Sakal Premium Article: जाणून घ्या एका शूर हेराबद्दल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय हेरखात्याचा 'ब्लॅक टायगर'... }

भारतीय हेरखात्याचा 'ब्लॅक टायगर'...

बाॅलीवूडचा अभिनेता सलमान खान एका बायोपिकमध्ये काम करणार आहे असे वृत्त गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्याच्या अखेरीस प्रसिद्ध झाले होते. रविंदर कौशिक या एका हेराच्या जीवनावरचा हा बायोपिक आहे असे सांगण्यात आले होते....चला तर जाणून घेऊ कोण होता हा रविंदर कौशिक....(Know about Black Tiger Indian Spy)

कुलभूषण जाधव हे पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. पाकिस्तानच्या न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. जाधव यांना वाचविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न भारत सरकार करते आहे. जाधव हे भारताचे हेर आहेत, राॅचे एजंट आहेत आणि त्यांना बलुचिस्तानमध्ये आम्ही पकडले असा पाकिस्तानचा दाव आहे. तर जाधव हे पाकिस्तानात कधीच गेले नव्हते, त्यांना इराण येथे पकडून पाकिस्तानात नेण्यात आले, अशी भारताची बाजू आहे.

एकमेकांचे शत्रू असलेल्या राजांकडे किंवा राष्ट्रांमध्ये आपले हेर घुसविण्याचे तंत्र पुराणकाळापासून अवलंबले जाते. सध्याच्या काळात त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे एवढेच. पाकिस्तानचे काश्मीर प्रश्नावरुन भारताशी असलेले वैर हा देश भारतापासून वेगळा झाल्यापासून आजपर्यंत सुरुच आहे. त्यामुळे एकमेकांवर हेरगिरी करण्याचा खेळ सुरु राहणार हे काही नविन नाही.

असाच एक हेर भारताच्या रिसर्च अँड अॅनॅलिसिस विंगने (राॅ) पाकिस्तानात घुसवला होता. तब्बल तीस वर्षे त्यांने पाकिस्तानात राहून भारतीय सैन्यासाठी हेरगिरी केली होती.

रविंदर कौशिकचा जन्म राजस्थानातील श्री गंगानगर येथे १९५२ मध्ये एका पंजाबी कुटुंबात झाला होता. त्याला नाटकात काम करण्याची हौस होती. तो काही स्टेज शो सुद्धा करायचा. नेमका हाच गुण 'राॅ'ने हेरला आणि कौशिकला आपला हेर (SPY) बनवले. कौशिक 'राॅ'च्या संपर्कात कसा आला, त्यापूर्वीचे त्याचे आयुष्य कसे होते, याची काहीच माहिती उपलब्ध नाही. पण वयाच्या २३ व्या वर्षी कौशिक 'राॅ'मध्ये भरती झाला. ते १९७५ साल होते.

'राॅ'ने (RAW) दिलेल्या प्रशिक्षणात कौशिकला उर्दू भाषा शिकविण्यात आली. कुराणाचा अभ्यास त्याच्याकडून घोटवून घेण्यात आला. त्याला पाकिस्तानच्या (Pakistan) भुगोलाची खडानखडा माहिती करुन देण्यात आली. एवढेच नव्हे तर त्याची सुंताही करण्यात आली. त्यानंतर 'राॅ'ने त्याची पूर्वाश्रमीची ओळख पटेल अशी सगळी कागदपत्रे नष्ट केली. त्यानंतर त्याला पाकिस्तानात पाठविण्याची तयारी सुरु झाली.

आता रविंदर कौशिकचे नवे नाव होते नबी अहमद शकीर. नव्या ओळखीनुसार तो कराची विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर होता आणि पाकिस्तानी लष्करात जाण्याची त्याची इच्छा होती. मुळचा हुशार असलेल्या 'शकीर'ने पाकिस्तानी सैन्यात कमिशन मिळवलेच. अमानत नावाच्या पाकिस्तानी युवतीशी त्याने विवाहही केला. या दांपत्याला एक मुलगी होती.

१९७९ ला तो पाकिस्तानी सैन्यात भरती झाला. तेव्हापासून तब्बल १९८३ पर्यंत त्याने भारतीय लष्कराला पाकिस्तानी सैन्याच्या अनेक महत्त्वाच्या हालचालींची आणि योजनांची गुप्त माहिती दिली होती. या काळात त्याचा सुगावाही पाकिस्तानी सैन्याला किंवा गुप्तचरांना लागला नव्हता. पाकिस्तानी लष्करात त्याला त्याच्या कामामुळे मेजरच्या हुद्द्यापर्यंत बढतीही मिळाली होती.

कौशिक तथा 'शकीर'ची किर्ती तत्कालिन पंतप्रधान (कै.) इंदिरा गांधी यांच्यापर्यंतही पोहोचली होती. खुद्द श्रीमती गांधी यांनीच त्याचे नामकरण 'ब्लॅक टायगर' असे केले होते, असे सांगितले जाते.

१९८३ चा सप्टेंबर महिना कौशिकच्या दृष्टीने दुर्दैवाचा आणि त्याच्या हेरगिरीच्या कारकिर्दीची अखेर करणारा ठरला.

उपलब्ध माहितीनुसार 'राॅ'ने इनायत मसिहा नावाच्या एका एजंटला पाकिस्ताना कौशिकची भेट घेण्यासाठी पाठवले होते. मात्र, दुर्दैवाने पाकिस्तानी गुप्तचरांच्या हाती मसिहा सापडला आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्याचा बोलते केले. तपासात त्याने कौशिकची माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांसमोर उघड केली. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी कौशिकला तातडीने अटक केली. मसिहाला पाकिस्तानी न्यायालयाने सुरुवातीला फाशीची शिक्षा सुनावली. नंतर ती जन्मठेपेत बदलण्यात आली.

पकडल्यानंतर दोन वर्षे कौशिकचा सियालकोट येथील तुरुंगात छळ करण्यात आला. त्यानंतर १६ वर्षे त्याने मियाँवाली तुरुंगात काढली. तिथेच त्याला टीबीचा विकार जडला. या आजारपणातच न्यू सेंट्रल मुलतान कारागृहात त्याचा करुण मृत्यू झाला. या तुरुंगाच्या आवारातच त्याचा मृतदेह दफन करण्यात आला.

मृत्यूशय्येवर असतानाही कौशिकने आपल्या आईला गुपचूप एक पत्र पाठवले होते. पाकिस्तानी तुरुंगात राहून त्याने हे शक्य करुन दाखवले. ''भारतासारख्या मोठ्या राष्ट्रासाठी कुर्बानी देणाऱ्यांचा असाच शेवट होतो का?'' असेही त्याने आपल्या कुटुंबाला लिहिलेल्या एका पत्रात व्यथित होऊन लिहिले होते. पाकिस्तानी तुरुंगात झालेल्या छळाबद्दलही त्याने या पत्रात लिहिले होते.

प्रसिद्ध दिग्दर्शक राज कुमार गुप्ता रविंदर कौशिकच्या जीवनावरचा बायोपिक करणार आहे. सलमान खानची त्यात प्रमुख भूमीका असेल, अशी जोरदार चर्चा होती. सध्या मात्र त्यावर काही हालचाल दिसत नाही. हा चित्रपट प्रत्यक्षात आलाच तर नव्या पिढीला इतिहासाच्या पानात दडलेल्या या शूर हेराची कहाणी समजेल.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
टॅग्स :PakistanIndia
go to top