esakal | हेडमास्तरांना ई-मेल
sakal

बोलून बातमी शोधा

S+ : हेडमास्तरांना ई-मेल}

अब्राहम लिंकन यांनी हेडसास्तरांना पत्र जगभर गाजले. नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आजच्या जमान्यातल्या पालकानं पत्राऐवजी हेडमास्तरांना ई-मेल लिहिला तर तो काय असेल?

S+ : हेडमास्तरांना ई-मेल

sakal_logo
By
मंदार कुलकर्णी

सगळीच माणसे गॅजेट्सवर अवलंबून नसतात, नसतात सगळीच टेक्नोसॅव्ही, हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी- मात्र, त्याला हेदेखील शिकवा - जगात प्रत्येक तंत्रसज्ज माणसामागे असतो एक सर्जनशील माणूसही. गेम्सच्या जाळ्यात ओढणाऱ्या स्वार्थी कंपन्या असतात, तसं अवघं आयुष्य स्वतःच्या तंत्रानं जगणारे, स्वतःचा विचार करणारे लोकही असतात. टपलेले `ट्रोलर्स`, तसे ऑफलाइन छंद जपणारे आनंदयात्रीही!

मला माहीत आहे. मोबाईल, लॅपटॉप, टॅब बाजूला ठेवणं झटपट नाही शिकवता येत... तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा, त्यानं खूप विचार करून लिहिलेला, किंवा योग्य व्यक्तींना विचारून लिहिलेला एकच निबंध गुगलवर सर्च करून माहिती मिळवलेल्या प्रोजेक्टपेक्षा मौल्यवान आहे. गेम्समध्ये पराभूत होणं हे नॉर्मल असल्याचं त्याला शिकवा, आणि शिकवा शिक्षकांनी, पालकांनी एखाद्याच वाक्यातून दिलेली शिकवण आयुष्यभर लक्षात ठेवायला!
तुमच्यात शक्ती असली, तर त्याला फेसबुक, व्हॉट्सअॅपपासून दूर रहायला शिकवा. शिकवा त्याला, आपलं म्हणणं प्रत्यक्ष व्यक्त करायला, मित्रांशी चॅटिंगपेक्षा प्रत्यक्ष गप्पा मारायला, फेस ब्युटी मोडमधल्या सेल्फींपेक्षा मित्राच्या टपोऱ्या अक्षरांतलं सौंदर्य शोधायला. गेम्समध्ये जिंकणाऱ्यांचं दडपण घेऊ नको म्हणावं, खरं तर त्यांना नमवणं सर्वांत सोपं असतं!
जमेल तेवढं दाखवत चला त्याला जुन्या काळातल्या कॅसेट्स, रेडिओ, खूप कष्ट घेऊन लिहिलेल्या वह्यांचे गठ्ठे. मात्र त्याबरोबरच, कळू दे त्याच्या मनाला दुर्मीळपणातला, शोधण्यातला आनंद नक्की काय आहे ते समजून घ्यायला. पाहू दे त्याला इन्स्टाग्रामवरच्या पावसाच्या फोटोंपेक्षा पावसाचे खरे, टपोरे थेंब; युट्यूबवरच्या व्हिडिओंपेक्षा प्रत्यक्ष सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर... आणि ऐकू दे नेटफ्लिक्सवरच्या वेब सिरीजपेक्षा बाईंनी शिकवलेली कविता!
शाळेत त्याला हा धडा मिळू दे, की तासनतास मोबाईलवर डोळे लावून जिंकलेल्या गेमपेक्षा आईला केलेली एखादी छोटी मदत श्रेयस्कर आहे. आणि आई-बाबा व्हॉट्सअॅप बघत असले, तरी ते तेवढंच करत नसतात हेही. फेसबुकवर मिळालेल्या लाइक्सपेक्षा स्वतःला काही तरी समजणं, समजून घेणं यांवर दृढ विश्वास ठेवायला हवा त्यानं- बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी!

हेही वाचा: इंग्रजांना सळो की पळो करणाऱ्या क्रांतिवीरांगणा हौसाक्का

त्याला सांगा, त्यानं `चॅट करूया` म्हणणाऱ्या मित्रांशीसुद्धा प्रत्यक्ष गप्पा माराव्यात, शिक्षकांवर रेडीमेड माहिती फेकण्यापेक्षा साध्यासुध्या शंका विचारून खरं ज्ञान मिळवावं, पेस्ट्री कॉर्नरमध्ये जाण्यापेक्षा आईनं दिलेला लाह्यांचा डबा संपवावा आणि ट्रोलर्स बनू पाहणाऱ्यांना, क्रिप्टोकरन्सी वगैरेंच्या भुलवणाऱ्या कमाई सांगणाऱ्यांना अद्दल घडवावी. त्याला हे पुरेपूर समजवा, की करावी कमाल कमाई त्यानं गुगल आणि विकीपीडिया बाजूला ठेवून अन् पुस्तकांची पानं वाचून... पण कधीही करून घेऊ नयेत खाचा डोळ्यांच्या आणि डोकं करून ठेवू नये बंद! आयफोन थर्टीन असलेल्यांच्या झुंडी आल्या, तर काणाडोळा करायला शिकवा त्याला आणि ठसवा की बायजूजच्या काही लाखांच्या प्रोग्रॅमपेक्षा एखाद्या शिक्षकांनी गणिताची सांगितलेली एखादी ट्रिक लक्षात ठेवत राहा.

त्याला फळ्यावर शिकवा, पण गुगल क्लासरूम, झूम, गुगल मीटमध्ये अडकवून ठेवू नका. आणि हेही त्याला सांगा, गुगल, विकीपीडिया यांची माहिती जरूर घ्यावी... पण गाळून घ्यावी ती पुस्तकांच्या, थोरामोठ्यांच्या ज्ञानाच्या चाळणीतून. आणि कॉपी-पेस्ट माहिती बाजूला टाकून निकं सत्व तेवढं स्वीकारावं.

अॅव्हेंजर्सचे चित्रपट बघून कुणी हिरो होत नसतं, इन्स्टाग्रामवर फोटो टाकून कुणी मार्क झुकेरबर्ग बनत नसतं, काइन मास्टरवर व्हिडिओ करून कुणी स्टिव्हन स्पीलबर्ग होत नसतं. त्याच्या अंगी बाणवा, दुसऱ्याला मदत करायचं धैर्य, अन् ऐकलं पाहिजे घरच्यांचं त्यानं जर व्हायचं असेल मोठं!

हेही वाचा: राजकारणात ‘शहरं’ ठरताहेत प्रभावशाली!

आणखीही एक सांगत रहा त्याला, आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्या माहितीवर, तरच कुणी गुगलमधला एखादा तुकडा दाखवला, तरी तो बावरून जाणार नाही. जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा- हसत राहावं त्यानं व्हॉट्सअॅप डीपीला कमी व्हूजचं दु:ख दाबून, आणि म्हणावं त्याला, कमी डेटाच्या पॅकची लाज वाटू देऊ नको. त्याला शिकवा, 108 सेटिंमीटरचा स्मार्ट टीव्हीचं कौतुक करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करायला अन् ब्राऊल स्टार्सचे व्हिडिओ सतत रेकमेंड करणाऱ्यांपासून सावध रहायला. माफ करा गुरुजी! मी फार बोलतो आहे, खूप काही मागतो आहे... पण पहा... जमेल तेवढं अवश्य कराच!
माझा मुलगा- मोबाईलवर त्यानं घालवलेला वेळ सोडला, तर भलताच गोड छोकरा आहे हो तो!!!

go to top