

Pakistan-Afghanistan border conflict and TTP terrorism impact
esakal
श्रीराम पवार - shriram1.pawar@gmail.com
दोन महासत्तांना धूळ चारणारे अफगाणी पाकिस्तानच्या हाती काही लागू देतील ही शक्यता कमी. पाकिस्तानसाठी एका बाजूला बलुच समूह उठावाच्या पवित्र्यात आहे. दुसरीकडं तालिबानी संघर्षात उतरले आहेत, असं दुहेरी संकट आहे. ‘टीपीपी’ तील भरती ही पाकिस्तानातून अफगाण तालिबानसोबत लढायला गेलेल्या पाकिस्तानी लोकांची आहे.
गोष्ट अमेरिकेनं अफगाणिस्तानातून सैन्य मागं घ्यायचं ठरवलं तेव्हाची. यासाठीच्या वाटाघाटी दोहा येथे सुरू होत्या. त्यात अफगाणिस्तानात हितसंबंध असलेले सारे खेळाडू होते. नसायचे फक्त अफगाणिस्तानात अमेरिकेच्या पुढाकारानं सत्तेत असलेले तेथील अध्यक्ष आणि भारताचे प्रतिनिधी. अफगाणिस्तान ज्यांच्या हातून सोडवण्यासाठी युद्ध केलं, त्या तालिबानच्याच हाती सोपवणं हाच एकमेव मार्ग असल्याचं जगाने मान्य केलं. तसं ते करायला लावण्यात पाकिस्तानचा दुटप्पी व्यवहार हे एक कारण होतं. अमेरिकेचं सैन्य अपमानास्पद रीतीनं मागे जात असताना पाकिस्तानचे तेव्हाचे पंतप्रधान इम्रान खान सांगत होते, अफगाणिस्तान गुलामीच्या साखळदंडातून मुक्त होतो आहे. आधी सोव्हिएत संघ, नंतर अमेरिकेला खेळवून अफगाणिस्तानात आपलचं वर्चस्व राहील असं पाकिस्तानला, तिथल्या ‘आयएसआय’ या गुप्तचर यंत्रणेला वाटत होतं. याचं कारण सोव्हिएत संघाविरोधात लढलेले मुजाहिदीन असतो, की अमेरिकेच्या विरोधात लढलेले तालिबानी. ही पाकिस्तानचीच निर्मिती होती. अवघ्या काही वर्षांत पाकचा हा भ्रम पार विरला आहे. ज्या भारताला अफगाणिस्तानातून दूर ठेवण्यासाठी पाकिस्तान वाटेल ते करीत असे, त्या भारतासोबत तालिबानी राजवट जुळवून घ्यायचा प्रयत्न करते आहे, तर अफगाणिस्तानातून पाकिस्तानी चौक्यांवर होणारे हल्ले आणि टीपीपी या अफागाणिस्तानातील तालिबान्यांच्या पाकिस्तानी भावंडांकडून माजवलेला दहशतवाद यावरचा उपाय म्हणजे तालिबानविरोधात युद्ध पुकारणं, या निष्कर्षावर पाकिस्तानी सैन्य आणि तिथले सत्ताधारी आले. जे पेरलं त्याच पीक तरारून आलं आहे.