K V Rubiya
K V Rubiya E sakal

पोलिओ आणि कॅन्सरही त्यांच्या जिद्दीपुढे जिंकू शकले नाही...

के व्ही रुबिया यांचं आत्मचरित्रही प्रकाशित झालेय

काही लोक छोट्या छोट्या समस्यांमुळे हार पत्करतात. पण काही लोक स्वतःच्या अडचणींवर फक्त मातच करत नाहीत तर ते इतरांना मदत करून उभे राहण्यास साथ देतात व आपली एक वेगळी ओळख निर्माण करतात. के. व्ही. रुबिया त्यातल्याच एक. भारत सरकारच्या २०२२ च्या पद्म पुरस्कार यादीत अनेक महिलांचा समावेश आहे. या महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. यातील काही महिलांनी आपले संपूर्ण जीवनच संस्कृती, पर्यावरण व सामान्य लोकांसाठी समर्पित केलेले आहे. केरळमधील के. व्हि. रुबिया त्यातल्याच एक. दोन्ही पायांनी चालू न शकणाऱ्या रुबिया व्हील चेअरवर फिरून लोकांना एक वेगळीच प्रेरणा देतात. सरकारने त्या पद्मश्री हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे, पण त्यांचा जीवन प्रवास अत्यंत खडतर आहे. जीवनाच्या प्रवासात के. व्ही. रुबिया यांना पायांनी साथ दिली नाही पण मजबूत आत्मविश्‍वासाच्या बळावर त्यांनी स्वतःला कधी आपले ध्येय गाठण्यापासून रोखू दिले नाही.

दोन्ही पाय निकामी व पुन्हा-पुन्हा झालेले अपघातानंतरही त्यांनी जे कार्य केले आहे ते खरोखरच प्रेरणादायक आहे. म्हणून यंदाचा पद्मश्री सन्मान रुबिया यांच्यापर्यंत पोचला आहे. त्यांच्या कार्यामुळे त्या बऱ्याच जणांच्या ‘रोड मॉडेल ठरल्या आहेत. दोन्ही पाय निकामी झाले म्हणून त्या नाउमेद झाल्या नाहीत. उलट जसं कळायला लागलं तेव्हापासून त्या समाजकार्यामध्येच मग्न झाल्या.

केरळमध्ये साक्षरता मिशनचं काम सुरू झालं, तेव्हा त्यांनी त्या कामाला वाहून घेतलं आणि त्या साक्षरतेच्या दूतच बनल्या. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना साक्षर करण्यासाठी त्यांनी जास्त मेहनत घेतली. नंतर केवळ साक्षरता पुरेशी नाही, तर इतर प्रकारचं शिक्षण आणि कौशल्यविकासाची गंगा तळागाळापर्यंत पोचवली पाहिजे, हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्या दिशेनं कार्य सुरू केलं. ‘चलानम’ नावाची संस्था त्यांनी त्यासाठी स्थापन केली आणि तिच्यामार्फत त्या काम करतात. कौशल्यविकासावर त्यांनी भर ठेवला आहे. आपल्या या सगळ्या आयुष्याबाबत त्यांनी ‘स्वप्नांगलक्कू चित्रकुकालंद’ या नावाचं आत्मचरित्रही लिहिलं आहे.
पोलिओने दोन्ही पाय निकामी झालेले असतानाही रुबिया यांनी स्वतःला दुसऱ्यांपेक्षा कमी लेखले नाही. त्यांच्या धौर्याला संपूर्ण देश सलाम करत आहे. व्हील चेअरवरून आपली लढाई लढणाऱ्या रुबिया यांची म्हणून तर पद्मश्री सन्मानासाठी सरकारने निवड केली.

एक समाजसेविका म्हणून त्यांचा केंद्र सरकारने पद्मश्री देऊन गौरव केला आहे. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९६६ रोजी मलप्पुरम जिल्ह्यातील तिरुरंगाडी जवळील वेल्लिलक्कड गावात झाला. त्यांना पोलिओ झाला होता. त्यामुळे व्हील चेअरच त्यांचे पाय बनले. व्हील चेअरवरूनच त्यांनी शिक्षण पूर्ण केलं व शिक्षिका बनल्या. ज्ञानदान करतानाच त्यांनी समाज सुधारणेच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. एक शिक्षिकेच्या रूपाने त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य केले आहे. त्याला समाजसेवेची जोड देत त्यांनी अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविले. एक काळ असा होती की त्यांच्या गावात रस्ता, वीज, पिण्याचे पाणी अशा सुविधा नव्हत्या.

आज त्यांच्या प्रयत्नामुळे गावात नवे रस्ते, वीज, दूरध्वनी जोड आणि पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. रुबिया यांनी ‘चलानम’ नावाने एक संस्था सुरू केली आहे. या संस्थेद्वारा त्यांनी दिव्यांग मुलांसाठी कित्येक शाळा सुरू केल्या आहेत. एवढेच नाही तर महिला सशक्तीकरणा साठीही त्यांनी आवाज उठवला आहे. हुंडा, दारू, अंधश्रद्धा आणि नक्षलवादसारख्या सामाजिक प्रश्‍नांविरुद्ध त्या लढा देत आहेत. त्यांच्या प्रयत्नातून अनेक महिलांनी स्वतःची दुकाने सुरू केली आहेत. महिलांसाठी ग्रंथालयही त्यांनी सुरू केले आहे.

आघातवर आघात
आधीच पोलिओमुळे त्यांना दोन्ही पाय गमवावे लागले. पण एवढ्यावरच त्यांच्या मागच्या समस्या थांबल्या नाहीत. त्यांना कर्करोगाचीही लागण झाली. २००० मध्ये त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. अनेक महिने उपचार व किमोथेरेपीमुळे त्या कर्करोगातून उभ्या राहिल्या. पण काही वर्षांनी त्यांच्यावर आणखी एक आघात झाला. बाथरूममध्ये पडल्याने त्यांच्या नशिबातील व्हीलचेअर गेली व अंथरुणावर झोपून राहण्याची वेळ आली. या घटनांमुळेच रुबिया यांच्या शरीरावर आघात झाले असतील पण त्यांच्या आतील शक्तीवर मात्र कोणताही परिणाम झाला नाही. अंथरुणावरअसतानाही त्यांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं. अंथरुणावर पडून राहावे लागल्याने मिळालेल्या वेळेत त्यांनी कित्येक पुस्तकांचे लिखाण केले.

रुबिया यांचे आत्मचरित्र
रुबिया यांचे आत्मचरित्र ‘स्वप्नांगलक्कू चित्रकुकालंद’ (‘ड्रीम्स हॅव विंग्स’) हे २०१९ मध्ये प्रकाशित झाले होते. याशिवाय त्यांनी आणखी तीन पुस्तकांचे लिखाण केले. त्या पुस्तकांच्या विक्रीतून त्यांना स्वतःवरील उपचारासाठी पैसे मिळाले.

पद्मश्री’च्या आधी अनेक पुरस्कार
रुबिया यांना १९९४ मध्ये केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाकडून राष्ट्रीय युवा पुरस्कार आणि २००० मध्ये केंद्रीय बाल विकास मंत्रालयाकडून कन्नकी स्त्री शक्ति पुरस्कार देण्यात आला. या शिवाय त्यांना अनेक केंद्रीय व राज्य पुरस्कारही मिळाले आहेत. दरवर्षी स्वतंत्र्यदिनानिमित्त पद्म पुरस्कारांची घोषणा होते. २०२२ मधील विजेत्यांमध्ये राबिया यांचा समावेश झाल्याचे समजल्यावर अनेकांना जगण्याची प्रेरणा मिळाली.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com