
‘ऑपरेशन विजय’ आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ या दोन वेगळ्या पद्धतीने लढल्या गेलेल्या स्वतंत्र मोहिमा असल्या, तरी त्यांच्यात काही समान दुवे आहेत, तसेच या दोन्ही लष्करी कारवायांमुळे अनेक मुद्दे अधोरेखित झाले आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. भारतीय सैन्याचे अतुलनीय धैर्य आणि अचूक रणनीतीचे दर्शन घडवणाऱ्या ह्या दोन्ही मोहिमांचा तुलनात्मक आढावा...
कारगिलची मोहीम म्हणजेच ‘ऑपरेशन विजय’ आणि अलीकडेच झालेले ‘ऑपरेशन सिंदूर’ यांवर तुलनात्मक लेखन करण्यास सुरुवात केल्यावरच मला जाणवलं की, ही गोष्ट खूप अवघड आहे. कारण, सफरचंदांची तुलना संत्र्यांशी कशी करता येईल? ह्या दोन्ही मोहिमांमध्ये प्रचंड तफावत आहे. खडू आणि चीज जसे खूप भिन्न घटक आहेत, तशाच या दोन मोहिमा आहेत. ह्या दोन्ही लष्करी कारवाई जवळपास पाव शतकाच्या अंतराने झाल्या. दोन्ही वेळा तंत्रज्ञान वेगळं होतं आणि युद्धपद्धतीही बदललेल्या होत्या.
एक मोहीम उंच पर्वतीय भागात झाली, तर दुसरी मैदानात. एक म्हणजे थेट युद्धच - पायदळाच्या शौर्य, बलिदान आणि रक्तपातही! त्यासोबतच तोफखान्याच्या प्रचंड माऱ्याची दमदार साथ होती, तर दुसरं होतं संपर्काशिवाय युद्ध - शस्त्रसज्ज हवाई शक्तीचा अचूक, भेदक मारा आणि थेट कारवाई. ‘ऑपरेशन विजय’ केवळ कारगिल परिसरापुरतं मर्यादित होतं, तर ‘ऑपरेशन सिंदूर’ हे विस्तृत होतं आणि पाकिस्तानच्या अंतर्गत भागांपर्यंत घुसून त्या देशाला हादरवणारं होतं. ‘ऑपरेशन विजय’ साधारणपणे दोन महिने चाललं आणि विविध टप्प्यांत पार पडलं, तर ‘ऑपरेशन सिंदूर’ केवळ चार दिवसांतच पूर्ण झालं. पहिल्या दृष्टिक्षेपात मला या दोन युद्धांची तुलना करणं कठीण वाटतं होतं, पण मी विचार करू लागल्यावर अनेक मुद्दे समोर येत गेले.