
रोपवे चा थरारक प्रवास करायचाय मग हे जाणून घ्या...
झारखंडच्या देवघर येथे त्रिकूट डोंगरावरील रोप-वेच्या दुर्घटनेने देशभरात खळबळ उडाली. कारण आपल्याकडे मुळातच रोपवेचे प्रमाण कमी आहे आणि दुर्घटनांचे प्रमाणही नगण्य आहे. या माध्यमातून असंख्य पर्यटक, भाविक रोप-वेचा आनंद लुटतात. या माध्यमातून निसर्ग जवळून अनुभवण्याची संधी मिळते. मग हिमालयीन रांगा असो किंवा एखादे उंचीवरचे धार्मिक ठिकाण असो. पण देवघरसारख्या घटनेने रोप-वेबाबत नागरिकांच्या मनात अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण अपघात होतो म्हणून आपण प्रवास करण्याचे सोडून देत नाही. त्याचप्रमाणे ती एक दुर्घटना होती आणि तशी दुर्घटना पुन्हा होऊ नये याची खबरदारी सर्वांनी घ्यायला हवी.
जगातला पहिला रोप वे कोठे होता, हे फारसं कोणाला ठाऊक नाही. जसे मेट्रो कोठे धावली हे ठाऊक नाही, तसेच रोप वेचे आहे. सार्वजनिक वाहतुकीत रोप वेला आता स्थान मिळत आहे. त्याचे प्रमाण आणि वापर मर्यादित असले तरी दुर्गम भागातील नागरिकांचा प्रवास सुखकर आणि आल्हाददायी करण्याचे काम रोपे-वे मुळे शक्य झाले आहे. १८७४ मध्ये सॅन फ्रान्सिस्को येथे खाण कामगारांसाठी पहिल्यांदा रोपवेचा उपयोग करण्यात आला. त्यानंतर पर्यटनस्थळी त्याचा वापर केला जाऊ लागला. रोप वेचा प्रवास धोकादायक असतो, परंतु सुखकर करण्याचे काम वेळोवेळी करण्यात आला आहे. देवघरच्या रोप वे दुर्घटनेनंतर देशभरातील रो पेवच्या सुरक्षेबाबत काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अर्थात भारतात रो पे वे कोठे कोठे आहेत, प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी कशी घेतली जाते याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. रोप वे हा दोरीच्या मार्गाने जाणारा रस्ता आहे. त्याचा उपयोग प्रामुख्याने पर्वतीय भागात प्रवास सुलभ करण्यासाठी केला जातो. रोप-वेला भारतातील पर्वतीय रांगात आगामी काळात नवीन वाहतूक व्यवस्था म्हणून पाहिले जात आहे. पर्वतमाला प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रमुख मार्गावर रोप वे तयार केल्यास दर तासाला आठ हजार प्रवासी प्रवास करतील, असा सरकारचा अंदाज आहे. देवघर घटनेच्या अगोदर रोप-वेरून देशात एवढी मोठी दुर्घटना घडलेली नव्हती.
रोपवेची अर्थसंकल्पात तरतूद-
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात सरकारी आणि खासगी भागिदारी म्हणजेच पीपीपी तत्त्वावर राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम पर्वतमाला योजना सुरू करणार असल्याचे जाहीर केले. ही योजना दुर्गम भागात पारंपरिक रस्ते मार्गाऐवजी पर्याय म्हणून वापरली जाणार आहे. दुर्गम भागातील पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देणे, प्रवाशांच्या संपर्कात आणि सुविधांत सुधारणा करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर ज्या ठिकाणी पारंपरिक सामान्य प्रवासी वाहतूक शक्य नाही अशा गर्दीच्या ठिकाणी देखील रोप-वेचा व्यवस्था आणण्याचा विचार केला जात आहे
आर्थिक वर्षात ६० किलोमीटर अंतरासाठी ८ रोपवे योजनांचे कंत्राट दिले जाणार असल्याचे अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले. ही योजना उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मणिपूर, जम्मू काश्मीर, ईशान्य भारतातील राज्यात सुरू केली जात आहे. तत्पूर्वी रस्ते, परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने देशात रोपवेच्या विकासासाठी मेसर्स मॅकिन्से ॲड कंपनीने केलेल्या एका अभ्यासाचा आधार घेतला आहे. यात म्हटले की, रस्ते परिवहन मंत्रालयाने भारतमाला कार्यक्रमासारखाच पर्वतमाला नावाची राष्ट्रीय रोप वे विकास कार्यक्रम सुरू करावा. उत्तराखंड पर्यटन विकास मंडळाने उत्तराखंडच्या रोपवे विकासासाठी सरकारबरोबर करार केला आहे. यात उत्तराखंडमध्ये सात ठिकाणी रोपवे उभारण्यात येणार आहेत. केदारनाथ आणि हेमकुंड साहिब रोपवेसाठी डीपीआर प्रगतीपथावर आहे. यासाठी एनआयटीला पाचारण करण्यात आले आहे.
भारतातील प्रमुख रोप-वे-
भारतात पर्यटनस्थळ आणि धार्मिक स्थळांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे पर्यटकांची वाढती संख्या पाहता आणि पर्यटनस्थळाच्या विकासाला चालना देण्यासाठी रोप वेची मदत घेतली गेली आहे. आता पर्वतमाला प्रकल्पातून रोप वेची संख्या वाढवण्यात येणार आहे. सध्या गुजरात, हिमाचल, जम्मू काश्मीर, आसामसारख्या ठिकाणी रोप वे असून त्याला मिळणारा प्रतिसादही सकारात्मक आहे.
गिरनार रोप वे: गुजरातमध्ये २४ ऑक्टोबर २०२० रोजी रोप वेला सुरवात झाली. या माध्यमातून केवळ ७.५ मिनिटात २.३ किलोमीटरचे अंतर पार केले जाते. भाविक आणि प्रवासी या रोप-वेच्या माध्यमातून परिसरातील निसर्गसौंदर्य न्याहाळू शकतात. पूर्वी गिरनार पर्वताचा प्रवासासाठी एकमेव मार्ग होता आणि तो म्हणजे ९ हजार पायऱ्या चढून जावे लागत होते. त्यासाठी पाच ते सहा तास लागत होते. आता काही मिनिटातच हा प्रवास पूर्ण होतो.
गुवाहटी पॅसेंजरर्स रोप वे: आसामच्या ब्रह्मपूत्र नदीवर गुवाहटी आणि उत्तर गुवाहटीला जोडणारा गुवाहटी पँसेजर रोप वे २४ ऑगस्ट २०२० रोजी सुरू झाला. ब्रह्मपुत्रा नदी ओलांडणारा हा रोप वे हा दोन किलोमीटरचे अंतर काही मिनिटातच पार करतो. हा रोप वे ब्रह्मपूत्र नदीवरचा सर्वात लांबीचा रोपवे मानला जातो.
द्रविड केबल विथ बँक रोप वे: सिक्कीमचा हा रोप वे १६ ते ७६ मीटर उंचीवर आहे. यात सात मिनिटातच एक किलोमीटरचे अंतर पार होते.
गुलमर्ग गोंडोला केबल कार: जम्मू काश्मीरचा हा रोप वे २ हजार ७३० मीटर उंचीवर आहे. हा अडीच किलोमीटरचे अंतर पार करतो
एरियल रोपवे: उत्तराखंडमध्ये २ हजार २७० मीटर उंचीवरचा हा रोप वे भारतातील सर्वाधिक चर्चेचा आहे.
भारतातील अन्य प्रमुख रोप-वे
भेडाघाट रोप वे, जबलपूर, ग्लेनमॉर्गन रोप वे उटी, स्कायव्हू पटनीटॉप जम्मू, मलमपुझ्झा उडन खटोला केरळ, रंगीत घाटी केबल कार, दार्जिलिंग, राजगीर रोप वे बिहार, औली केबल कार उत्तराखंड, महाकाली रोप वे गुजरात, सोलांग रोप वे मनाली, गन हिल केबल कार मसुरी, गंगटोक रोप वे सिक्कीम येथील रोप वे देखील लोकप्रिय आहेत..
स्वीत्झर्लंडमधील रोप वे-
हिंदी चित्रपटातून स्वीत्झर्लंडमधील रोप वे आपणास पाहावयास मिळाले आहे. विशेषत: यश चोप्रांच्या चित्रपटात या रोपेवेचे दर्शन झाले आहे. त्यामुळे भारतातील अनेकांना युरोपात गेल्यावर स्वीत्झर्लंडच्या रोपवेची सफारी केल्याशिवाय चैन पडत नाही. युरोप, अमेरिका यासारख्या देशातील रोपेवमधून फिरण्याचा अनुभव हा संस्मरणीय राहू शकतो. कॅनडातील पीक टू पीक आणि स्वीझर्लंडमधील टिटिलीस रोटेयरचे रोप वे पर्यटकांसाठी आवडते ठिकाण आहे.
पीक टू पीक गोंडोला (व्हिसलर, कॅनडा): ४.४ किलोमीटर लांबीचा पीक टू पीक गोडोंला हा शिखरांना जोडणारा एकमेव रोप-वे मानला जातो. या रोप वेने दोनदा जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. समुद्रसपाटीपासून गोंडोलाचे शिखर १ हजार ४३० फूट उंच आहे. २००८ रोजी या रोप वेचे उदघाटन करण्यात आले. गेल्यावर्षी एका अथेलिटने बेकायदापणे गोंडोलाच्या मध्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला दहा हजार डॉलरचा दंड ठोठावण्यात आला. त्याने रोपवेच्या केबल कारचा दरवाजा जबरदस्तीने उघडून उडी मारली होती.
टिटिलीस रोटेयर (टिटिलीस, स्वीत्झर्लंड): हा रोप वे समुद्रसपाटीपासून ३ हजार २० मीटर उंचीवर असून ही उंची केवळ पाचच मिनिटातच गाठता येते. रोप वेचा प्रवास करताना बर्फच्छादित पर्वतरांग पाहण्याचा अनुभव सुखद आहे.
महाराष्ट्रातील रोप वे
महाराष्ट्रातील गड किल्ले आणि धार्मिक स्थळाच्या विकासासाठी रोप-वे महत्त्वाचे ठरत आहे.
रायगड: १९९६ साली रायगडचा रोप-वे प्रकल्प सुरु झाला. महाराष्ट्रातील या पहिल्या रोप वेने आतापर्यंत २७ लाख नागरिक रायगडावर गेले आहेत. वीज खंडित झाल्यास दोन पर्यायी व्यवस्था आहेत. सध्या चार व्यक्तींच्या तीन ट्रॉली असून एकावेळी १२ व्यक्तींची क्षमता आहे. ही व्यवस्था अपुरी पडत असल्याने क्षमता वाढीसाठी परवानगी मागितली आहे. रोप वेमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या रोप वेने चार मिनिटातच पायथ्यापासून रायगडावर जाता येते.
सप्तश्रृंगी देवी : नाशिक जिल्ह्यातील सप्तश्र्रंगी गडाच्या दर्शनासाठी आता रोप वेची सुविधा उपलब्ध झाली आहे. मंदिरात तीन मिनिटांपर्यंत पोचता येते. त्यामुळे देवीच्या दर्शनाचा प्रवास सोपा झाला आहे. रोपवेचे चार डबे असून एका डब्यात सहा जण बसू शकतात. यावेळी सप्तश्रृंगीगडाचे सौंदर्य पाहता येते. गडाच्या दोन्ही बाजूला रोप वेची सोय करण्यात आली आहे. तसेच एकवीरा देवी आणि राजगड येथील रोप वे देखील प्रस्तावित आहे. मुंबईत देखील देशातील सर्वात मोठा रोप वे उभारण्याचे नियोजन केले जात आहे.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”