स्मृती सागरिका कानुनगो
ओडिशातील सत्ताधारी भाजपसह विरोधातील बिजू जनता दल आणि काँग्रेस या सर्वच पक्ष अस्थैर्य, गटबाजी आणि नेतृत्वासमोरील आव्हानांचा सामना करत आहेत. त्यामुळे ओडिशातील राजकीय परिस्थिती सध्या गोंधळामध्ये सापडल्यासारखी दिसत आहे.
मोहन माझी यांनी १३ जून २०२४ रोजी ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि राज्याच्या नव्या टप्प्याला सुरुवात झाल्याचे मानले जाते. मांझी यांच्या शपथविधीला सुमारे १० महिने पूर्ण झाले आहेत, मात्र त्यांच्या सरकारचा कारभार अडखळतच सुरू आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक जागा रिक्त आहेत, अनेक महत्त्वाच्या खात्यांना स्वतंत्र मंत्री नाहीत.
याशिवाय, मंत्रिमंडळातील अनेक मंत्री पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. खुद्द माझी यांनाही मंत्रिपदाचा अनुभव नाही. या सरकारमध्ये केवळ उपमुख्यमंत्रिपदावरील कनकवर्धन सिंह देव हेच अनुभवी आहेत. त्यांच्याशिवाय केवळ विधानसभेच्या सभापती सुरमा पाधी यांच्याकडे अनुभव आहे. त्यामुळे, माझी यांच्या सरकारवर केंद्र सरकारशी निष्ठावान असणाऱ्यांचा, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निकटवर्तीयांचा प्रभाव आहे. या सरकारमध्ये प्रशासकीय अधिकारीच महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, याकडे राजकीय विश्लेषक लक्ष वेधत आहेत.