

New Political Parties India
esakal
संजय कुमार- प्राध्यापक, सीएसडीएस अर्थात सेंटर
फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीजभारतात बहुपक्षीय लोकशाही असली आणि विविध पक्ष निवडणुका लढवीत असले तरी बहुतेकदा प्रमुख प्रस्थापित पक्ष किंवा आघाड्यांत द्विध्रुवीय लढत होते. नवीन पक्षांची पहिल्याच निवडणुकीतील संमिश्र कामगिरी पाहता त्यांचे भविष्य वर्तविणे, इतके सोपे नाही. काही पक्षांनी चांगले यश मिळविले तर काहींची कामगिरी सुमार ठरली. अर्थात, नवीन किंवा जुन्या पक्षालाही नेतृत्व व संघटनेशिवाय पर्याय नाही.
मागील वर्षी झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी नव्याने स्थापन झालेला प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष या निवडणुकीत कशी कामगिरी करेल, हा प्रश्न वारंवार विचारला गेला होता. त्यानंतर निवडणुकीच्या निकालातून या पक्षाची पहिल्याच निवडणुकीतील कामगिरी सुमार राहिल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे, भारतीय राजकारणात नव्याने प्रवेश करणारे पक्ष टिकाव धरू शकतात का, ही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. आपल्या देशात बहुपक्षीय लोकशाही असली आणि विविध पक्ष मोठ्या संख्येने लोकसभा तसेच राज्यांच्या विधानसभा निवडणुका लढवीत असले तरी बहुतांश वेळा निवडणुकीतील लढत ही द्विध्रुवीय होते. काही अपवाद वगळता मतांतील मोठा वाटा हा दोन पक्ष किंवा दोन आघाड्यांकडे जातो. त्यामुळे भारतीय राजकारणाच्या अवकाशात नवीन राजकीय पक्षांचे भविष्य काय असेल, याबद्दल आत्मविश्वासाने बोलणे खचितच सोपे नाही. भूतकाळात आपण अशा नवीन पक्षांच्या यशाच्या आणि अपयशाच्याही कहाण्या पाहिल्या आहेत. देशातील विविध राज्यांतील निवडणुकांमध्ये नवीन पक्षांनी सहभाग घेतला असून त्यांची कामगिरी मिश्र स्वरूपाची राहिली आहे. काही पक्षांनी आपल्या पदार्पणातच अतिशय चांगली कामगिरी केली. त्याचप्रमाणे, काही पक्षांनी समाधानकारक यश मिळविल्याची व उर्वरित काही पक्षांना यश मिळविता न आल्याचीही उदाहरणे आहेत.