
ओंकार गरुड
गंगातटी वसलेली, १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धात गाजलेल्या बिठूरजवळची सुगंधनगरी कन्नौज माझ्या लखनौ मुक्कामापासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर असल्यानं ‘संगती संग दोष:’ या न्यायानं त्या सुगंधक्षेत्रातल्या माझ्या मुशाफिरीचा हा वृत्तांत.
चीन भारतीय वैदिक परंपरांतूनच सुगंधाला दैवी दर्जा दिला गेला आहे. महामृत्युंजय मंत्रातही शिवशंकराला ‘त्रिनेत्रधारी, सुगंधीत असणारा आणि आमचं पोषण करणारा’ असं म्हणत त्याची स्तुती केली गेलीय. प्राचीन काळापासून होणाऱ्या प्रत्येक यज्ञयागामध्ये अनेकानेक सुगंधी हविर्द्रव्यांच्या आहुती दिल्या जात असत. साक्षात अग्नीदेव त्या हवि ग्रहण करून यज्ञाच्या सुगंधाद्वारे त्या आहुती स्वर्गस्थ देवतांना पोहोचवतात व त्यांना तुष्ट, प्रसन्न करतात अशी या याज्ञिकांची श्रद्धा असे.