
कोरोना विषाणूच्या संसर्गाने संपूर्ण जगाला हादरवले आहे.
कोरोनाला दूर ठेवणारे ‘सुपरह्यूमन’!
- मंजुषा कुलकर्णी
कोरोना विषाणूच्या संसर्गाने संपूर्ण जगाला हादरवले आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोट्यवधी लोकांना त्याची बाधा झाली. त्यातील लाखो रुग्णांना जीव गमवावा लागला. या विषाणूचे अनेक उत्परिवर्तीत प्रकार आले व त्यांचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला. आज ओमिक्रॉनची दहशत जगभरात आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटची लागण झपाट्याने होत असली तरी काही जण अद्याप कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले नाहीत. अशा सुदैवी माणसांना कोरोनाचा संसर्ग का होत नाही, याचा अभ्यास शास्त्रज्ञ करीत आहेत. (Research for people who never get COVID)
हेही वाचा: कोष्टी साप खातात...!
वैशिष्ट्यपूर्ण जुनकांचा शोध
कोरोनाला दूर ठेवण्याची ‘सुपरह्यूमन’ क्षमता असलेल्या जनुकांचा शोध शास्त्रज्ञ घेत आहे. ‘कोविड-१९’ची लागण होणाऱ्या कोरोनाविषाणूंपासून ज्यांचा अजूनपर्यंत बचाव झाला आहे, त्यांना शोधण्याचे काम संशोधकांचा आंतरराष्ट्रीय गट करीत आहे. या लोकांच्या शरीरात काही वैशिष्ट्यपूर्ण जुनके आहेत का, हे त्यांना पाहायचे आहे. या अभ्यासातून कोरोनाग्रस्तांना बरे करण्यासाठी नवी उपचार पद्धती विकसित करणे शक्य होणार आहे. कोरोनाचा संसर्ग होऊन जे बरे झाले आहेत, ज्यांना सौम्य लक्षणे होती किंवा ज्यांच्यात लक्षणे नव्हती असे रुग्ण किंवा पूर्ण लसीकरण झालेल्यांपेक्षा या लोकांची प्रतिकारशक्ती भिन्न आहे.
पहिल्या गटातील संशोधन
जोपर्यंत विषाणू मानवी शरीरातील पेशींवर हल्ला करीत नाही आणि तेथून त्याचे प्रसरण होत नाही, तोपर्यंत आपल्या रोगप्रतिकार प्रणालीला विषाणूमुळे काही नुकसान पोहचत नाही. कोरोना प्रतिरोधक लोकांमध्ये नेमके हेच घडत असावे, असा शास्त्रज्ञांना कयास आहे. ‘‘असे अलौकिक प्रतिरोधकशक्ती असलेले ‘सुपर ह्यूमन’ व्यक्ती पुरुष व महिला कोण आहेत आणि त्यांच्यात ही क्षमता का आहे, याचा शोध आम्हाला घ्यावयाचा आहे,’’ असे कॅनडातील मॅकगिल युनिव्हर्सिटी हेल्थ केअर येथील संसर्गजन्यरोगतज्ज्ञ आणि वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. डॉन विन्ह यांनी सांगितले. कोरोनाला दूर ठेवणाऱ्या ‘सुपरह्यूमन’चा शोध घेणाऱ्या संशोधकांच्या आंतरराष्ट्रीय गटात समावेश असलेले डॉ. विन्ह हे एकमेव कॅनडाचे नागरिक आहेत. कोरोनाला कारणीभूत असणाऱ्या सार्स-सीओव्ही-२’ या विषाणूचा संसर्ग ज्यांना झाला आहे, पण जे आजारी पडले नाहीत आणि विषाणूचा सामना केल्याची कोणतीही चिन्हे ज्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये दिसत नाहीत, अशा लोकांना संशोधनासाठी एकत्र करण्यास त्यांनी सुरुवात केली होती.
हेही वाचा: अंटार्क्टिकाचे भवितव्य
‘नेचर इम्युनोलॉजी’या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात विन्ह यांनी त्यांच्या संशोधनाची माहिती दिली आहे. जे कोरोनाग्रस्त गंभीर आजारी होते, त्यांचे नातेवाईक, ज्यांना कधीही कोरोनाचे निदान झाले नाही अशांवर पहिल्या गटात संशोधन करण्यात आले. कोरोना झाल्याने अनेकांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले, त्यांची प्रकृती गंभीर झाली, अगदी जीव जाण्याचा धोकाही निर्माण झाला होता. या रुग्णांच्या कुटुंबातील सदस्य किंवा जवळचे नातेवाईक ज्यांना काहीही झाले नाही, त्यांनी स्वतःहून कोरोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली होती, अशा लोकांचा अभ्यास प्रथम केल्याचे डॉ.विन्ह म्हणाले.
लसीकरणापेक्षा प्रभावी उपचारपद्धती हवी
‘सीबीसी’ (कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन) वरील ‘क्विर्क अँड क्वार्क’ या विज्ञान वार्ता कार्यक्रमात बोलताना डॉ. विन्ह म्हणाले, की ज्यांना आधी कोरोनाची लागण झाली आहे, त्यांच्यासाठी उपचारपद्धती विकसित करणे आणि लशीपेक्षा ती परिपूर्ण करणे हे या संशोधनाचे एक उद्दिष्ट आहे. रोगापासून संरक्षण मिळण्यासाठी लसीकरण हा एक उत्तम उपाय आहे. पण ज्यांनी आधा लस घेतली आहे, त्यांनाही कोरोना होत आहे आणि ते संसर्गवाहक ठरत आहेत. अर्थात याचा कालावधी अल्प आहे. नैसर्गिकपणे झालेल्या संसर्गाचा सामना एखाद्याच्या शरीरातील प्रतिकारकशक्तीला करावा लागला का, हे त्या व्यक्तीची प्रतिपिंडे व ‘टी’ पेशींच्या अभ्यासावरून शास्त्रज्ञ सांगू शकतात. आजारी लोकांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील व्यक्तींचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या शरीरात कोरोनारोधक जनुके सापडण्याची आशा शास्त्रज्ञांना वाटत आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा: दहा हजार घोड्यांचा ‘जीव टांगणीला’
हजार स्वयंसेवकांचे निरीक्षण
अशा प्रकारच्या संशोधनाने आम्ही संसर्गाची पहिली पायरी वगळू शकलो तर या जागतिक साथाविरोधातील आपल्या लढ्याला तो एक आधार ठरेल, अशी आम्हाला आशा आहे, असे सांगून डॉ. विन्ह म्हणाले की कोरोनाबाधितांच्या संपर्कात येऊनही या आजारापासून मुक्त असलेल्या एक हजार व्यक्तींची निवड आम्ही या संशोधनासाठी केली आहे. त्यांच्या जनुकांचे स्कॅनिंग करुन त्यांची तुलना कोरोगा रुग्णांच्या संपर्कात आल्याने बाधित झालेल्यांच्या जनुकांशी करुन व त्यामधून विषाणूला रोखू शकणाऱ्या जनुकांचा शोध घेण्यात येणार आहे. प्रतिरोधशक्ती मोठ्या प्रमाणावर असलेली जनुके सापडल्यानंतर संशोधनाचे लक्ष जनुकांमध्ये तयार होणाऱ्या प्रोटेन्सवर केंद्रीत करण्यात येणार आहे. संसर्गपासून संरक्षण मिळण्यात त्यांचा हातभार लागू शकतो का, याचा अभ्यास करण्यात येणार असल्याचे डॉ. विन्ह यांनी सांगितले.
देहविक्रय करणाऱ्यांचा ‘एचआयव्ही’पासून बचाव
मानवी इतिहास पाहिला तर मलेरिया, एचआयव्ही आणि नोरोव्हायरससारख्या विषाणूंच्या संपर्कात येऊनही अनेकजण संसर्गापासून मुक्त राहिले, असे दिसून येते. विषाणूंना दूर ठेवणारे रेणू अशा लोकांच्या शरीरात उपस्थित असल्याचा शोध लागल्यानंतर त्यांचा वापर औषधोपचारात करण्यात आला, ही बाब डॉ. विन्ह यांनी सोदाहरण स्पष्ट केली. केनियातील देहविक्रय करणाऱ्या गटाच्या उदाहरणावरून हा निष्कर्ष योग्य असल्याचे दिसून आले. ‘एचआयव्ही’ विषाणूच्या संपर्कात येऊनही त्याविरोधातील रोगप्रतिकारशक्ती त्यांच्या शरीरात नैसर्गिकरित्याच असल्याने त्यांना संसर्ग होऊ शकला नाही. जनुकांच्या आधारे अशा प्रतिकार क्षमतेचा शोध घेतला असता शास्त्रज्ञांना एक अनपेक्षित जनुक आढळले. आधीच्या जनुकांचा हा नवा अवतार होता. देहविक्रय करणाऱ्यांचा ‘एचआयव्ही’पासून बचाव त्यापासून होत होता.‘एचआयव्ही’ विषाणूची पेशींमध्ये प्रवेश करून संक्रमित करण्याची क्षमता रोखून धरणाऱ्या अतिप्रभावी विषाणूरोधकाचा विकास यामधूनच झाला, अशी माहिती त्यांनी दिली.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”