Kashi Vishwanath: काशी, मणिकर्णिका घाट आणि ‘स्मशान’ शांतता! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काशी, मणिकर्णिका घाट आणि ‘स्मशान’ शांतता!}
थरारक, अविस्मरणीय अनुभव

काशी, मणिकर्णिका घाट आणि ‘स्मशान’ शांतता!

काशी, मणिकर्णिका घाट आणि ‘स्मशान’ शांतता!काशीतील मणिकर्णिक या घाटावर दिवसभरात ३०० ते ५०० जणांवर दाहसंस्कार केले जातात. मृतावर गंगेच्या काठावर अंत्यसंस्कार करून गंगेत त्याच्या अस्थींचं विसर्जन केल्यानंतर मृतात्म्याला थेट स्वर्गाची दारं खुली होतात, असं म्हटलं जातं. त्यासाठीचाच हा सारा खटाटोप असतो. या घाटावर मी १० मिनिटं उभं राहिलो, काही फोटो काढले, व्हिडिओ शूटिंगही केलं. जळणारे मृतदेह, मोठ्या बांबूच्या साहाय्याने चिता सावरणारे तेथील कर्मचारी आणि बाजूला उभे असलेले शोकाकूल नातेवाईक असंच चित्र प्रत्येक चितेच्या भोवती दिसत होतं...देशातील अंत्यसंस्कारांसाठीचं सर्वांत ‘पवित्र’ स्थान असलेल्या गंगेच्या मणिकर्णिका घाटावरचा हा अविस्मरणीय अनुभव...(Experience on Kashi Manakarnika Ghat)

एखादं शहर काही कारण नसताना आपल्या मनात खोलवर जाऊन बसतं. लहानपणापासूनच अशा शहरांची यादी मनात घर करते. अनेकांनी काशीला (Kashi) गेल्यावर तिथं कलयुगाशी संपर्क तुटल्याची भावना अनुभवतात, असं सांगितलं होतं. काशीत गेल्यावर हा अनुभव घेण्यासाठी मी मणिकर्णिका या घाटावर जाण्याचा निर्णय घेतला. नीरज घायवान यांच्या ‘मसान’ (Maasan) या चित्रपटात हा घाट आणि तिथले अंत्यविधी, ही काम करणाऱ्या लोकांची कैफियत पाहिली होती.

हॉटेलवाल्यानं मणिकर्णिका घाटावरून जाताना अनेकांना भीती वाटते, तुम्हाला वाटणार असंल तर जाऊ नका, असा सल्ला दिला. थोडी भीती होती व उगाच कशाला स्मशान घाटावरून जायचं असंही वाटत होतं. मात्र, मला काशी विश्‍वनाथ कॉरिडोरला जायचं होतं आणि त्यासाठी पायी जाण्याचा हा शॉर्टकट होता. माझ्याकडं वेळही कमी होता म्हणून मी मणिकर्णिका घाटावर जायचा निर्णय घेतला.

हॉटेलपासून थोडं चालत गेल्यावर आणि २ किलोमीटर अंतरात १५ वेळा दिशा विचारल्यावर या घाटाजवळ जाऊन पोचलो. सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती आणि बाजूनं चालत असलेले जवळपास सर्वच जण अंत्यविधी या एकाच कामासाठी घाटाकडं निघालेले होते. मृतांच्या नातेवाइकांमध्ये तरुण-तरुण, वृद्धा महिलांचं प्रमाण अधिक दिसत होतं.

मणिकर्णिका घाट जवळ येताच स्मशान शांतता म्हणजे काय याचा अनुभव यायला सुरवात होते. समोर गंगेचं विस्तीर्ण आणि पवित्र पात्र दिसत असतं. गंगेपाशी पोचल्यानंतर अनेक चिता रचलेल्या दिसतात. या चितांसाठी लाकडाचे शेकडो फूट उंचीचे ढीग एका बाजूला रचून ठेवलेले दिसतात. ही काम करणारी लोकं अत्यंत थंडपणानं आपलं चिता रचण्याचं काम करीत असल्याचं पाहिल्यावर थोडं विचित्र वाटू लागतं. या घाटावर दिवसभरात ३०० ते ५०० जणांवर दाहसंस्कार केले जातात.

मृतावर गंगेच्या काठावर अंत्यसंस्कार करून गंगेत त्याच्या अस्थिंचं विसर्जन केल्यानंतर मृतात्म्याला थेट स्वर्गाची दारं खुली होतात, असं म्हटलं जातं. त्यासाठीचाच हा सारा खटाटोप असतो. तर, या घाटावर मी १० मिनिटं उभं राहिलो, काही फोटो काढले, व्हिडिओ शूटिंगही केलं. जळणारे मृतदेह, मोठ्या बांबूच्या साहाय्याने चिता ठीकठाक करणारे तेथील कर्मचारी आणि बाजूला उभे असलेले शोकाकूल नातेवाईक असंच चित्र प्रत्येक चितेच्या भोवती दिसत राहतं.

तिथं उभं राहिल्यावर कलयुगाशी संपर्क तुटतो, ही स्थिती मात्र मला अनुभवता आला नाही. तिथून पुढं काशी विश्‍वनाथ कॉरिडोरवर जाऊन काशी विश्‍वनाथाचं दर्शन घेतलं व नंतर गंगेतून होडीची सैर करण्यासाठी गेलो. गंगा आरतीमध्ये होडीतून सहभागी होण्याचीही सोय आहे. बोटीमध्ये बसून ही गंगाआरती अनुभवणं एक अविस्मरणीय अनुभव ठरतो. साधारण एक तास चालणारी ही आरती, त्यातील धीरगंभीर स्तोत्रपठण, गंगेचा खळाळणारा नाद आणि भाविकांचं अत्यंत शांतपणे हे सगळं अनुभवणं केवळ अवर्णनीय.

गंगेची आरती साडेसात वाजता संपली आणि मला मणिकर्णिका घाटावरून माझ्या हॉटेलचा पत्ता माहिती असल्यानं मी त्याला पुन्हा मणिकर्णिका घाटावर सोडण्याची विनंती होडीवाल्याला केली. आता चांगलीच रात्र पडली होती आणि गंगेच्या या घाटावर आता अनेक प्रेतं जळताना दिसत होती.

सुरवातीला उल्लेख केलेल्या ‘मसान’ या चित्रपटामधील प्रसंग डोळ्यासमोरून जात होते. चित्रपटाच्या काशीमध्ये राहणाऱ्या नायकानं व त्याच्या प्रेयसीनं एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतलेल्या असतात. त्याचवेळी तिचं कुटुंब चारधाम यात्रेसाठी निघतं. बसमधून निघालेलं हे कुटुंब उत्तर प्रदेशच्या सीमेवर पोचलेलं असतानाच बसला अपघात होतो व ते सर्व प्रवासी मारले जातात. या कुटुंबाला रात्री उशिरा दाहसंस्कारासाठी घाटावर आणलं जातं.

ही प्रेतं जाळण्याचं काम नायकांचं कुटुंब करीत असतं आणि नायक इंजिनिअरिंग शिक्षण घेत असतो. मोठ्या प्रमाणावर प्रेतं घाटावर आल्यानं नायकाचा भाऊ त्याला मदतीसाठी झोपेतून उठवतो व नायक हातात बांबू घेऊन चिता व्यवस्थित करण्याचं काम सुरू करतो. त्याचवेळी त्याला एका प्रेताच्या हातातील अंगठीवरून ही आपली प्रेयसी असल्याचा संशय येतो आणि चादर दूर करताच त्याला ही आपली प्रेयसीच असल्याचं समजतं.

एखाद्या प्रियकराच्या आयुष्यात आपल्याच प्रेयसीची चिता जाळण्याचं दुर्भाग्य आल्याचं कथेमध्येही पाहणं अंगावर येतं. त्यानंतर नायकानं ‘साला ये दुःख काहे खतम नही होता बे..’ असं म्हणत फोडलेला हंबरडा सारा आसमंत हेलावून सोडतो. हा प्रसंग आणि धगधगणारी चिता यांचं काहीतरी अद्वैत मनात साचलेलं होतं व ते होडी या घाटाच्या दिशेनं गंगेच्या पात्रातून पुढं सरकत असताना समोर दिसत होतं.

रात्रीच्या अंधारात मणिकर्णिका घाटावर उतरलो आणि पेटलेल्या चितांच्या बाजूनं चालत जात घाटाच्या पायऱ्या चढायला सुरवात केली. चितांच्या आगीची धग, नातेवाईकांचे अस्पष्ट हुंदके अशा वातावरणातून पुढं जात राहिलो. घाट मागं पडत होता आणि मुख्य रस्ता लागला तशी मनात दाटलेली स्मशान शांतता कमी होत गेली.देशातील अंत्यसंस्कारांसाठीचं सर्वांत ‘पवित्र’ स्थान असलेल्या गंगेच्या मणिकर्णिका घाटावरचा हा अनुभव अविस्मरणीय होता.

कलियुगाशी नातं तुटल्याचा अनुभव मला आला नाही, मात्र गंगा आरतीच्या वेळी जाणवलेली शांतता व समाधी अवस्था खूप प्रयत्न करून सुद्धा मिळत नाही, हे नक्की सांगता येईल. अर्थात, ज्यांनी आपली प्रिय व्यक्ती गमावलेली व्यक्ती या घाटावर आल्यास त्याची मानसिकता नक्कीच वेगळी, असणार यात शंका नाही.

मणिकर्णिका घाटाचे पुनर्निर्माण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी अर्थात वाराणसीचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचा संकल्प या शहरातून निवडून आल्यानंतर केला आहे. पहिल्या टप्प्यात काशी विश्‍वनाथ कॉरिडॉर हा ९०० कोटी रुपयांचा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. हे काम पूर्ण झाल्यानंतर आता मणिकर्णिक घाटाच्या पुनर्निमाणाचे काम हाती घेण्यात आले आहे. काशी विश्‍वनाथ कॉरिडोरपासून या घाटाचे अंतर साधारण ४०० मीटर आहे.

गंगा नदीच्या काठाने दगडी पायऱ्या बसवत मणिकर्णिका घाटाचे काम सुरवातीला केले गेले. आता मणिकर्णिका घाटाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम सुरू आहे. घाटावरील देवळांचा मुख्य ढाचा कायम ठेवत त्यांचे सौंदर्यीकरण केले जात आहे व घाटाच्या पायऱ्या नव्याने, गुलाबी-लाल रंगाच्या दगडांत नव्यानं उभारल्या जात आहेत.

हे काम पूर्ण झाल्यानंतर गंगेत जाणारा कचरा कमी होईल व अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांसाठी अधिक सुविधा निर्माण केल्या जातील असे सांगितले जाते आहे. विजेच्या दिव्यांची अधिक चांगली व्यवस्था व खराब झालेल्या पायऱ्या काढल्यानं या परिसराचा चेहरा-मोहरा बदलेल असं दिसतं आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर घाटाच्या स्थितीमध्ये काय बदल झाला, हे पाहावे लागेल.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top