

Open Source AI Revolution
esakal
अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर - saptrang@esakal.com
ओपन सोर्सचं वैशिष्ट्यच वेगळं असतं. एकदा एखादं शक्तिशाली मॉडेल जगासाठी खुलं झालं की त्यावर कोणत्याही सरकारचं, कोणत्याही सीमारेषेचं किंवा कोणत्याही निर्यात धोरणाचं नियंत्रण राहत नाही. इंटरनेटवर उपलब्ध असलेलं ज्ञान थांबवणं जवळजवळ अशक्य असतं. त्यामुळे आज आशिया, आफ्रिका, युरोप या खंडांमधला किंवा लॅटिन अमेरिकेतला कोणताही देश अमेरिकन कंपन्यांवर अवलंबून न राहता स्वतःची प्रगत एआय व्यवस्था उभी करू शकतो.
तंत्रज्ञानाच्या इतिहासात काही घटना अशा घडतात की त्या घडत असताना त्यांचं खरं महत्त्व फार कमी लोकांच्या लक्षात येतं. पण काही वर्षांनी मागे वळून पाहिलं की, नेमका इतिहास बदलणारा क्षण तोच होता, हे स्पष्ट दिसतं. १९९१ मध्ये फिनलंडमधल्या एका तरुण विद्यार्थ्यानं, लिनस टॉरवाल्ड्सनं, ‘लिनक्स’ नावाची एक ऑपरेटिंग सिस्टिम जगासाठी मोफत खुली केली होती. त्या वेळी ती केवळ काही प्रोग्रामर्सची आवडती गोष्ट वाटत होती. पण पुढे जाऊन त्याच लिनक्सवर जगातले बहुतांश सर्व्हर्स, सुपरकॉम्प्युटर्स, अँड्रॉइड फोन्स आणि इंटरनेटचा मोठा भाग उभा राहिला. मायक्रोसॉफ्टसारख्या प्रचंड बलाढ्य कंपनीची मक्तेदारी मोडून काढणारी ती एक शांत क्रांती होती.