍युरिटी, शैक्षणिक, मानसोपचार अशा विविध प्रकारचे सल्ला देणाऱ्यांची अधिक गरज भासणार आहे. त्यामुळे एकंदर ‘कौन्सिलिंग'च्या क्षेत्रात संधी असेल.

  • हेल्थकेअर स्पेशलिस्ट, विविध सेवा पुरवठादार, सिस्टिम ऑपरेटर, स्टोअर असोसिएट, सर्टिफाईड पब्लिक अकाऊंटंट, बांधकाम कामगार, वेअर हाऊस मॅनेजर, मानसिक आरोग्य तज्ञ आणि मानसशास्त्र तज्ज्ञ, गाड्या दुरूस्त करणारे मॅकॅनिक, शैक्षणिक सल्लागार, डिलिवरी ड्रायवर, डिजीटल साक्षरता शिकविणारे प्रशिक्षक यांना मोठी संधी उपलब्ध होत आहे.

हेही वाचा: ‘सेन्सेक्स’ने विक्रमी पातळी गाठली; पुढे काय?

देशातील सर्वाधिक पगार असणारे जॉब्स हे असतील :

१. डेटा सायन्स : या क्षेत्राला वाढती मागणी असून, तुम्हाला डेटा सायंटिस्ट किंवा तत्सम नोकऱ्यांमधून सुरवात करत असाल, तर तुमची प्रतीवर्षी चार ते १२ लाख रुपये इतक्या पगाराने सुरवात होईल. तुम्हा या क्षेत्रात काहीसा अनुभव असेल, तर तुमच्या पगाराची मयार्दा वर्षाला ४० ते ६० लाख रुपयांपर्यंत पगारांची नोकरी उपलब्ध होऊ शकते.

- पगाराची सुरवात : ५ ते १२ लाख रुपये (प्रतिवर्षी)

- अनुभव असल्यास : ४० ते ६० लाख रुपये (प्रतिवर्षी)

२. डिजीटल मार्केटिंग : सध्या सोशल मिडियासह मार्केटिंग, जाहिरात यातील डिजीटल मार्केटिंग क्षेत्राला प्रचंड संधी आहेत. यात चांगली नोकरी मिळविण्यासाठी डिजीटल मार्केटिंगमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम, त्याशिवाय ‘मार्केटिंग’शी संबंधित पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम याशिवाय पीआर, मास कम्युनिकेशन यातील अभ्यासक्रम आवश्यक आहे.

- पगाराची सुरवात : ३ ते १० लाख रुपये (प्रतिवर्षी)

- अनुभव असल्यास : ८ ते १५ लाख रुपये (प्रतिवर्षी)

३. वैद्यकीय व्यवसाय : या क्षेत्रातील प्रत्येक घटकाची मागणी गेल्या दिड वर्षात वाढली असून, ती कायम वाढत राहणार आहे. त्यामुळे या क्षेत्राला अधिक महत्त्व. डॉक्टर (एमडी, एमएस, एमबीबीएस अशी कोणतीही पदवी) असो वा औषधनिर्माता (फार्मासिस्ट), औषध विक्रेते, विविध आरोग्य विषय तपासणी यंत्रणा, आरोग्य विषयक सेवा पुरवठादार क्षेत्रात मोठी संधी असेल.

४. सॉफ्टवेअर इंजीनिअर्स : सॉफ्टवेअर इंजीनिअरिंग क्षेत्रातही वाढती मागणी असणार आहे. तुमचे पदवी, पदव्युत्तर पदवी शिक्षण झाले असल्यास आणि त्या जोडील आणखी कौशल्ये आत्मसात केल्यास या काळात तुमचे जॉब प्रोफाइल नक्कीच वाढणार आहे.

- पगाराची सुरवात : ४ ते १३ लाख रुपये (प्रतिवर्षी)

- अनुभव असल्यास : १० ते ३० लाख रुपये (प्रतिवर्षी)

५. अन्य क्षेत्र : मशिन लर्निंग एक्सपर्ट, समुपदेशक, विविध क्षेत्रातील सल्लागार, मॅनेजमेंट सल्लागार

हेही वाचा: जगभरातील नागरिकांना मायदेशी पाठविणारा ‘कतार'!

आगामी काळात विविध क्षेत्रात सेवा देणारे पुरवठादारांची गरज भासणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळ्या गरजा निर्माण होणार असून त्यादृष्टीने कौशल्य आत्मसात करण्याचे आव्हान देशासमोर असेल. आता गृहिणींपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यत सर्वांसाठी डिजीटल साक्षरता अपरिहार्य असणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञान शिकविणारे प्रशिक्षण लागणार आहेत. रिटेल, बॅंकिंग या क्षेत्रात घरपोच सेवा देण्याची मागणी वाढणार आहे. त्यामुळे येथे मनुष्यबळाची जास्त गरज भासणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात अधिक सक्षम पायाभूत सुविधांची आवश्‍यकता असणार आहे. त्यामुळे येथेही नवी संधी उपलब्ध होणार आहे.त्यामुळे आता नोकरी टिकविण्यासाठी आणि नोकरी करत असताना सातत्याने चढता आलेख राहावा, यासाठी जॉब प्रोफाइलमध्ये बदल करण्याची किंवा ‘अपग्रेट’ होण्याची नितांत गरज आहे. जर या काळात तुम्ही चांगल्या संधीच्या शोधात असाल, तर तुम्हाला लेखात वर दिलेल्या क्षेत्रात सर्वाधिक संधी असणार आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर वर नमुद केलेल्या क्षेत्राशी जुळवून घेणारे अतिरिक्त कोर्सेस तुम्हाला करता येतील आणि तुमच्या जॉब प्रोफाईलमध्ये त्यानुसार अपटेड करता येईल. या काळात आणि आगामी काळात आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत, त्या क्षेत्राशी निगडित ‘अपग्रेड’ करणारे कोर्सेस केल्यास तुम्हाला नोकरीत चांगली संधी मिळू शकणार आहेत. त्यामुळे आपले जॉब प्रोफाइल अपडेट करण्याच्या कामाला लागा आणि नवीन संधी घ्यायला तयार रहा.

go to top