
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांवरही मुख्यमंत्र्यांना कारवाई करणे आवश्यक आहे. त्यांच्यामुळे भाजप व फडणवीस यांचीही बदनामी होते. त्यामुळे आज ना उद्या शिंदेंच्या कलंकित मंत्र्यांवर कारवाई होईल. विरोधक म्हणून त्यासाठी सरकारवर आमचा दबाव कायम असेल, असे मत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले. ‘सरकारनामा’च्या प्रतिनिधी दीपा कदम यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या भावना व्यक्त केल्या.
तुमचे आणि एकनाथ शिंदेंचे चांगले संबंध होते. शिवसेनेमध्ये फूट पडून आता तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटला. शिवसेना फुटीकडे तुम्ही कसे पाहता?
एकनाथ शिंदे यांनी निर्माण केलेल्या सिनेमात ‘गद्दाराला क्षमा नाही’ असा संवाद आहे. पण या सर्वांचा विचार करण्यापेक्षा आमच्या संघटनेकडे लक्ष द्यायला पाहिजे असे मला वाटते. यापूर्वी देखील शिवसेनेतून अनेक जण बाहेर पडले. नारायण राणे, गणेश नाईक, छगन भुजबळ हे पण शिवसेनेतून बाहेर पडले. पण यांच्या गद्दारीत आणि शिंदेंच्यात फरक आहे. शिंदेंनी शिवसेना संपवण्याचा विचार केला जो इतरांनी केला नाही.
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळाचा अनुभव कसा होता?
आमदार अपात्रतेच्या निकालाबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती, त्यावेळी माझ्याकडे विरोधी पक्षनेतेपद आले. सुरुवातीला मला वाटले होते की महायुतीचे सरकार सहा महिनेच टिकेल. त्यामुळे मला फार काळ या पदावर राहण्याची वेळ येणार नाही. पण तसे काही झाले नाही. मला तीन वर्षांचा कालावधी मिळाला. हे चांगले की वाईट हे सांगता येणार नाही. मात्र शिवसेनेच्या दृष्टीने हा वाईट काळ म्हणावा लागेल. विरोधी पक्षनेतेपद आल्यानंतर आमच्यातलेच लोक सत्ताधाऱ्यांच्या रूपात समोर होते. त्यांच्याविषयी कसे आणि काय बोलायचे याविषयी संभ्रम असायचा. दिवसरात्र आम्ही एकत्र काम केले होते. वेदना होत होत्या. पण राजकारणात वेदनेला काही अर्थ नसतो. आपले जे काही काम आहे ते करत राहायचे असते. ही परिस्थिती समजून यायलाही सहा महिने-वर्षभराचा कालावधी लागला.