

Human Rights Campaign Marathwada
esakal
विवेक पंडित-pvivek2308@gmail.com
समाजातील अन्याय्य प्रथेला जेव्हा आव्हान दिलं जातं, तेव्हा या प्रथेला बळ देणारे मूठभर हे बहुतांशी आर्थिक-सामाजिक स्तर इतरांपेक्षा वरचा असणारे असतात... शासन, प्रशासन, पोलिस हे आपापल्या अस्तित्वासाठी कायमच अशा वरचढ मूठभरांना संरक्षण देतात. कारण त्यातच त्यांचे हितसंबंध अबाधित राखले जातात. मात्र या साऱ्या व्यवस्थेविरोधात पद्मिनीबाई किंवा अभंगसारख्या कुणी आव्हान दिलं की, या शोषणाच्या व्यवस्थेत नसलेला; पण चांगल्या बदलाला अनुकूल असलेला समाज घटक संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीशी उभा राहतो... इथेही तेच होत होते... आसपासच्या गावचे लोक पद्मिनीबाई-अभंगच्या पाठीशी उभे राहिले, त्यामुळेच गावानं भाकर-तुकडा तोडला तरी पद्मिनीबाई-अभंग तग धरू शकले... अन्याय्य प्रथेविरोधात संघर्ष करू शकले...
मराठवाड्यात लोकांनी ‘मांगकी’ची कामं सोडावीत, या उद्देशानं मानवी हक्क अभियानाअंतर्गत आम्ही लोकांना संघटित करीत फिरत होतो... ‘जुनी रूढी सोडा, माझी जुनी रूढी सोडा’ अशी विनवणी करणाऱ्या पद्मिनीाबाईंच्या घरी आम्ही बसलो होतो... अभंग नुकताच येऊन ऐकत बसला होता... पद्मिनीबाई हताश होऊन आम्हाला त्यांची कहाणी सांगत होत्या...
श्रीराम तांबोळीकर म्हणजे गावातले स्व-घोषित संस्थानिक... ते शिवसंप्रदायावर कीर्तन करीत. गावातल्या मारुती मंदिराचं कारभारी पद त्यांच्याकडेच होतं. त्यांच्याकडून घेतलेल्या अवघ्या ४०० रुपयांच्या कर्जाच्या परतफेडीसाठी पद्मिनीबाई वर्षानुवर्षं विनामजुरी, विनाभाकर ३०-३५ जनावरांचं शेण रोज काढायच्या... समजायला लागल्यापासून ते वयाच्या चाळीशीपर्यंत दिवस उजाडण्यापासून पाठीच्या कण्याचा काटा मोडेपर्यंत पद्मिनीबाई गोठा साफ करणं, शेण काढणं, शेण डोक्यावरून नेऊन टाकायची कामं करीत होत्या... इतकं करूनही ‘म्हारीण’ हे जातीला चिकटून आलेलं अपमानकारक बिरूद काही केल्या सुटत नव्हतं... सारं गाव ‘म्हारीण, म्हारीण’ म्हणून शिळा भाकर-तुकडा दूरवरून तिच्या दिशेनं फेकत असे... यापलीकडला दिनक्रम चाळीस वर्षे पद्मिनीबाईला माहीतच नव्हता... इतकं राबूनही घरात दाणा नाही... पीठ-तेल-मसाला नाही... हात राबायचे थांबले अन् पाठीच्या कण्याचा काटा मोडला तर उपासमारीनं पोट खपाटीला जाणार, हे नक्की!