
प्रतापगड शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा मोठा साक्षीदार आहे. महाराजांचा निर्भीडपणा, पराक्रम, युद्धनीती आणि कौशल्य याचे ते जिवंत स्मारक आहे. प्रतापगड नव्या पिढीला शिवपराक्रमाची सतत प्रेरणा देत राहतो. राजांनी महाप्रताप केलेला प्रतापगड अजिंक्य आहे आणि भौगोलिक परिस्थितीने समृद्ध आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी काही गड स्वतः बांधून घेतले होते. त्यांपैकी प्रतापगड हा एक ऐतिहासिक गड आहे. या गडाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आल्याने त्याचे महत्त्व अधोरेखित होते. या गडाची सर्वात मोठी ओळख म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाला तिथे ठार मारले होते. प्रतापगड घनदाट जंगलात असून तो सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आहे. समुद्रसपाटीपासून तो सुमारे तीन हजार पाचशे फूट उंचीवर आहे. हा गड गिरिदुर्ग (डोंगरी) प्रकारात मोडतो. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात महाबळेश्वर ते पोलादपूर मार्गावर तो आहे. आजही तो दुर्गम आहे. सतराव्या शतकात म्हणजे साडेतीनशे वर्षांपूर्वी तर तो खूपच दुर्गम होता. तो घनदाट जंगल आणि डोंगरदऱ्यांनी वेढलेला आहे. हा गड अजिंक्य, अभेद्य आणि खडतर आहे. या गडाभोवती मोठमोठ्या पर्वतरांगा आहेत. चढ-उतार फारच तीव्र आहेत. घनदाट जंगल असल्याने घोड्यावर बसून गडावर जाणेदेखील अशक्य होते.