मुंबई: When life gives you lemons, make lemonade ही इंग्रजीतील म्हण तुम्हाला माहिती आहे का..? तुमच्या आयुष्यात असंख्य चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात.. घडत राहणार आहेत.. अर्थातच चांगल्या गोष्टी तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोन आणि अधिक चांगलं करण्याची ऊर्जा देतात. पण वाईट गोष्टी तीच मिळालेली ऊर्जा पुन्हा खाली आणू शकतात. वाईट गोष्टी किंवा आव्हानात्मक परिस्थितीत तुमची तीच ऊर्जा तुम्हाला टिकवून ठेवायची असेल तर तुमच्या त्याच प्रश्नांनाकडे वैताग म्हणून न पाहता एक नवे आव्हान म्हणून पाहायला हवे.. पण कसं..? हा दृष्टिकोन कसा आणायचा?
नुकतीच एक जाहिरात पाहिली. त्यामध्ये एक जोडपं आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत असतं. त्यासाठी त्यांनी तीन ते चार थरांचा केक तयार केलेला असतो. दोन तीन वेटर मिळून तो केक घेऊन येत असतात आणि त्यांच्या हातून तो केक निसटतो.. तो केक कापण्याआधीच पडल्यामुळे त्या जोडप्याला खूप वाईट वाटतं. पण त्याच्या पुढच्याच क्षणी तो प्रियकर नवरा जाऊन खाली पडलेल्या केकचा वरचा भाग चमच्याने खायला सुरुवात करतो आणि सर्वांना हा केक खायला या अशी खूण करतो. त्याच्या या कृतीने सर्वांचीच मने तो जिंकून घेतो.