दहा हजार घोड्यांचा ‘जीव टांगणीला’ | Premium-Article | Australia plans to slaughter10,000 of horses | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Australia plans to slaughter10,000 of horses }
दहा हजार घोड्यांचा ‘जीव टांगणीला’

दहा हजार घोड्यांचा ‘जीव टांगणीला’

दक्षिण गोलार्धात आॅस्ट्रेलिया हा खंडप्राय देश आहे. कांगारु या प्राण्याचे वास्तव्यही आॅस्ट्रेलियात आहे. देशाचा एक मोठा भूभाग वाळवंटाने व्यापलेला असला तरी प्राणी आणि वनस्पतींचे वैविध्यही आढळून येते. पण उंट आणि घोडे हे प्राणी येथील मूळचे नाहीत. हा देश एकेकाळी इंग्लंडची वसाहत होता. ब्रिटिशांनी वसाहतीच्या काळात आपल्या प्रवास, सामान आणि इतर कामासाठी उंट आणि घोडे आणले. हे दोन्ही प्राणी येथील पर्यावरणाशी एकजीव होऊन गेले. बऱ्यापैकी अनुकूल परिस्थिती लाभल्यामुळे उंट आणि घोड्यांची संख्या वाढत गेली. ही संख्या इतकी वाढत गेली की, इतर जनावरांना अन्न, पाणी कमी पडू लागले. काही वर्षानंतर अशी परिस्थिती निर्माण होते. मग सरकार अमर्याद वाढलेल्या या प्राण्यांच्या संख्येवर मर्यादा आणण्यासाठी कत्तल करते. काही वर्षापूर्वी उंटांची अशीच कत्तल करण्यात आली. आता वेळ आली आहे ती घोड्यांवर! (Australia plans to slaughter10,000 of horses)


आॅस्ट्रेलिया देशात आजघडीला २५ हजार जंगली, मोकाट घोडे आहेत. या घोड्यांना स्थानिक भाषेत ‘ब्रम्बी’ असे नाव आहे. २०१९ ला हवाई सर्वेक्षण केल्यानंतर २५ हजार हा आकडा समोर आला आहे. देशातील आल्पस राष्ट्रीय उद्यानाने हा सर्वे केला होता. अल्पाईन भागात या घोड्यांची संख्या एकवटली आहे. तसेच देशात इतरत्रही घोड्यांची संख्या दिसून येते. न्यू साऊथ वेल्स, व्हिक्टोरिया आणि आॅस्ट्रेलिया कॅपिटल टेरीटोरी या तीन राज्यांच्या सीमेवर अल्पाईन प्रदेश आहे. अल्पाईन भागात या जंगली, मोकाट घोड्यांची संख्या बेसुमार वाढली आहे.


या देशातील केवळ एका टक्का इतकाच भाग हा अल्पाईन प्रदेशाचा आहे. येथे जगात कोठेही आढळून न येणारे प्राणी आहेत, असे चार्लस स्टुर्ट विद्यापीठाचे डेव्हीड वॅटसन सांगतात. मग घोडा हा दुसऱ्या खंडातून आणलेला प्राणी आहे. त्यामुळे त्याचा कायम धोका इतर प्राण्याना असतो. या घोड्यांची संख्या वेगाने वाढत आहे. त्याचा स्थानिक पर्यावरणावर पडत आहे. लुप्त होण्याच्या सीमेवर असणाऱ्या प्राण्यांना तो धोका अधिकच वाढतो.

हेही वाचा: कोष्टी साप खातात...!

न्यू साऊथ वेल्स कोसियसझको राष्ट्रीय उद्यानात तर घोड्यांचा धुमाकूळ सुरु आहे. या एकाच उद्यानात तब्बल १४ हजार घोडे आहेत. येथे या घोड्यांनी गवत आणि इतर वनस्पतींचा फन्ना उडविला आहे. लहान-मोठे प्राणी जीव गमावत आहेत. पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. प्राण्यांना पाणी कमी पडू लागले आहे. त्यामुळे राष्ट्रीय उद्याने आणि वॉईल्डलाईप सर्व्हिसने त्यासाठी एक ‘प्लान’ बनविला आहे. २०२७ पर्यंत या १४ हजार घोड्यांची संख्या फक्त तीन हजारावर आणण्याची. म्हणजे तब्बल दहा हजारापेक्षा जास्त घोड्यांची कत्तल करण्याची.कोसियसझको राष्ट्रीय उद्यानात सगळीकडे ही घोडीच दिसत आहे. उद्यानाच्या तब्बल ३२ टक्के इतक्या प्रचंड क्षेत्रात ही घोडी मोकाट फिरत आहेत. आणि गंमत म्हणजे या घोड्यांना येथे नैसर्गिक शत्रूच नाही. त्यामुळे त्यांची पिलावळ बेसुमार वाढली आहे. पण ‘प्लान’ जर राबविला तर उद्यानातील मूळ संकल्पना शाबूत राहील. आणि घोडी केवळ औषधापुरती उरतील, असा कयास सरकारने काढला आहे. पण काही अभ्यासक, शास्त्रज्ञांना ही घोडी तशीच असावीत. ती या उद्यानाची शान आहेत. जरी ती दुसऱ्या खंडातून आणलेली असली तरी, अशी मते व्यक्त करत आहेत. तसेच आॅस्ट्रेलियन अकॅदमी आॅफ सायन्सने जाहीर केलेल्या पत्रात म्हटले आहे की, हा प्लान म्हणजे दहा हजार घोड्यांचा कत्तल करण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे. तो चुकीचा आहे. जर केवळ दहाच हजार घोड्यांची कत्तल करण्यात आली तर अनेक घोडे शिल्लक राहतील. आणि त्यानंतरही पार्कचे संरक्षण करणे जिकरीचे होऊन बसेल. घोड्यांबद्दल आस्था असणाऱ्यांपुढे प्रशासन गुडघे टेकत आहे. शास्त्रीयदृष्ट्या मुद्दा काय आहे, हे त्यांना समजत नाही. या घोड्यांबद्दल पार्क, उद्यानाचे किती नुकसान होत आहे, या शास्त्रोक्त माहिती प्रशासनाने घ्यावी. आॅस्ट्रेलियन अकॅदमी आॅफ सायन्सचे अध्यक्ष जॉन शाईन म्हणतात की, ‘प्लान’ राबवा अन्यथा जर दुर्लक्ष केल्यास त्याचा धोका आॅस्ट्रेलिया इकोसिस्टीमला पोचेल. या घोड्यांच्या धुमाकुळीने काही प्राणी तर नामशेष होतील. अकादमीने पुढे म्हटले आहे की, राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव संस्थांना या घोड्यांची संख्या कोणत्याही परिस्थितीत तीन हजाराच्या आत आणली पाहिजे. आणि उद्यानातील इतर प्राणीही वाचविले पाहिजेत. अल्पाईन भागातीतल स्थिती अतिशय संवेदनशील आहे. हा भाग म्हणजे नामशेष होण्याचा मार्गावर असलेल्या अनेक प्राण्यांचे घर आहे. लठ्ठ गॅलक्झिस मासा, अल्पाईन ट्री बेडूक आणि रुंद दात असलेला उंदीर हे प्राणी या घोड्यांच्या धुमाकुळीने कायमचे नष्ट होतील. पायाना खूर असलेला एकही स्तस्तन प्राणी आॅस्ट्रेलियाचा प्राणी नाही. त्यामुळे ही घोडीही इथली नाहीत. त्यांच्यामुळे नाजूक वनस्पती नष्ट होत आहेत. या दोन्ही गोष्टी एकत्र नांदू शकत नाहीत. आणि महत्वाचे म्हणजे या घोड्यांच्या अफाट चरण्यामुळे अनेक वनस्पती नष्ट झाल्या आहेत. यापुढेही होत राहतील.

हेही वाचा: सणासुदीला मिठाई घेताय; तर सावधान!


या घोड्यांच्या कत्तल करण्याव्यतिरिक्त आणखी एक पर्याय म्हणजे या घोड्यांना खासगी जमिनीत बंदिस्त अवस्थेत ठेवायचे. पण ही योजना अतिशय वेळखाऊ आहे. तसेच ती खर्चिकही आहे. न्यू साऊथ वेल्स राज्यात २००२ पासून आतापर्यंत केवळ दोन हजार घोड्यांचे पुनर्वसन करण्यात यश आले आहे. त्यामुळे आता एकच पर्याय शिल्लक राहतो आणि तो म्हणजे हेलिकॉप्टरचा वापर करत हवेतून गोळ्या घालून या घोड्यांना ठार मारणे.
बायॉलॉजिकल कंझरर्वेशनने नुकताच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार तब्बल ७१ टक्के नागरिकांनी घोड्यांची कत्तल योग्यच असल्याचे म्हटले आहे. कारण उद्यान कोणत्याही परिस्थितीत वाचवायचे आहे. कारण अमेरिकेत ‘मस्टंग’ या प्राण्यांची संख्या बेसुमार वाढत गेली आणि त्याचे परिणाम फार विपरित झाले. अगदी तशीच स्थिती आता आॅस्र्टेलियात निर्माण झाली आहे. त्यामुळे न्यू साऊथ वेल्स सरकारने कोणत्याही परिस्थितीत ‘प्लान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. कोसीउसझको नॅशनल पार्कमधील १४ हजार ३८० घोड्यांची संख्या तीन हजारपर्यंत आणण्याचा विचार आहे. घोड्यांना पकडणे, पुनर्वसन किंवा गोळ्या घालून ठार मारत २०२७ पर्यंत हा ‘प्लान’ पूर्ण करायचा आहे.

चर्चा नको, निर्णयच होणार
हा ‘प्लान’ संसदेतही पोचला आहे. तेथे तो संमत ही झाला आहे. माजी उपपंतप्रधान बॅरिलारो यांनी संसदेत सांगितले की, या ‘प्लान’ वर आता सुरुवातीपासून आपण चर्चा करु शकत नाही. आता चर्चा होणार ती घोड्यांची संख्या कितीपर्यंत कमी करण्याची ती. आणि तेच महत्वाचे आहे. चर्चा खूप झाली आहे, आता ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
टॅग्स :global newsaustralia
go to top