

Portfolio Risk Management
esakal
सुधीर जोशी - sudhirjoshi23@gmail.com
शेअर बाजार आर्थिक फायद्याच्या दृष्टीने जेवढा आकर्षक आहे, तेवढेच त्यातील धोकेही गंभीर आहेत. शेअर बाजारात रावाचे रंक आणि रंकाचे राव झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, या बाजारातील जोखीम समजून घेऊन त्यानुसार योग्य उपाययोजना केल्यास गुंतवणूकदाराला दीर्घकालीन संपत्तीनिर्मितीची मोठी संधी मिळू शकते. त्यामुळे नफा मिळवण्याइतकेच पोर्टफोलिओतील जोखीम व्यवस्थापनालाही महत्त्व आहे. पोर्टफोलिओच्या जोखीम व्यवस्थापनासाठी काही व्यवहार्य पर्यायाची माहिती देणारा हा लेख...
शेअर बाजारातील जोखीम समजून घेऊन त्यानुसार योग्य उपाययोजना केल्यास गुंतवणूकदाराला दीर्घकालीन संपत्ती निर्माण करता येऊ शकते. मात्र, त्यासाठी जोखीम व्यवस्थापनही काटेकोरपणे करणे अतिशय महत्त्वाचे आहे. जोखीम व्यवस्थापनासाठी काही व्यवहार्य पर्याय वापरून नुकसान टाळणे शक्य आहे. पहिल्या दोन पर्यायांमध्ये डेरिव्हेटिव्ह साधनांचा उपयोग केला जातो. मात्र, डेरिव्हेटिव्हचा वापर करण्यापूर्वी आपल्या पोर्टफोलिओचा ‘बीटा’ किती आहे, हे तपासणे महत्त्वाचे आहे. ‘बीटा’ म्हणजे ‘निफ्टी’तील वाढ किंवा घसरणीच्या तुलनेत आपल्या पोर्टफोलिओच्या मूल्यात होणाऱ्या वाढीचे किंवा घसरणीचे प्रमाण. हे प्रमाण एक असणे आदर्श मानले जाते; मात्र प्रत्यक्षात ते तसे असेलच असे नाही. त्यामुळे पोर्टफोलिओच्या ‘बीटा’नुसार डेरिव्हेटिव्हची मात्रा कमी-अधिक करावी लागते. भांडवल बाजार नियामक ‘सेबी’ही इंडेक्स पुट आणि इंडेक्स फ्युचर यांना पोर्टफोलिओतील जोखीम कमी करण्यासाठी वापरता येणारी वैध साधने मानते. मात्र, या संरक्षण साधनांची हालचाल तुमच्या पोर्टफोलिओच्या हालचालीशी तंतोतंत जुळेलच असे नाही. पुटची कालमर्यादा, कालांतराने कमी होणारे मूल्य आणि बाजाराचा अस्थिरता निर्देशांक (व्होलॅटिलिटी इंडेक्स) यांसारख्या घटकांचा त्यावर परिणाम होतो.