
सीबीएसई नियामक मंडळ नववीच्या वर्गात ओपन बुक बेस्ड असेसमेंट सुरू करणार आहे. घोकंपट्टीवर असणारा भर कमी करून सखोल विश्लेषण आणि सृजनशील विचार करून प्रश्नांची उत्तरे लिहिण्याची क्षमता विकसित व्हावी, असा उद्देश त्यामागे आहे. उपक्रम उत्तम असला तरी प्रायोगिक तत्त्वावर तो राबवून त्याची यशस्विता तपासून, त्रुटीवर मात करून मगच त्याचे सार्वत्रिकीकरण करणे हिताचे ठरेल.
‘आ ता काय थेट पुस्तके समोर ठेवूनच परीक्षा द्यायची... नशीबवान आहेत, यंदाची नववीची मुले. आमच्या वेळी असे असते तर आम्हालाही भरपूर गुण मिळाले असते’ अशी चर्चा सीबीएसई शाळेबाहेर विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर नेण्यासाठी थांबलेल्या पालकांमध्ये सध्या ऐकायला मिळत आहे. पण, हे सगळे होत आहे ते त्यांच्यात असलेल्या काही गैरसमजामुळे!
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)च्या नववीच्या विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षी ओपन बुक टेस्ट लागू होणार, अशी बातमी नुकतीच आली. त्या बातमीसंदर्भातच काही पालक चर्चा करत आहेत. खरे तर ओपन बुक टेस्ट अर्थात OBBA (Open book based assacement) या प्रकाराबाबत पालकांबरोबरच शिक्षक, विद्यार्थी आणि अनेकांचे प्रचंड गैरसमज आहेत. सीबीएसई नियामक मंडळाच्या बैठकीत नुकताच शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नववीच्या वर्गासाठी ओपन बुक बेस्ड असेसमेंट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.