
विश्वबंधुत्व ही एक अत्यंत व्यापक संकल्पना आहे. त्याच्या अंमलबजावणीत पुढाकार घेणारे एखादेही राष्ट्र जगाच्या पाठीवर सापडणं कठीण आहे. तथापि, बंधुत्व ही संकल्पना तंतोतंत अमलात आणणारी संस्था म्हणजे पंढरीची वारी. वारीमध्ये दैनंदिन जीवनातील अनेक समस्यांवरील खात्रीशीर उपाय तुम्हाला सापडतो. आहे त्या परिस्थितीत निभावण्याची कला वारी शिकवते. वारीतील ‘या रे, या रे लहानथोर’ ही संतवाणी माझ्या महाराष्ट्राला एकसंध ठेवतेय.
महाराष्ट्राच्या परिचयाची जी काही वैशिष्ट्ये आहेत, त्यापैकी एक अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणजे ‘पंढरीची वारी’. वारी म्हणजे एखाद्या ठिकाणी वारंवार जाणे व येणे; अर्थात येरझाऱ्या करणं. यानुसार पंढरपूरला वारंवार जे ये-जा करतात ते ‘पंढरीचे वारकरी.’ पुण्य सलिला भीमेच्या तीरावर वसलेलं एक नगर म्हणजे पंढरपूर. हा पंढरीचा अगदी स्थूल परिचय होय. मात्र, अध्यात्म विश्वात या क्षेत्राचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. भक्तराज पुंडलिकाच्या भेटीच्या निमित्तानं परब्रह्म साकार होऊन इथं अवतरलं अन् त्या भक्तश्रेष्ठाच्या इच्छेनुसार स्थिरावलं. अदृश्य असणारे भूमिगत धन जसे पायाळू जन्म असलेल्या माणसाला दिसते, तद्वत तुकाराम महाराज म्हणतात, पुंडलिक या पायाळूमुळं पांडुरंग हे महाधन साऱ्या जगाला ठाऊक झालं.