मृणालिनी नानिवडेकर
स्पर्धात्मकेतून गुणवत्ता निर्माण होते असा व्यवस्थापन शास्त्रातला एक नियम! कंपन्या परस्परांच्या स्पर्धेत उभ्या असतातच पण कार्यक्षमता वाढण्यासाठी अंतर्गत विभागात स्पर्धा सुरु झाली तर वातावरण बदलते आणि सहप्रवासात कधी पूरक तर कधी स्पर्धक होत विभागांची कामगिरी कंपनीच्या वाटचालीला गती देते असा आजवरचा कॉर्पोरेट क्षेत्राचा अनुभव आहे.
हा नियम सरकारी पातळीवर राबवला जाण्याची शक्यता भारतासारख्या देशात कमी. खरे तर एकविसाव्या शतकात जागतिकीकरणानंतर या सर्व कारभारात ३६० अंशांचा फरक झाला आहे. कार्यसंस्कृती सर्वत्र झिरपते आहे. जग बदलतेय पण लक्षात कोण घेतो अशी कर्मचाऱ्यांची वृत्ती आहे. काय चालले आहे ते चालू द्या, असा एक अलिखित नियम.
या पार्श्वभूमीवर यथास्थिती कारभार, जैसे थे वृत्ती तशीच न ठेवता अचानक काही बदल घडवायचे प्रयत्न अवघ्या भारतात सुरू झाले आहेत. सरकारी कारभार हा बऱ्यापैकी बदलतो आहे. तो कॉर्पोरेट संस्कृतीप्रमाणे करावा अशाही पद्धतीचा विचार सुरू झाला आहे. महाराष्ट्राने तसा वेगळा विचार केला. सरकारी कार्यालयांमधील शंभर दिवसांची मूल्यमापन स्पर्धा त्यातूनच पुढे आली.