पोलिसांच्या कामातील बदल, का आणि कोणते?
कोरोनाच्या संकटामुळे सगळ्या सरकारी व्यवस्थेत ज्या पद्धतीने बदल झाले. त्यापद्धतीने पोलिसांच्या कामातही मोठा बदल झाला. पोलिसांची पारंपरिक कामाची पद्धतच बदलून गेली. पोलिसांना कायद व सुव्यवस्था राखण्यासाठी भविष्यात सामाजिक संवेदनशीलतेमधून काम करावे लागणार आहे. विषाणू संसर्ग किंवा तत्सम आपत्तीच्या काळात कशा प्रकारे काम करायचे याचे वेगळे प्रशिक्षणही पोलिसांना द्यावे लागेल.
काय बदल झाला?
समाजात शांतता राहण्यासाठी, सर्वसामान्य व्यक्तिला बिनधास्त समाजात फिरता यावे म्हणून कायदा सुव्यवस्था राखणे, गुंड-लुटारू यांच्या मुसक्या आवळून गुन्ह्याचा तपास करणे, बंदोबस्त करणे, वाहतुकीचे व्यवस्थापन आणि कायद्याबाबतचे प्रबोधन हे म्हणजे पोलिसांचे काम अशी पद्धत आतापर्यंत रूढ झाली होती. पोलिस मॅन्युअलप्रमाणे काम करणे म्हणजे उत्तम पोलिसिंग असे ही सांगितले जात होते. परंतु, कोरोना विषाणूच्या या संकटाने पोलिसांच्या कामालाही नवा आयाम मिळाला. विषाणू संसर्गाचे संकट आल्यास त्यासाठी पोलिसांना सिद्ध व्हावे लागणार आहे. स्वतःला आधीच्या सर्व ड्युटी करून आता नव्याने पोलिसांना संवेदनशीलता, निर्णय क्षमता, शिस्त, संयम, कायद्याचे ज्ञान, स्वतःच्या आरोग्याची काळजी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन कौशल्याने सामाजिक सलोखा राखत परिस्थितीचा सामना करण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागणार आहे. भविष्यात पोलिस अकॅडमीच आता अशा पद्धतीचे प्रशिक्षण सुरू करावे लागणार आहे.
कौन्सिलर पोलिस
कायदा सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे मोडून काढणे. वाहतूक व्यवस्था करणे, गुन्हे सिद्धता प्रमाणात वाढ होईल यासाठी प्रयत्न करायचे. सण, उत्सव शांततेत उत्साहात साजरे व्हावे यासाठी बंदोबस्त, सामाजिक सलोखा राखणे, निवडणुका, सभांचा बंदोबस्त करायचा. महापूर, भूकंप काळात नागरिकांसह प्रशासनाला आवश्यक ती मदत करायची, असे पोलिसांचे काम आपण पाहिले आहे. पण, कोरोनाचे संकट देशावर आल्यानंतर सगळ्यांच्या कामात बदल होत गेले. सहाजिकच पोलिसांच्या नेहमीच्या कामांपेक्षा या काळात कामाचे स्वरूप बदलून गेले. या काळात पोलिसिंगची व्याख्याच बदलली. गुन्हेगारीवर वचक ठेवणारे पोलिसांना नागरिकांना सूचना देऊन घरात बसा, बाहेर पडून, असे प्रबोधन करण्याची वेळ आली. पोलिसांनी कौन्सिलरची भूमिका पार पाडावी लागली. प्रबोधन करत असताना नागरिकांना शिस्त ही लावणे आणि अहोरात्र रस्त्यावर बंदोबस्त करताना नागरिकांच्या मनातील भीती दूर करायची, अशी भूमिका पोलिस बजावत होते. संसर्ग रोखण्यासाठी गर्दी करू नका, असे त्यांचे वारंवार प्रबोधन करावे लागत होते. पोलिस हवालदारांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत साऱ्यांना हे काम होते. गरजेच्या ठिकाणी कायद्याचा बडगा दाखलून कारवाई ही करायची. पण, प्रबोधनाचे साधन अधिक वापरायचे. हे करताना कायदा सुव्यवस्थेचा, सामाजिक सलोख्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. याची दक्षता घेत पोलिसांना घ्यावी लागली.
हवालदारांमध्येही निर्णय क्षमता हवी
या सगळ्यामुळे आता पोलिसिंगमध्येही अपेक्षित असे बदल करावे लागणार आहेत. पोलिसिंगमधील शेवटचा घटक म्हणजे पोलिस हवालदार हा रस्त्यावर बंदोबस्तासाठी असतो. नागरिकांशी थेट संबंध त्यांचा अधिक येतो. त्यामुळे या हवालदारांमध्ये सामाजिकतेचे भान असावे, त्याच्याकडे जागेवर योग्य निर्णय घेण्याची क्षमता येण्यासाठी प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. गरज भासेल त्यावेळी पोलिसिंग करता करता समाजाचे समुपदेशन करण्याचे कौशल्यही पोलिसांना आत्मसात करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रत्येक वेळी कायद्याला बडगा उगारला तर लोकांमध्ये रोष पसरू शकतो. नागरिकांना रस्त्यावर येऊ न देणे, आजारी नागरिकांना रुग्णालयात हलवणे, या गोष्टी पोलिसांनी केल्या. संकटाच्या काळात नागरिकांशी संवाद कसा साधावा?, त्यांना धीर कसा द्यावा?, त्यांच्या समस्यांचे तात्पुरते निवारण कसे करावे, जीवनावश्यकक वस्तूंचा पुरवठा कसा करावा यासर्वाचे प्रशिक्षण आता भविष्यात घ्यावे लागणार आहे. सामाजिक संवेदनशीलतेमधून पोलिसिंग करणे हे अधिक आव्हानात्मक काम पोलिसांना करावे लागणार आहे.
दुर्लक्षित घटकांची काळजी
सामाजिकतेचे भान ठेऊन संसर्ग काळात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात सर्वात जास्त हाल परप्रांतिय कामगार, मजूर, हातावरणे पोट असणाऱ्या घटकांचे होतात. त्यांना आपल्या गावी जाता येत नाही, हाताला काम नसल्याने त्यांच्या उपजीविकेचा प्रश्नर निर्माण होतो. समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी ही पोलिसांना काम करावे लागणार आहे. त्यांना अन्न धान्यापासून निवारा उपलब्ध करून देण्यासाठीचे प्रयत्न, प्रसंगी सामाजिक आवाहन आणि गरज भासल्यास कारखानदार व मालकांवर कायद्याद्वारे वचक निर्माण करण्याचे तंत्र आत्मसात करावे लागणार आहे.
प्रत्येक ठाण्यात हवे सायबर पोलिस ठाणे
संचारबंदीच्या काळात मोबाईल हेच नागरिकांचे करमणुकीचे साधन बनते. यातून सोशल मीडियाद्वारे अफवा, तेढ निर्माण करणारे संदेश, व्हिडिओ व्हायरल होण्याचे धोके ही तयार झाले. अनेक चुकीच्या गोष्टी व्हायरल झाल्या. त्यासाठी राज्यातील पोलिसांचा सायबर सेल काम करत आहे. परंतू राज्यातील सर्व ठिकाणचे काम एकाच ठिकाणी चालवल्याने तेथील पोलिसांवर ही ताण येऊ लागला. आता यासाठी आगामी काळात जिल्हास्तरावर सायबर सेल किंवा प्रत्येक पोलिस ठाण्यात सायबल सेल तयार करावा लागाणार आहे. भविष्यात सायबर क्राईमचे धोके टाळायचे असतील आणि त्वरीत कारवाई करायची असेल तर प्रत्येक पोलिस ठाण्यात सायबर पोलिस ठाणे, अशी रचना करावी लागेल. यासाठी स्वतंत्र प्रशिक्षित पोलिस ही तयार करावे लागतील. सामाजिक तेढ व विषमता रोखण्यासाठी याचा अतिशय प्रभावी पणे वापर होऊ शकतो. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सची गरज ओळखून भविष्यात फिर्यादी, वेगवेगळ्या परवानगी, दाखले, तपासाबाबतची माहिती आदी पोलिस ठाण्यातील सर्वच काम ऑनलाईन करण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलिस ठाणी पेपरलेस करावीच लागतील. याशिवाय नागरिकांना लागणारे दाखले ही ऑनलाईन देण्याची व्यवस्था करावी लागले. चारित्र्य पडताळणी दाखल्यासह विविध दाखले ही ऑनलाईन द्यावे लागतील. त्यामुळे संपूर्ण पोलिसिंग कामकाज हे ऑनलाईन करावे लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.