
कचरावेचक कामगाराने टाकाऊ पुस्तकांमधून उभारले भव्य ग्रंथदालन!
पुस्तकप्रेमींसाठी पुस्तके जपून ठेवणे हा मोठा ठेवा असतो. एखादे जीर्ण झालेले पुस्तकही त्यांच्या ग्रंथसंपदेची शान वाढवत असते. असे असले तरी जगभरात दरवर्षी कितीतरी टन पुस्तके रद्दीत घातली जातात. प्रकाशक, ग्रंथालये यांचा वाटा यात मोठा असतो. याशिवाय वाचकही जुनी झालेली पुस्तके टाकून देतात. पण कचऱ्यात फेकून दिलेल्या पुस्तकांमधून तुर्कस्तानमध्ये जगावेगळे भव्य ग्रंथालय उभारले आहे. त्याची संकल्पना कचरावेचक कामगारांची आहे.
तुर्कस्तानची राजधानी अंकारातील कानकाया जिल्ह्यात कचरावेचक गटाने कचऱ्यात सापडणारी पुस्तके गोळा करण्यास सुरुवात केली. घराघरांमधील कचरा गोळा झाल्यावर तो डेपोत जातो. या कचऱ्यात काही मौल्यवान वस्तूही सापडतात. त्यात पुस्तकेही सापडली. सुदैवाने तुर्कस्तानमधील कचरावेचकांनी त्यांचे महत्त्व जाणले आणि ती एकत्र केली. सहकारी कामगार व त्यांच्या कुटुंबांना ही पुस्तके देता येतील, अशी भावना त्यामागे होती. पाच वर्षांपूर्वी तुर्कस्तानमध्ये सरकारच्या मालकीचे सार्वजनिक ग्रंथालयाची संकल्पना प्रचलित नव्हती. २०१७ मध्ये ७० हजार नागरिकांसाठी केवळ एकच सार्वजनिक ग्रंथालय होते, असे तेथील वृत्तपत्र ‘डेली सबाह’ने म्हटले आहे. याउलट युरोपची स्थिती होती. ‘लायब्ररी मॅप ऑफ द वर्ल्ड’च्या २०१६मधील अहवालानुसार युरोपिय समुदायात प्रत्येकी सहा हजार २०० नागरिकांमागे एक सार्वजनिक ग्रंथालय आहे. त्यामुळे तुर्कस्तानच्या नागरिकांची वाचनाची भूक भागविण्यासाठी कचरावेचकांनी रद्दीतून पुस्तके साठविण्याची कल्पना लढविली.
पुस्तकांचा शोध घेण्याचे त्यांचे काम अनेक महिने त्यांचे हे काम सुरू होते. पाहता पाहता त्यांच्या कामाची माहिती सर्वत्र पसरली. कानकायातील रहिवासी स्वतः पुस्तके देणगी म्हणून देण्यास पुढे येऊ लागले. सुरूवातीला ही पुस्तके फक्त सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी होती. पण हळूहळू पुस्तकांची संख्या वाढू लागली आणि लोकांनाही त्यात स्वारस्य वाटू लागले. अखेर या पुस्तकांमधून सर्व नागरिकांसाठी खुले असणारे ग्रंथदालनच साकार झाले. ‘घरी पुस्तकांचे दालन असावे, अशी माझी इच्छा पूर्वी होती. पण आता सर्वांसाठी खुले असणारे आमचे ग्रंथालय उभारण्यात आले आहे,’ असे कचरावेचक सरहत बेटेमूर (वय ३२) याने सांगितले.
वीट कारखान्यात ग्रंथसंपदा
‘‘कचरावेचकांच्या पुस्तके गोळा करण्याच्या कल्पनेला सर्वांचा पाठिंबा मिळू लागला आणि या पुस्तकांमधून काल्पनिक व ललितेतर ग्रंथासाठी विचारणा होऊ लागली तेव्हा ग्रंथालय उभारण्यावर आम्ही चर्चा सुरू केली,’’ असे कानकायाचे तत्कालीन महापौर अल्पेर तासडेलेन यांनी सांगितले. ही सर्व पुस्तके एका शेतकऱ्याच्या वीट निर्मितीच्या जुन्या कारखान्यात ठेवली आहेत. तेथील लांबलचक मार्गिका पुस्तके ठेवण्यासाठी अत्यंत योग्य ठरल्या आहेत. मुळात ही संपूर्ण इमारत सामाजिक केंद्र म्हणून उपयोगात आणली जात आहे. येथे केशकर्तनालय आहे, कॉफी शॉप, चेस खेळण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. प्रशासकीय कार्यालयेही आहे. त्यातील काहींचे फर्निचर व अन्य साहित्य हे कचऱ्यातून तयार केलेले आहे.
ग्रंथालयात २५ हजार पुस्तके
सध्या या ग्रंथालयात तब्बल २५ हजार पुस्तके आहे. विषयांनुसार त्यांचे वर्गीकरण १७ विभागात केले आहे. यात आर्थिक, सामाजिक, कथा-कादंबऱ्या आदींचा समावेश आहे. बालवाचकांसाठी स्वतंत्र दालन आहे. तसेच वैज्ञानिक संशोधनावर आधारित पुस्तकांचेही एक पूर्ण दालन आहे. द्विभाषिक वाचकांसाठी येथे इंग्रजीसह फ्रेंच भाषेतील ग्रंथांचा खजिनाच आहे. वाचकांना शुल्क भरून दोन आठवड्यांसाठी पुस्तके दिली जातात. गरजेनुसार मुदत वाढविली जाते. पुस्तकांच्या संख्येत सातत्याने भर पडत असल्याने जास्तीच्या प्रती शाळा, शैक्षणिक कार्यक्रम आणि अगदी कारागृहांमध्येही पुरविल्या जातात. तुर्कस्तानमधील गावांमधील शिक्षकही पुस्तकांसाठी विचारणा करीत असतात. सरकारी कर्मचाऱ्यांची मुले, परिसरातील शालेय विद्यार्थी यांचा ग्रंथालय कायम राबता असतो. तेथे बसून वाचन करण्यासाठी खास बैठक व्यवस्थाही आहे. अनेक सफाई कामगार कामातून थोडी विश्रांती घेऊन ग्रंथालयात येतात आणि पुस्तके चाळतात. त्यातून त्यांना थोडा आरामही मिळतो. गावाबाहेरील दऱ्याखोऱ्यांत फिरणाऱ्या सायकलप्रेमींसाठीही हे ग्रंथालय म्हणजे थोडा विसावा घेऊन वाफाळलेल्या कॉफीसह वाचनाचा आनंद देणारे ठिकाण आहे. या ग्रंथालयाच्या कामाचा विस्तार एवढा वाढला आहे की त्याच्या व्यवस्थापनासाठी शहर प्रशासनाने पूर्ण वेळ कर्मचाऱ्याची नियुक्ती
केली आहे.
फिरते ग्रंथालय
वीटनिर्मितीच्या इमारतीमध्ये तयार केलेल्या या स्थायी ग्रंथालयाबरोबरच कचरावेचकांनी एका ट्रकचे रूपांतर फिरत्या ग्रंथालयात केले आहे. पूर्वी कचरा गोळा करणाऱ्या या ट्रकमध्ये आता मौल्यवान पुस्तकांचा खजिना आहे. फेकून दिलेली पुस्तके गोळा करून ती जिल्ह्यांमधील ग्रंथालये आणि शाळांपर्यंत पोचविली जातात.
‘लॉर्ड ऑफ द बुक्स’
तुर्कस्तानप्रमाणेच कोलंबियातील कचरावेचक जोस गुटेरेस यानेही ग्रंथांचे मोल जाणले आहे. केवळ दुसरीपर्यंत शिक्षण झालेला गुटेरेस स्वतः वाचनप्रेमी असून त्याच्या देशातील हजारो मुलांना त्याने वाचनाची भेट दिली आहे. कचऱ्यातून पुस्तके गोळा करण्याचे काम गेल्या २० वर्षांपूर्वी सुरू केले होते. श्रीमंतांच्या वसाहतीत रात्री कचरा वेचण्यासाठी तो रात्री ट्रक घेऊन जात असे. कचऱ्यात काही पुस्तके किंवा वाचनासाठीचे साहित्य असेल तर गुटेरेस ते वेगळे करीत असे. यातून त्याने स्वतःच्या घराच्या तळमजल्याचे रूपांतर सार्वजनिक ग्रंथालयात केले आहे. तेथे जमिनीपासून छतापर्यंत पुस्तकेच नजरेस पडतात. शालेय मुलांसाठी क्रमिक पुस्तकांसह अनेक विषयांवरील सुमारे २० हजार पुस्तकांचा ठेवा येथे आहे.
गुटेरेस म्हणतो,‘‘ माझ्या सारख्या कमी उत्पन्न गटातील कुटुंबातील मुलामुलींसाठी पुस्तके म्हणजे चैनीची वस्तू आहे. दुकानात जाऊन पुस्तक खरेदी करणे परवडणारे नसते. बोगोटाची लोकसंख्या ८५ लाख असून तेथे १९ सार्वजनिक ग्रंथालये आहेत. मात्र गरिबांच्या वस्तींपासून ही ग्रंथालये खूप दूर आहेत. खरे तर सर्व ग्रामीण व शहरांत, सर्व विभागात, सर्व वस्तींमध्ये ग्रंथांचे एक स्वतंत्र जागा असायला हवी. कारण पुस्तकेच आपली तारणहार आहेत. कोलंबियासाठी याचीच गरज आहे.’’ पन्नाशी ओलांडलेल्या गुटेरेसचे वाचनवेड हे त्याचा आईकडून मिळालेला ठेवा आहे. गरिबीमुळे ती मुलाला शिकवू शकली नसली तरी वाचनासाठी त्याला कायम काहीतरी देत असे. दररोज रात्री ती त्याला गोष्टी वाचून दाखवीत असे. माझ्यासाठी व संपूर्ण मानवजातीसाठी पुस्तके म्हणजे सर्वांत मोठा शोध आहे, असेही तो सांगतो.
गुटेरेस आजही कचऱ्यातून पुस्तके जमविण्याचे काम करीत आहे. खरे तर या तळमळीने कोलंबियात गुटेरेस याची ओळख ‘लॉर्ड ऑफ द बुक्स’ अशी झाली असून अनेक नागरिकांनी दान केलेली पुस्तके त्याच्यापर्यंत पोहचत आहेत. पण एवढी पुस्तके ठेवण्यासाठी त्याच्याकडे जागा नसल्याने अनेक पुस्तके तो देशभरातील विविध ग्रंथालयांना पाठवीत असतो. वाचनवेड्या गुटेरेसचे आवडते लेखक लिओ टॉलस्टॉय, व्हिक्टर ह्युगो आणि मारिओ वर्गस लोसा हे आहेत तर ‘ वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड’ आणि ‘द जनरल अन हिज लिबिरिन्थ’ ही त्यांची आवडती पुस्तके आहेत. नोबेल विजेते कोलंबियाचे प्रसिद्ध लेखक गॅब्रियल गार्सिया मारक्वेझ हे या पुस्तकांचे लेखक आहेत.
सध्याचा जमाना हा डिजिटलचा असल्याने पुस्तके हातात घेऊन वाचन कमी झाल्याची तक्रार सर्वत्र होत असते. यावर गुटेरेस म्हणतो, ‘‘ डिजिटल माध्यमातून पुस्तके वाचण्याच्या तंत्रज्ञान मी नाकारत नाही, पण कागदावर उमटलेली अक्षरे वाचण्यास माझे प्राधान्य आहे. तुमच्या हातात, बॅगेत किंवा मोटारीत पुस्तक असणे यापेक्षा सुंदर काहीही नाही.’’
जगातील सर्वांत मोठी ग्रंथालये (पहिली दहा)
नाव देश ठिकाण पुस्तकांची संख्या
ब्रिटिश लायब्ररी ब्रिटन लंडन आणि बोस्टन स्पा १७ ते २० कोटी
लायब्ररी ऑफ काँग्रेस अमेरिका वॉशिंग्टन १७ कोटी
शांघाय लायब्ररी चीन शांघाय ५, ६०,००,०००
न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररी अमेरिका न्यूयॉर्क ५, ५०, ००, ०००
लायब्ररी अँड आर्काईव्ह कॅनडा कॅनडा ओटावा ५, ४०, ००, ०००
रशियन स्टेट लायब्ररी रशिया मॉस्को ४, ७५, ००, ०००
नॅशनल डाएट लायब्ररी जपान टोकियो आणि क्केटो ४,४१, ००, ०००
रॉयल लायब्ररी डेन्मार्क डेन्मार्क कोपनहेगन आणि अरहस ४,२५, ००, ०००
बिबिलोन्तेक नॅशनल दी फ्रान्स फ्रान्स पॅरिस ४,००, ००,०००
नॅशनल लायब्ररी ऑफ चायना चीन बीजिंग ३,३७, ००, ०००
Associated Media Ids : PNE22S44298