

Pallava Dynasty Clothing History
esakal
शेफाली वैद्य - saptrang@esakal.com
उत्तर भारतीय शिल्पकारांनी मथुरेच्या लाल वालुकाश्मात आणि सारनाथच्या पाषाणात जे तरल, अर्धपारदर्शक वस्त्र कोरले, त्याच परंपरेचा धागा जेव्हा दक्षिण भारतात पोहोचतो, तेव्हा तो वेगळ्या रंगात, वेगळ्या हवामानात, वेगळ्या सौंदर्यशास्त्रात उलगडतो. पण त्या धाग्याची ताकद तीच राहते. मोतीचंद्राच्या नोंदीनुसार पल्लव शिल्पकारांनी पारदर्शकता हे कलात्मक श्रेष्ठत्व म्हणून दाखवले. म्हणजे अंगावर वस्त्र आहे, पण ते इतके, तलम, पारदर्शक आणि हलके आहे की दगडातही जाणवत नाही. अर्थातच शिल्पकारांनी तेच कोरून ठेवले जे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. भारतीय वस्त्रांची पारदर्शकता त्या काळी संपूर्ण जगात विख्यात होती.
उत्तर भारतातल्या शिल्पकलेतून उलगडलेली तत्कालीन वस्त्रसंस्कृती गेल्या काही लेखांत आपण जाणून घेतली. पण भारताचा इतिहास हा एकपदरी कधीच नव्हता. उत्तरेत जेव्हा मौर्य, शुंग, कुषाण, गुप्त स्तूप, मंदिरे, शैलगृहे बनवत होते, त्याच काळात दक्षिण भारतातदेखील त्याच तोडीची कलानिर्मिती होत होती, अत्युच्च दर्जाची वस्त्रे विणली जात होती. कॉमन ईराच्या सातव्या शतकात, तत्कालीन पल्लव राजा नरसिंहवर्मन पहिला याच्या कारकिर्दीत, चिनी बौद्ध भिक्षू ह्युएन त्सांग कांचीपुरमला गेला होता आणि आपल्या दातांग सियुकी म्हणजे पश्चिमी देशांचे वृत्तांत, या ग्रंथात त्याने कांचीपुरमचे सविस्तर वर्णन नोंदवले आहे. तत्कालीन वस्त्रपरंपरेबद्दल बोलताना तो म्हणतो की तिथल्या लोकांची वस्त्रे शिवलेली नसत, बहुतांश लोक ताजी-पांढरी वस्त्रे वापरत, पुरुष कमरेभोवती वस्त्र गुंडाळत तर स्त्रियांची वस्त्रे तलम आणि पायघोळ असत.