
भारत हा सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या एक नैतिकता जपणारा देश आहे. पृथ्वीराज चौहान, राणा सांगा यांच्यासारख्या कितीतरी शूर राज्यकर्त्यांनी पराभूत शत्रूला माफ केले, अशी कित्येक उदाहरणे आपल्या इतिहासात पाहायला मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज याला एकमेव अपवाद आहेत, ज्यांनी आपल्या सरसेनापतींना बहलोलखानला मारण्याचे आदेश दिले होते. गेल्या जवळजवळ चार दशकांपासून आपण काश्मीरमध्ये पाकिस्तानचे समर्थन असलेल्या दहशतवाद्यांचा त्याच सहिष्णू भावनेने सामना करत आहोत. आपण स्वतःला समजावत होतो, की दहशतवाद एका मर्यादेत आहे. मग या चाळीस वर्षांत हजारो सुरक्षा कर्मचारी आणि सामान्य नागरिक मारले गेले, शहीद झाले तर काय बिघडले? आपण रागावर ताबा ठेवून गप्प बसून होतो. उरी, बालाकोटसारख्या काही हल्ल्यांचा परिणाम पाकिस्तानवर फार काळ टिकला नाही.
आणि मग भारतीयांच्या सहिष्णुतेला सीमापार करायला लावणारे हत्याकांड घडले, ते म्हणजे २२ एप्रिल २०२५ला पहलगाम येथील नरसंहार. राष्ट्र संतापाने पेटले. अगदी शेवटच्या काश्मिरीने या घृणास्पद हल्ल्याचा निषेध केला. प्रत्येक भारतीयाला असे वाटत होते, की गुन्हेगारांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना अशी शिक्षा व्हावी की दहशतवाद पुन्हा भारतात डोके वर काढण्याची हिंमत करणार नाही. अनेक वर्षांच्या स्वतःवर लादलेल्या सैद्धांतिक बंधनांना झुगारून भारताने पाकिस्तानला धडा शिकवायचे ठरवले आणि ७ मे २०२५ रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’चे बिगुल वाजले. संपूर्ण देश सशस्त्र सेनेच्या मागे उभा राहिला. ‘ऑपरेशन सिंदूर’ मागचा उद्देश फक्त पहलगाम हत्याकांडाचा बदला नव्हता, तर दहशतवादामागचे खरे सूत्रधार आणि पाकिस्तानी सैन्य आत्ताच काय, पण भविष्यातही असे अमानवी कृत्य करायला धजावणार नाही, याची जाणीव करून देण्याचा होता.