Natu Natu Song- 'नाटू नाटू..'ला मिळाला पुरस्कार..पण पुढे काय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाटू नाटूचा आनंदोत्सव}

'नाटू नाटू..'ला मिळाला पुरस्कार..पण पुढे काय?

गिरीष वानखेडे

आरआरआर मधल्या 'नाटू नाटू' गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. पण भारतीय चित्रपटसृष्टी केवळ गाण्यांमुळेच ओळखली जावी असं नाही. या पलीकडे जाऊनही चित्रपट निर्मीतीचा विचार व्हायला हवा....

‘आरआरआर’मधील ‘नाटू नाटू’ या गाण्याने ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कारावर नाव कोरले आहे. जगाने आपल्याला ‘द बेस्ट’ म्हणून पावती दिली आहे, त्याचा आनंदोत्सव साजरा केला पाहिजे. एका वेळी अनेक क्षेत्रात पारंगत असणं अशक्य आहे. त्यामुळे जे नाही त्याची खंत बाळगण्यापेक्षा आपल्याकडे जे उत्तम आहे, ते आणखीन उत्तम कसे करता येईल, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जो पुरस्कार आपल्याला मिळाला नाही, आपण त्या क्षेत्रात खरोखरच कमकुवत आहोत हे जाणले पाहिजे. त्यात उत्कृष्टता साधण्यासाठी काय उपाययोजना करायला हवी, यावर चर्चा करणे गरजेचे आहे. (Indian Film Industry RRR and Natu Natu Song entertainment news in Marathi)

आरआरआरच्या ‘नाटू नाटू’ (Natu Natu)या गाण्याने ओरिजिनल साँग विभागात गोल्डन ग्लोब पुरस्कारावर आपले नाव कोरण्यात यश मिळवले. या चित्रपटाची निर्मिती केली होती. डी. व्ही. व्ही. एन्टरटेन्मेंटच्या डीव्हीव्ही दानय्या यांनी. दिग्दर्शन होते एस. एस. राजामौली यांचे. या गाण्याला संगीतसाज चढवला होता एम. एम. किरावानी यांनी; तर शब्द होते चंद्रबोस यांचे. आणि मूळ तेलुगू गाणं गायलं होतं राहुल सिपलीगंज आणि कालभैरव या दोघा गायकांनी.

या गाण्यावर रामचरण तेज आणि ज्युनिअर एनटीआर यांना नाचवले आहे प्रेम रक्षित या कोरिओग्राफरने. विशेषत्वाने सांगण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे, या गाण्याचे चित्रीकरण युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या बंगल्याच्या परिसरात करण्यात आले आहे. या गाण्याचे चित्रीकरण झाल्यानंतर दोन-तीन महिन्यांमध्येच रशियाने युक्रेनवर हल्ला केला. आता हा बंगला मोठ्या प्रमाणात उध्वस्त झाला आहे. इतकी सुंदर जागा उध्वस्त झाल्याबद्दल चित्रपटाच्या टीमने दुःख व्यक्त केले होते. युद्धापूर्वीच्या युक्रेनचे दर्शन जगाला आता या गाण्यातूनच होऊ शकते.
गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

राजमौली, त्यांची पत्नी रमा राजामौली, त्याचे संगीतकार एम. एम. किरावानी, रामचरण तेज, ज्युनिअर एन. टी. आर हेदेखील उपस्थित होते. या गाण्याने रेहाना, टायलर यासारख्या आपल्या दिग्गज प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत हा पुरस्कार मिळवला आहे. किरावानी आणि राजमौली यांनी एकत्रितपणे अनेक चित्रपट केले आहेत. किरावानी यांनी हिंदीत यापूर्वी जख्म, पहेली, स्पेशल२६, बेबी यांच्यासह अनेक चित्रपटांना संगीत दिले आहे. प्रसिद्ध मराठी संगीतकार सुधीर फडके यांना ते आपले आदरस्थान मानतात.

आरआरआर चित्रपटाला बेस्ट नॉन इंग्लिश फिल्म या विभागातही नामांकन मिळालेले होते. या विभागात मात्र या चित्रपटाला पुरस्कार मिळवता आला नाही. तो पुरस्कार अर्जेंटिना १९८५ या चित्रपटाला मिळाला. या अनुषंगाने आपण चांगले चित्रपट तयार करण्यात तरबेज आहोत की चांगली गाणी करण्यात, यांचा विचार व्हायला हवा. गोल्डन ग्लोब पुरस्काराचे बेस्ट नॉन इंग्लिश फिल्म नामांकन भारतीय चित्रपटाला मिळत असेल, तर आपण चांगले चित्रपट तयार करू शकतो, यात शंकाच नाही. हा चित्रपट जगभरातल्या प्रेक्षकांनी पाहिला आणि पसंतही केला. अमेरिका आणि इंग्लंड यांसारख्या देशांमध्ये या चित्रपटाची क्रेझ आहे.

नाटू नाटू या गाण्यावर लोकांनी आजवर लाखोंच्या संख्येने शॉर्ट व्हिडीओज तयार केले आहेत. आंतरराष्ट्रीय चित्रपट कलाकारांनीदेखील या चित्रपटाचे आणि या गाण्याचे कौतुक केले आहे. या गाण्याच्या सफलतेनंतर शाहरुख खाननेदेखील ट्विटद्वारे गाण्याची प्रशंसा केली होती. जेसिका चेस्टियन हिने हा चित्रपट पाहणे म्हणजे एखादी पार्टी एन्जॉय करण्याचा आनंद मिळवणे आहे, अशा शब्दात कौतुक केले होते. जगभरात बॉक्स ऑफिसवर अमाप यश आणि पैसा कमावला आहे. ओटीटीवरदेखील विक्रमी प्रेक्षक मिळवले. असे असूनही या चित्रपटाला पुरस्कार न मिळता फक्त चित्रपटातल्या गाण्याला पुरस्कार मिळाला. म्हणजेच काय तर गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये आपण आपल्या गाणी आणि नृत्य याद्वारे आपली ओळख निर्माण करू शकलो.

हे देखिल वाचा-

हेही वाचा: ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

जगभरातल्या अनेक चित्रपट महोत्सवामध्ये आपले चित्रपट जातात. चर्चा होते. असे असूनही जर का कोणी फक्त भारतीय गाणी आणि नृत्य यांचीच चर्चा करत असेल, तर हे लक्षात घ्यायला हवे की भारतीय चित्रपटातील गाणी खरोखरच उत्कृष्ट दर्जाची बनवली जातात. या क्षेत्रात कोणीही आपल्याशी स्पर्धा करू शकत नाही. याविरुद्ध आपण उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहोत; पण त्यात आपल्याला अजूनही यश मिळालेले नाही.

आपण हॉलीवुडसारखे स्पेशल इफेक्ट्स वापरून ब्रह्मास्त्र, आर्यवन यासारखे चित्रपट तयार केले. मात्र आपल्या चित्रपटांना हॉलीवूडची सर नाही. ॲक्शन चित्रपट या प्रकारातही आपण असेच फिके पडतो. हॉलीवूडचे जॉनविक, निऑन, मिशन इम्पॉसिबल सीरिज यांसारख्या चित्रपटांची बरोबरी भारतीय चित्रपट करू शकत नाहीत.

ॲनिमेशन हादेखील आपल्यासाठी असाच न जमलेला प्रकार आहे. भारतीय ॲनिमेशन अजूनही छोटा भीम आणि हनुमान यांच्या पुढे जाऊ शकले नाहीत. अवतारसारख्या ॲनिमेशन चित्रपटात जो फ्लो मेंटेन केला आहे ती कला आपल्याला अजूनही जमलेली नाही. अजून एक महत्त्वपूर्ण चित्रपटांचा प्रकार म्हणजे हॉरर चित्रपट किंवा भयपट. भारतात कायम विनोदी हॉरर चित्रपट तयार झाले आहेत. त्यांचे हॉरर चित्रपट जेव्हा आपण पाहतो तेव्हा खरोखरच आपल्या शरीरात थरकाप जाणवतो. यावरूनच हे लक्षात येते की हॉरर चित्रपट हा एक किती कमालीचा प्रकार आहे आणि आपण आजही त्यात मागे आहोत. त्यांच्या काँजुरिंग, सायको, ईव्हिल्स डेथ यांसारख्या चित्रपटांची तुलना आपल्या हॉरर चित्रपटांशी करून बघा. त्यातला फरक अनुभवता येईल.

क्रियेचर अर्थात प्राणीपट हा प्रकारही अजून आपल्याला जमलेला नाही. असे चित्रपट हॉलीवूडमध्ये नेहमीच बनत आलेले आहेत. उदाहरणार्थ, नुकताच आलेला बीस्ट हा चित्रपट. या चित्रपटात सिंह आणि माणसाचे मिश्रण असलेल्या प्राण्याची कल्पना केली होती. जुरासिक पार्क, किंग काँग ही अजून काही उदाहरणे. आपण या प्रकारचे चित्रपट तयार करत नाही. तयार केले असले तरीही त्याबद्दल बोलत नाही. कारण त्या चित्रपटाचे निर्माते स्वतःच त्या चित्रपटाच्या दर्जाबद्दल साशंक असतात.

तंत्रज्ञान या विषयावर हॉलीवूडने आर्टिफिशियल इंटेलिजन्स, विज्ञानाचे वेगवेगळे प्रयोग अशा विषयांवर अनेक चित्रपट तयार केले आहेत. आपण मात्र या प्रकारच्या चित्रपट निर्मितीत अंधारात चाचपडत आहोत. आपण तयार केलेले ‘मिशन मंगल’सारखे विज्ञानपट या चित्रपटांच्या तुलनेत कैक मैल मागे आहेत.

भारतात तयार होणारे सामाजिक चित्रपट यामध्ये दोन वर्गांमधला संघर्ष, जातिवाद, वर्णभेद यांची मांडणी केलेली असते, तेदेखील कोरियन चित्रपटांच्या तुलनेत मागे पडतात. स्नो पियर्सर, पॅरासाईट हे चित्रपट पाहिले की हा फरक जाणवतो. कधी काळी भारतात तयार झालेले ‘दो बीघा जमीन’सारखे चित्रपट किंवा भारतातला समांतर सिनेमा या चित्रपटांना तोडीस तोड ठरणारा होता. आता मात्र भारतात आता अशा चित्रपटांची निर्मिती जवळपास बंदच झाली आहे. मग जर आपण जुन्या भारतीय चित्रपटांच्या तुलनेचे चित्रपट तयार करत नसू, तर मग आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण तग कसे धरणार?

हे देखिल वाचा-

हेही वाचा: शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

फ्रेंच चित्रपटांमध्ये दाखवला जाणारा जो भावनात्मक आणि नैसर्गिक वाटणारा रोमान्स दाखवला जातो, तो आपल्या चित्रपटांमध्ये अजूनही दिसून येत नाही. भारताबाहेरच्या चित्रपटांमध्ये प्रत्येक प्रेमकथेत काहीतरी नावीन्य पाहायला मिळते. इन द मूड ऑफ लव या चित्रपटाचे उदाहरण पाहू. या चित्रपटाची कथा आणि कथेची मांडणी दोन्हीमध्ये जिवंतपणा आहे. या कथेचे चित्रणदेखील खूपच कँडीड आहे. नाही म्हणायला मल्याळम चित्रपट या प्रकारात आपला दर्जा बाळगून आहेत. कारण मल्याळम चित्रपटांमध्ये लोकेशनलादेखील चित्रपटाच्या एका व्यक्तिरेखेप्रमाणे वागणूक दिली जाते. स्पेनमधले चित्रपटदेखील या प्रकारात उत्तम मानले जातात.

ऑल अबाउट माय मदर, क्रिस्टिना बार्सिलोना हे चित्रपट मानवी संबंध फारच उत्कृष्टरीत्या मांडताना दिसतात. बाहेरचे बरेच चित्रपट हे आत्मचरित्रात्मक असतात. असे असले तरीही त्यांची मांडणी आणि त्यांचे चित्रण फारच कौशल्यपूर्ण असते. त्यामुळे असे चित्रपट पाहणे आनंददायक असते. माझीदि यांचे इराणी चित्रपटदेखील मानवी नातेसंबंध फारच हळुवारपणे मांडताना दिसतात. माझीदि यांच्या चिल्ड्रन ऑफ हेवन चित्रपटाचा भारतीय रिमेक त्यांच्या मूळ चित्रपटाची बरोबरीदेखील साधू शकला नाही.

या सर्व निरीक्षणांवरून एक गोष्ट लक्षात येते की, भारतीय चित्रपट वेगवेगळ्या क्षेत्रात अजूनही इतर देशांच्या तुलनेत खूपच मागे आहे. मल्याळम चित्रपट काही प्रमाणात कॅरेक्टर ड्रीव्हन आहे आणि आजकाल त्यामध्ये थोडे ग्लॅमर आणि थोडा फिल्मी मसाला टाकून उत्तम चित्रपट बनवण्यात राजामौली यशस्वी होत आहेत. दक्षिणेच्या चित्रपटाने हा जो प्रवास सुरू केला आहे, त्यामुळे भारतीय उत्कृष्ट गाणी तयार करण्यात तरबेज आहेत, हे लक्षात येते. आपण भारतीय कशात मागे आहोत, हे तर जाणून घ्यायलाच हवे; पण आपण कशात निष्णात आहोत, याचा अभिमानदेखील बाळगायला हवा.

आपण मदर इंडिया, दीवार, हम आपके है कौन, दिल तो पागल है, कुछ कुछ होता है यांसारखे चित्रपट तयार करण्यात एक्सपर्ट आहोत आणि यासारख्या चित्रपटांसाठीच जगभरात ओळखले जातो. म्हणूनच, आरआरआर हा चित्रपट उत्कृष्ट नॉन इंग्लिश फिल्म विभागात जिंकू शकला नाही, याचे दुःख न मानता आपण ज्यात प्रवीण आहोत अशा गाण्यांच्या निर्मितीत मिळालेल्या पुरस्काराचा आनंद साजरा करण्याची ही वेळ आहे. भारतीय संगीत सृजनात आजही ही ताकद आहे की ते संपूर्ण जगाला आपल्या तालावर ठेका धरायला लावू शकते आणि उभे राहून आदराने आपल्या गाण्याला ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार दिला जातो.

जगाने आपल्याला ‘द बेस्ट’ म्हणून ज्याची पावती दिली आहे, त्याचा आनंदोत्सव साजरा केला पाहिजे. कारण एका वेळी अनेक क्षेत्रात पारंगत असणं अशक्यच आहे. त्यामुळे जे नाही त्याची खंत बाळगण्यापेक्षा आपल्याकडे जे उत्तम आहे, ते आणखीन उत्तम कसे करता येईल, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जो पुरस्कार आपल्याला मिळाला नाही, आपण त्या क्षेत्रात खरोखरच कमकुवत आहोत, हे जाणले पाहिजे. त्यात उत्कृष्टता साधण्यासाठी काय उपाययोजना करायला हवी, यावर चर्चा करणे गरजेचे आहे. ही उत्कृष्टता आपल्याला एका रात्रीत साधता येणार नाही. त्यासाठी निरंतर मेहनत घेतली पाहिजे. संगीत आणि नृत्य भारतीय जीवनाचा अविभाज्य भाग आहे. यात जागतिक दर्जाचा पुरस्कार मिळवणे ही खरोखरच आनंदाची बाब आहे. आपल्या ‘नाटू नाटू’ या गाण्याने संपूर्ण जगाला मोहिनी घातली आहे, ही बाब अभिमानास्पद आहे.

टॅग्स :movierrr movie