

Mossad operation
esakal
युद्धाचा हेतू काहीही असो. त्याचा परिणाम संहार आणि विनाश हाच असतो. त्यात केवळ जीवितहानी, वित्तहानी एवढेच होत नसते. त्यात पहिला बळी तर नेहमी सत्याचा जातो. न्याय, नीती, निर्बंध, नियम, संकेत यांची सरसहा कत्तल होत असते. इराकवरील इस्रायली-अमेरिकी आक्रमणात हेच घडताना दिसत आहे. यातील एक लक्षणीय बाब म्हणजे, त्यात कधी नव्हे ते ‘मोसाद’च्या काही नियमांचाही बळी गेला.
मोसाद. ही इस्रायलची गुप्तचर यंत्रणा. ‘हामोसाद लेमोदीईन उलेटाफकीदीम मेयूखादीम’ हे तिचे मूळ हिब्रू नाव. त्याचा अर्थ गुप्तवार्ता आणि विशेष कारवायांविषयीची संस्था. मोसाद (म्हणजे संस्था) हे त्याचे लघुरूप. एक अत्यंत कार्यक्षम आणि तितकीच क्रूर व कठोर हेरयंत्रणा म्हणून ती ओळखली जाते. १९६३ ते १९६८ या काळात तिचे संचालक (हिब्रूत - हारोश, म्हणजे प्रमुख) होते मीर अमीत. ते मोसादच्या इतिहासातील एक अत्यंत कल्पक आणि कठोर काळजाचे हेरप्रमुख. त्यांनी घालून दिलेला हा नियम होता, की कोणताही राष्ट्रप्रमुख, मग तो कितीही अतिरेकी असो, त्याची हत्या करायची नाही.