
डॉ. रामानंद एन. गर्गे
saptrang@esakal.com
केंद्र सरकारने २०१४नंतर आपला नक्षलवादासंदर्भातील धोरणात्मक दृष्टिकोन बदलला आणि २०१९मध्ये विद्यमान गृहमंत्री अमित शहा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नक्षलवादाविरुद्ध ‘शून्य-सहिष्णुता’ धोरण राबविले. सध्या सुरू असलेल्या ‘ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट’मध्ये अनेक कुख्यात नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले, तर काही शरणही आले. त्यातून ३१ मार्च २०२६पर्यंत ‘नक्षलमुक्त भारत’ होण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडले आहे.
छत्तीसगडमधील करेगुट्टा डोंगराळ प्रदेशातल्या ‘ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट’च्या अभूतपूर्व यशानंतर सुरक्षा दलांना नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात, म्हणजेच अभुजमाड भागात नक्षलवाद्यांविरुद्ध निर्णायक यश प्राप्त झाले आहे. या ५० तास सुरू असणाऱ्या गुप्तचर यंत्रणेवर आधारित ग्रँडस्लॅम ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलांनी बुधवारी (ता. २१ मे) छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील अभुजमाड भागात कार्यवाही करताना नक्षलवाद्यांचा म्होरक्या कम्युनिस्ट पक्षाचा (माओवादी) सरचिटणीस नंबला केशव राव ऊर्फ बसवराजू यासह कुख्यात २७ नक्षलवादी मारले गेले.