
‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ एक लष्करी कारवाई नव्हे, तर भारतीय हवाईदलाच्या लवचिकतेचा, अचूकतेचा आणि धोरणात्मक परिपक्वतेचा प्रत्यय देणारी एक महत्त्वाची कृती ठरली. या कारवाईचे विश्लेषण करतानाच हवाई दलाचे तत्त्वज्ञान, तांत्रिक क्षमता आणि धोरणात्मक संधी यांवर एक दृष्टिक्षेप.
‘प हलगाम’ येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत काय भूमिका घेणार याविषयी तर्क-वितर्क सुरू असतानाच सात मेच्या पहाटे, भारताने केलेली हवाई दलाची कारवाई साऱ्या देशवासीयांचेच नव्हे तर जगाचे लक्ष वेधून घेणारी ठरली. निर्धार आणि अचूकतेची प्रचंड लाटच शत्रूच्या सीमापार भागांवर तुटून पडली. यातील अचूकता, टायमिंग उल्लेखनीय होते. ‘ऑपरेशन सिंदूर’ या गुप्तनावाने भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील, तसेच पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी अड्ड्यांवर प्रहार केला. तो पूर्ण समन्वयाने आणि अचूक असा हवाई प्रहार होता. ही कारवाई दहशतवादी तळ, आस्थापना, नेटवर्क यांवर जबरदस्त घाव घालणारी तर होतीच, पण त्याचबरोबर भारतीय हवाईदलाची लवचिकता, अचूकता आणि प्रभावशक्ती यांचे पुन्हा एकदा प्रातिनिधिक दर्शन घडविणारी होती.