

New TB vaccines in India
esakal
डॉ. प्रदीप आवटे, निवृत्त राज्य सर्वेक्षण अधिकारी
भारतात आज ‘टीबी’चे सुमारे २८ लाख रुग्ण आहेत. कोणत्याच औषधांना दाद न देणारा टीबी सध्या वाढतो आहे. असे रुग्ण भारतात सर्वाधिक आहेत. या पार्श्वभूमीवर नऊ एप्रिल २०२६ रोजी ‘द ब्रिटिश मेडिकल जर्नल’मध्ये प्रकाशित झालेले नवीन टीबी लसींसंदर्भातील एक संशोधन आपली आशा आणि उमेद पल्लवित करणारे आहे.
घराची बेल वाजली तसा माधुरीताईंनी घराचा दरवाजा उघडला. दारात आजही चिमुरडी धनश्री उभी होती. “का गं, आजही अर्चना नाही का आली?” धनश्री कसनुशी होऊन आत आली. तिच्या बाबाला अजूनही नीट बरे वाटत नव्हते, आई त्याला घेऊन दवाखान्यात गेली होती. धनश्रीच्या बाबाला टीबी होता. त्यात दारूचे व्यसन. १३ -१४ वर्षांची धनश्री आईची धुण्या-भांडयाची कामं करून हातभार लावत होती पण तिची शाळा? ती अशी एकटीच नाही. भारतात दरवर्षी सुमारे तीन लाख मुलं आई-वडिलांच्या क्षयरोगा (‘टीबी’) मुळं शाळा सोडतात. धनश्री त्यातीलच एक. बायकांचे हाल तर अजून वाईट. बाईला टीबी झाल्यास नवरा हाकलून देतो, माहेर आधार देत नाही. गड्यामाणसांची छोटी-मोठी नोकरी ‘टीबी’मुळे हातची निघून जाते. ‘टीबी’ केवळ आजार नाही. त्याचे सामाजिक, आर्थिक परिणाम भयावह आहेत.