
मिलिंद ढमढेरे
sakal.avtaran@gmail.com
दिव्यांगांच्या ऑलिंपिकसारख्या प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवात गेल्या दोन स्पर्धा मिळून भारतीय खेळाडूंनी जवळजवळ अर्धशतकी पदके मिळवली आहेत. सुदृढ किंवा सबल खेळाडूंनाही आदर्श वाटावा, अशीच कामगिरी त्यांनी केली आहे. पदके मिळवण्याची क्षमता असलेल्या क्रीडा नैपुण्याचा शोध घेऊन त्यांचा विकास घडविला तर उत्तम दर्जाचे ऑलिंपिकपटू घडू शकतात, हे लक्षात घेऊनच दिव्यांगांच्याही खेलो इंडिया गेम्स सुरू करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने देशातील अनेक उदयोन्मुख खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली आहे. त्यामध्ये अनेक गरीब खेळाडूंना खेळातील कौशल्याच्या जोरावर आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचे व्यासपीठ मिळाले आहे. त्यांच्या नेत्रदीपक कामगिरीचे कौतुक आपल्या देशातील सर्वच प्रसारमाध्यमांनीही मुक्तकंठाने केले आहे.