Sakal Premium article: संसद भवन आणि ताजमहाल विकणारा नटवरलाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...संसद भवन विकणारा मि. नटवरलाल!}
एका अजब चोराची गजब कहाणी

...संसद भवन आणि ताजमहाल विकणारा मि. नटवरलाल!

अमिताभ बच्चन, रेखा, अमजदखान, अजित यांच्या भूमीका असलेला मि. नटवरलाल या चित्रपटाची ७० च्या दशकात मोठी हवा होती. आपल्या पोलिस इन्स्पेक्टर भावाला न्याय देण्यासाठी गुन्हेगाराच्या रुपात वावरुन व्हिलनचा खात्मा करणाऱ्या मि. नटवरलालची कहाणी प्रेक्षकांना पसंद पडली होती. नटवरलाल हे नांव ज्याच्यावरुन घेतलं त्या नांवाचा एक चोर प्रत्यक्षात होता आणि त्याच्या करामतीही अफलातून होत्या...कोण होता नटवरलाल...(Know about Natwarlal Big thief in India)

चोराची नोंद इतिहासात होऊ शकते? का नाही? त्याने केलेल्या चोऱ्या जर अचंब्यात पाडणाऱ्या आणि भल्याभल्यांचे डोळे फिरवणाऱ्या असल्या तर इतिहासाने नक्कीच अशा चोराचीही नोंद घ्यायला हवी. असाच एक चोर स्वतंत्र भारताच्या इतिहासात होऊन गेला, ज्याची आठवण आजही काढली जाते. नटवरलाल हा तो चोर.

ताजमहाल किंवा दिल्लीचा कुतुबमिनार अगदी जवळचं बोलायचं झालं तर पुण्याचा शनिवारवाडा कुणी विकायला काढला तर तुम्ही आम्ही त्याला वेड्यात काढू. पण या नटवरलालने ही करामतही करुन दाखवली होती. या पठ्ठ्याने चक्क ५४५ खासदारांसह भारताचे संसद भवनही विकून दाखवले होते.

त्याचे मूळ नांव मिथिलेश कुमार श्रीवास्तव. बिहारच्या सिवान जिल्ह्यातल्या बांगरा गावात त्याचा जन्म झाला. त्याचे वडील स्टेशन मास्तर होते. उमलत्या वयातच दुसऱ्यांच्या सह्या हुबेहुब करण्याच्या आपल्या 'अंगभूत कौशल्या'चा शोध मिथिलेश कुमार किंवा नटवरलालला लागला होता. त्याच्या एका शेजाऱ्याने त्याला आपले काही ड्राफ्ट बँकेत भरण्यासाठी दिले. त्यावेळी त्याला दुसऱ्यांच्या सह्या करण्याची 'कला' उमगली.

आपल्या या शेजाऱ्याच्या खात्यातून खोटी सही करुन नटवरलालने एक हजार रुपये काढले. त्यानंतरही काही वेळा त्याने अशा पद्धतीने पैसे काढले. मात्र, काही काळाने या शेजाऱ्याला आपल्या खात्यातून पैसे काढले जात असल्याचे समजल्यावर नटवरलालने कलकत्त्याला (आताचे कोलकता) पळ काढला. तिथे त्याने वाणिज्य शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. तिथल्या स्टाॅक एक्श्चेंजमध्ये ब्रोकर म्हणून काम करायला सुरुवात केली.

आपली पहिली चोरी त्याने कलकत्त्यातच केली. तिथल्या मेटकाफ स्ट्रीटवर एका गोदामात नऊ टन पोलाद पडून होते. नटवरलालने खोटी कागदपत्रे बनवून हे पोलाद आपले असल्याचे भासवून एका व्यापाऱ्याला विकले. त्यात तो पकडला गेला. त्याला सहा महिन्यांची शिक्षा झाली.

त्यानंतर काही काळ त्याने वेश्यांना दारु पाजून बेशुद्ध करुन त्यांचे दागिने आणि पैसे लांबवण्याचे गुन्हे केले. हे प्रकार वाढल्यानंतर पोलिसांत तक्रार झाली आणि एका वेश्येने त्याला ओळखले. मात्र, नटवरलाल वरचा खटला सुरु होण्याच्या एक आठवडा आधी या वेश्येचा संशयास्पद मृत्यू झाला. हा खेळ धोकादायक असल्याचे ओळखून नटवरलालने आपली 'मोडस आॅपरेंडी' बदलली. '

रेल्वे स्टेशवर जाऊन तिथल्या मालाच्या गोदामात पडलेला माल खोट्या पावत्या आणि चेक देऊन सोडवायच्या आणि त्या वस्तू बाजारात विकायच्या हा धंदा त्याने सुरु केला. मुंबईच्या टेक्स्टाईल कमिशनरचा खरेदी अधिकारी म्हणून त्याने वावरायला सुरुवात केली. त्याने नटवरलाल नावाच्या गुजराती व्यक्तीची मदत घेऊन कापूस व्यापाऱ्यांना गंडा घालायला सुरुवात केली. अशाच एका प्रकरणात मिथिलेश कुमार पकडला गेला आणि नटवरलाल गायब झाला. पोलिस मात्र मिथिलेश कुमारलाच नटवरलाल समजले आणि पुढे हेच नाव त्याला चिकटले.

एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीवर केवळ एक नजर टाकली तरी नटवरलाल त्याची नक्कल करु शकायचा. परदेशातून पर्यटनाला आलेल्या व्यक्ती त्याने टार्गेट केल्या होत्या. सरकारी अधिकारी असल्याचे भासवून त्याने ताजमहाल तीन वेळा, लाल किल्ला दोन वेळा, राष्ट्रपती भवन एक वेळा आणि ५४५ खासदारांसह संसद भवन एक वेळा विकले होते.

दिवंगत माजी मंत्री एन. डी. तिवारी यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे भासवून त्याने दिल्लीच्या एका व्यापाऱ्य़ाला मोठा गंडा घातला होता. त्याने भारताचे पहिले राष्ट्रपती डाॅ. राजेंद्र प्रसाद यांचीही बनावट स्वाक्षरी केली होती असे सांगितले जाते. आपण समाजसेवक असल्याचे भासवून त्याने टाटा, बिर्ला आणि धीरुभाई अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींनाही गंडा घातला होता.

आपल्या आयुष्यात नटवरलालला ११३ वर्षे कालावधीच्या शिक्षा झाल्या. मात्र, जेमतेम वीस वर्षे त्याने तुरुंगात काढली. या काळात त्याने नऊ वेळा तुरुंगातून पलायन केले होते. एकदा त्याने तुरुंगाच्या रक्षकाला १० हजारांची लाच देऊ केली. या रक्षकाला त्याने नोटांचे बंडल दिले. नटवरलाल पळून गेल्यानंतर या रक्षकाने ते पाहिले तेव्हा त्यात फक्त कोरे कागद होते. दुसऱ्या एका पलायनाच्या घटनेत त्याने तुरुंगाच्या अधिकाऱ्याचा गणवेष चोरला आणि रक्षकांचे सॅल्यूट घेत मोठ्या रुबाबात तो तुरुंगाबाहेर निघून गेला होता.

२४ जून १९९६ रोजी त्याने आयुष्यातले शेवटचे पलायन केले. त्यानंतर तो कुणालाच दिसला नाही. त्यावेळी नटवरलालचे वय होते ८४. त्याला तपासणीसाठी दिल्लीला आणण्यात येत होते. व्हीलचेअरवर बसवून आणताना त्याने नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरुन पलायन केले ते अखेरचेच.

आपल्या आयुष्यात नटवरलालने पन्नासहून अधिक व्यक्तींच्या खोट्या स्वाक्षऱ्या केल्या होत्या. आठ राज्यांमध्ये त्याच्यावर १०० हून अधिक खटले दाखल होते. त्याच्या मृत्यूचेही गुढच राहिले. त्याच्यावरचे प्रलंबित खटले काढून टाकावेत यासाठी त्याच्या वकिलाने २००९ मध्ये न्यायालयात अर्ज केला होता. त्यात त्याने नटवरलालचा मृत्यू २५ जुलै २००९ रोजी झाल्याचे नमूद केले होते. मात्र, आपल्या भावाचे अंत्यसंस्कार आपण १९९६ मध्येच रांचीत केल्याचा दावा नंतर त्याचा भाऊ गंगा प्रसाद श्रीवास्तव याने केला. त्यामुळे नटवरलाल कधी मरण पावला हे अखेरपर्यंत गुढच राहिले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top