esakal | पीक उत्पादनवाढीवर संशोधकांनी शोधला ‘हा’ पर्याय
sakal

बोलून बातमी शोधा

Crop research}

पीक उत्पादनवाढीवर संशोधकांनी शोधला ‘हा’ पर्याय

sakal_logo
By
राजेंद्र घोरपडे

शेतीचे उत्पादन दुप्पट करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यावर आता संशोधकांनीही कंबर कसली आहे. रासायनिक खते आणि कीडनाशके यांचे दुष्परिणामही आता समोर येत आहेत. हे आव्हान पेलत संशोधकांनी सेंद्रिय शेतीची कास धरत उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. संशोधकांना यात यशही आले आहे. पालक भाजीचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. काय आहे हे संशोधन ? कोणता पर्याय संशोधकांनी शोधला आहे ? हे सांगणारा हा लेख....

आरोग्यदायी अन्न निर्मिती ते सुद्धा कमी खर्चामध्ये हे सध्याचे आव्हान उत्पादकांसमोर आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता शेतीचे उत्पादन घेणाऱ्या क्षेत्रात दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. वाढत्या नागरिकीकरणामुळे शेती मालाच्या उत्पादनात वाढ हे भावी काळातील आव्हानच राहणार आहे. शेती उत्पादन दुप्पट करण्याचे उद्दिष्ट हे सरकारने ठेवले आहे; पण मुख्यतः लोकसंख्यावाढीचा विचार करता ही काळाची गरज आहे. उत्पादन वाढीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पीक संरक्षण, खतांची योग्य मात्रा, सूक्ष्म अन्नद्रव्ये, कीडनाशके यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. विशेष म्हणजे १९६२ मध्ये राचेल कॅरसन यांनी या रासायनिक द्रव्यांच्या वापराचे पर्यावरण आणि मानवी आरोग्यावरील होणाऱ्या दुष्परिणामावर लिहिले होते. रासायनिक खते आणि कीडनाशकांचे अंश माती, पिण्याचे पाणी, अन्न तसेच आईच्या दुधामध्येही आढळतात, हा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हापासून याकडे दुर्लक्ष झाले आहे. आता याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.

गेल्या दोन दशकांपासून मात्र नैसर्गिक आणि सेंद्रिय खतांचा वापर शेती उत्पादनासाठी करण्याबाबत उत्सुकता वाढली आहे. किडींपासून संरक्षणासाठीही नैसर्गिक कीडनाशकांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. रासायनिक खत आणि कीडनाशकांचा अतिवापर रोखण्यासाठी जैविक खते (बायफर्टिलायझर्स) आणि बायोस्टिम्युलन्ट्स हा पर्याय निवडला गेला. काही जैविक खतांच्या वापराने उत्पादनात चांगली वाढ होत असल्याचेही आढळले आहे. तसेच उत्पादित मालाच्या गुणवत्तेतही वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मूग, मेथी, मटकी, हिरवा वाटाणा, हरभरा आदी कडधान्ये आणि भाजीपाल्याच्या पिकांची गुणवत्ता सुधारल्याचेही निदर्शनास आले आहे. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे आंबा पिकामध्येही उत्पादन आणि फळांचा दर्जाही सुधारल्याचे आढळले आहे. रासायनिक खतांना पर्याय उपलब्ध झाल्याने जैविक खते आणि बायोस्टिम्युलन्ट्स यांना चांगली मागणी वाढत आहे. पारंपरिक सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकाच्या वाढीस जिथे चांगला प्रतिसाद देत नाहीत अशा ठिकाणी बायोस्टिम्युलन्ट्सचा कमी प्रमाणातील वापरही वनस्पतींच्या वाढीसाठी व विकासासाठी उपयुक्त ठरतो आहे.

बायोस्टिम्युलन्ट्सची निर्मिती

बायोस्टिम्युलन्ट्समध्ये मुख्यतः समुद्री शैवाल किंवा समुद्री एकपेशीय वनस्पतीचे अर्क, शेवगा (मोरिंगा ओलिफेरा), वनस्पतीचे अर्क, जीवनसत्वे, सेंद्रिय पदार्थ, प्राणी आणि वनस्पतींपासून मिळवलेले प्रोटिन-हायड्रोलायझेट, चिटिन, चिटोसन, पॉली-आणि ऑलिगो-सॅकराइड्स हे घटक असतात. प्रोटिन हायड्रोलायझेट हे बायोस्टिम्युलंट्सपैकी एक आहे, ज्यात वनस्पतींच्या वाढीस उत्तेजन आणि जैविक-अजैविक ताण सहन करण्याच्या सहनशीलतेवर सकारात्मक परिणाम होतो. प्रोटिन हायड्रोलायझेट हे प्राणी आणि वनस्पतीपासून तयार केलेले पेप्टाईड्स आणि अमिनो अॅसिड्स जसे की, ग्लुटामाईन, ग्लुटामेट, प्रोलिन आणि ग्लाइसिन बिटीन यांचे मिश्रण आहे.

फिश-प्रोटिन हायड्रोलायझेट लिक्विड

वनस्पतींच्या वाढीवर प्रोटिन हायड्रोलायझेटचा कसा परिणाम होतो याचा अभ्यास संशोधक शीतल देवांग व उषा देवी यांनी केला आहे. या संदर्भात एशियन जर्नल ऑफ डेअरी अॅन्ड फूड रिसर्च यामध्ये त्यांचा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. या संशोधकांनी पालक (Spinacia oleraces) या वनस्पतीच्या वाढीवर आणि उत्पादनावर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला. पिकाच्या आणि मुळांच्या वाढीवर कोणता परिणाम झाला याचा या संशोधनात अभ्यास केला आहे.

पालक ही अत्यंत पौष्टिक आणि जैविक मूल्य असणारी भाजी आहे. ताज्या शिजवलेल्या भाजीमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते. पालकामध्ये ए, सी, ई, के, बी -२, बी -६, बी- ९, फोलिक अॅसिड आणि मॅंगेनिज, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह आदी खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. प्रोटिन हायड्रोलायझेट पालकासह गोल्डन चेरी टोमॅटो (Solanum iycopersicum), स्नॅपड्रॅगन (Antirrhinum majus), लेट्यूस ( Lactuca sativa), मका (Zea mays), लिली (de Lucia), पपई (Carica papaya) या पिकांच्या उत्पादन आणि वाढीवरही फायदेशीर असल्याचे आढळले आहे.

असे आहे संशोधन

ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१७ मध्ये कर्नाटकातील नेलमंगला तालुक्यातील लाल मातीच्या शेतीमध्ये पालक या भाजीवर फिश-प्रोटिन हायड्रोलायझेट लिक्विड याचा काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यात आला. विशेष म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त फिश प्रोटिन हायड्रोलायझेट लिक्विड वनस्पतीस दिल्यास त्याचे दुष्परिणामही होत असल्याचे आढळले. काही ठराविक प्रमाणातच फिश प्रोटिन हायड्रोलायझेट लिक्विड द्यायला हवे असे सर्वसाधारण मत या संशोधनात व्यक्त करण्यात आले. फिश प्रोटिन हायड्रोलायझेट लिक्विडचा दोन मिली डोस अधिक परिणामकारक असल्याचे संशोधनात आढळले आहे. दोन मिली डोसमध्ये खोडाचे वजन 216.50 ग्रॅम, तर मुळाचे वजन 24.18 ग्रॅम व एकूण वनस्पतीचे वजन 240.68 आढळले; पण त्यापेक्षा डोसचे प्रमाण म्हणजे 2 मिलीवरून पाच मिली केल्यास खोडाचे वजन 168.35 ग्रॅम व मुळाचे वजन 16.53 ग्रॅम व एकूण 184.88 ग्रॅम इतके आढळले. यापेक्षा जास्त डोस दिल्यास आणखी घट झाल्याचीही पाहायला मिळाली. यावरून फिश प्रोटिन हायड्रोलायझेट लिक्विडचे प्रमाण ठराविक ठेवायला हवे हे सिद्ध होते. प्रमाणापेक्षा जास्त दिल्यास दुष्परिणामही झालेले पाहायला मिळाले आहेत.

पालक वनस्पतीच्या वाढीवर असा झाला परिणाम

देण्यात आलेला डोस खोडाचे वजन (ग्रॅममध्ये) मुळाचे वजन (ग्रॅममध्ये) एकूण वजन (ग्रॅममध्ये)

T1-Control 154.00 18.75 172.75

T2-0.5 ml Dosage 197.95 21.13 218.88

T3-2.0 ml Dosage 216.50 24.18 240.68

T4-5.0 ml Dosage 168.35 16.53 184.88

T5-10.0 ml Dosage 156.78 15.00 171.78

फिश प्रोटिन डायड्रोलायझेट लिक्विड योग्य प्रमाणात पालक या वनस्पतीस दिल्यास त्यामध्ये 40 टक्के इतकी वाढ झाल्याचे संशोधनात सिद्ध झाले आहे. याचाच अर्थ पिकाचे उत्पादन दुप्पट करण्याच्या राष्ट्रीय उपक्रमासाठी हे संशोधन निश्चितच फायदेशीर आहे. तसेच फिश प्रोटिन डायड्रोलायझेट लिक्विड हे माशापासून तयार केले जात असल्याने ते पर्यावरणपूरक असे आहे. याचा दुष्परिणाम जमिनीच्या आरोग्यावर होत नाही. साहजिकच मानवी आरोग्यासह पर्यावरण असल्याने याचा उपयोग करणे आता गरजेचे होणार आहे.

go to top