
सोन्याच्या खाणींचे अद्भूत जग!
सोने म्हणजे भारतीयांचा विशेषत: महिलांचा आवडता विषय. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतीय सोन्यावर अधिक प्रेम करतात. लग्नासारख्या मोठ्या समारंभापासून छोट्या कार्यक्रमापर्यंत सोन्याचे दागिने घातल्याशिवाय महिलांची हौस फिटत नाही. जगभरात सोन्याच्या अनेक खाणी असून त्यातून या मौल्यवान धातूचे उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षी उत्तर प्रदेश मध्ये सोन्याच्या दोन खाणी सापडल्या. सोनभद्र जिल्ह्यातील सोन टेकडीवर सोन्याची खाण सापडली. या टेकडीवर जवळपास तीन हजार टन आणि हरदी भागात साडेसहाशे किलो सोने असल्याची पुष्टी तज्ज्ञांनी केली. दक्षिण आफ्रिकेतील सोन्याच्या खाणी जगात सर्वाधिक खोल आणि सर्वांत जुन्या मानल्या जातात. जगातील प्रमुख सोन्याच्या खाणी विषयी जाणून घेऊया.
चिली : जगातील पाच सर्वांत मोठ्या सोन्याच्या खाणीत येथील नॉर्थ एबेरेटो खाण पाचव्या क्रमांकावर आहे. या खाणीत जवळपास २.३२ कोटी औंस सोनं आहे. औंस हे सोने मोजण्याचे एकक परिमाण असून एक औंस म्हणजे २८ ग्रॅम सोने होय.
पापुआ न्यू गिनी : येथील लिहिर गोल्ड खाण जगात चौथ्या क्रमांकावर आहे. या खाणीत २.४० कोटी औंस सोने आहे.
रशिया : रशियातील सबियामधील ओलंपियाड ही सोन्याची खाण जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी सोन्याची खाण आहे. या खाणीत सोन्याचा तब्बल ३.२० कोटी औंस इतका सोन्याचा साठा आहे.
इंडोनेशिया : ग्रासबर्गमधील सोन्याची खाण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या खाणीत २.६० कोटी औंस सोने आहे. जवळपास २० हजार कामगार या खाणीतून सोने काढण्यासाठी काम करतात. डच वैज्ञानिकांनी १९३६ मध्ये या खाणीचा शोध लावला. सोन्यासाठी या खाणीवर काहीवेळा हल्लेही करण्यात आले. त्यापैकी १९७७ मध्ये केलेल्या मोठ्या हल्ल्यात सुमारे ८०० जण ठार झाले होते.
दक्षिण आफ्रिका : या देशात जगातील सर्वात मोठी सोन्याची खाण आहे. साऊथ डीप गोल्ड नावाच्या या सोन्याच्या खाणीत सुमारे ३.२८ कोटी औंस सोने आहे.
उत्तर प्रदेशात ठिकाणी सापडलेला सोन्याचा साठा ३,५६० टन आहे. भारताकडे सध्या ६२६ टन सोने असून एकूण परकीय गंगाजळीच्या तुलनेत ते ६.६टक्के आहे. उत्तर प्रदेशातील या खाणीतील सोने भारताकडील सध्याच्या साठ्याच्या तुलनेत तब्बल पाचपट आहे. या दोन्ही खाणी भाड्याने देण्याचा भारत सरकारचा विचार आहे. आपल्या देशात सोन्याव्यतिरिक्त युरेनियमसारख्या दुर्मीळ धातूंचाही शोध घेतला जात आहे. बुंदेलखंड आणि विंध्य विभाग सोन्याबरोबरच प्लॅटिनम, हिरे, चुनखडी आदी धातूंनी समृद्ध आहेत.
झारखंडमध्येही खाणी
झारखंड मधील रांची जिल्ह्यातही २०१८ मध्ये सोन्याच्या पाच खाणी सापडल्या होत्या. कुबासाल, सोनापेट, जारगो, सेरेंगडीह आणि सरायकेला-खरसावा जिल्ह्यातील जेलगडा येथे या खाणी सापडल्या. त्यांनतर भारतीय भूगर्भ सर्वेक्षण अर्थात जीएसआयने या ठिकाणी अधिक संशोधन करण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला. जीएसआयच्या पथकाने या ठिकाणी असलेल्या खडकावरील नमुने तपासले. प्राथमिक तपासणी नंतर येथे सोन्याच्या खाणी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. या संशोधनाला कोट्यवधी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
‘गरीब’ बिहारमध्ये सोन्याची ‘श्रीमंती’
देशातील गरीब राज्यांत बिहार आघाडीवर आहे. मात्र, याच बिहारमध्ये देशातील सर्वाधिक सोने असल्याची माहिती केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी नुकतीच संसदेत दिली. एकट्या बिहारमध्ये देशाच्या एकूण सोन्यापैकी ४४ टक्के सोने सापडल्याचेही त्यांनी सांगितले. बिहारमधील जमुई जिल्ह्यात सोन्याचा अनेक टनांचा साठा आहे. फार पूर्वी येथील मातीत सोन्याचे तुकडे सापडल्याचा दावा रहिवासी करतात. साधारण १५ वर्षांपूर्वी सरकारी अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी करून सर्वेक्षणाचे काम केले. मात्र, खोदकामाचा खर्च वाढत असल्याने ते थांबवावे लागले. आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने खर्च कमी होत असल्याने हे खोदकाम पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
थायलंडमधील ‘सोन्याची नदी’
शीर्षक वाचून आश्चर्य वाटले ना? काहीवेळा तलाव किंवा नदीसारख्या पाण्याच्या प्रवाहामध्ये सोन्याचे कण मिसळले जातात. सोन्याच्या अमिषाने अनेकजण हे कण गोळा करतात. थायलंडमध्ये अशा प्रकारची एक ‘सोन्याची नदी’ असून या नदीतील सोने गोळा करण्यासाठी काठावरील लोक गर्दी करतात. केवळ स्थानिक रहिवाशीच नव्हे तर दूरवर राहणारे लोकही या नदीच्या पात्रातील सोन्याचे कण शोधण्यासाठी येतात. दक्षिण थायलंडमधील ‘गोल्ड माऊंटन’ या डोंगराळ भागातून ही नदी वाहते. या प्रदेशात प्राचीन काळापासून सोन्याच्या खाणी असल्याने सोन्याचे काही कण नदीच्या प्रवाहात मिसळले जातात. लोक या नदीचे पाणी गाळून किंवा नदीच्या पात्रातील चिखल तपासून सोन्याचे कण गोळा करतात. आपल्या भारतातही अशा प्रकारची एक ‘सोनेरी’ नदी आहे.
भारतातील ‘सुवर्णरेखा’
झारखंडमध्ये सुवर्णरेखा नावाची ही नदी एकेकाळच्या सोन्याच्या खाणीजवळून वाहते. त्यामुळे, या नदीच्या पात्रातही काहीवेळा सोन्याचे कण आढळतात, असे म्हटले जाते. सध्या मात्र येथे एकही सोन्याची खाण सुरू नाही. ही नदी झारखंडबरोबरच पश्चिम बंगाल व ओडिशातून वाहत बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. झारखंडची राजधानी रांचीपासून १५ किलोमीटरवर असलेल्या एका गावातून या नदीचा उगम होतो. पावसाळ्यात नदीला भरपूर पाणी असल्याने नदीत उतरणे शक्य होत नाही. मात्र, हिवाळ्यात अनेकजण नदीच्या पात्रातील सोन्याचे कण शोधतात. मात्र, हे काम खूप कठीण आहे. धान्यापेक्षा बारीक कण शोधणे खायचे काम नाही. दिवसभर शोधल्यानंतर फारतर ६० ते ७० मिलीग्रॅम सोने एका व्यक्तीला सापडू शकते. अनेकवेळा तेही सापडत नाही. त्यामुळे, महिन्याला पाचसहा हजार रुपये मिळतील, एवढेच सोने एका व्यक्तीला मिळते. अलीकडील काळात युरेनियम व तांब्याचे कणही नदीत आढळत आहेत. त्याचप्रमाणे, सांडपाणी सोडले जात असल्यानेही नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे.
कहाणी कोलार गोल्ड फिल्डस(केजीएफ)ची
काही काळापूर्वी आलेल्या की केजीएफ या सुपरहिट दाक्षिणात्य चित्रपटाचा आता दुसरा भाग येऊ घातला आहे. चित्रपटाच्या टिझरने यु ट्यूबवरील सर्व रेकॉर्ड ब्रेक केले असून हा चित्रपट बाहुबली चित्रपटाचेही सर्व रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. कर्नाटकची राजधानी बंगलोर पासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या के जी एफ या सोन्याच्या खाणीवर हा चित्रपट आधारित आहे. ही तब्बल १२१ वर्षे जुनी असलेली जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक खोल सोन्याची खाण समजली जाते. देशावर ब्रिटिशांची सत्ता होती तेव्हा ब्रिटिश या खाणीचा उल्लेख 'मिनी इंग्लड' असा करत असत, एवढे महत्त्व या खाणीला होते. त्याचप्रमाणे १९०२ मध्ये वीजपुरवठा असलेले हे भारतातील एकमेव ठिकाण होते. या खाणींचा इतिहास एक हजार वर्षे जुना आहे. चोला राज्यानंतर विजयनगर, मराठा,निजामाचीही येथे सत्ता होती. चोला साम्राज्याच्या काळात कोलारमध्ये विविध मंदिरांची निर्मिती झाली. इंग्रज अधिकारी जॉन टेलर २ ने १८८० मध्ये कोलारच्या खाणींचा ताबा घेतला. त्यानंतर देश स्वतंत्र झाल्यानंतर ही १९५६ पर्यंत त्यांच्याकडे या खाणीची मालकी होती. जोपर्यंत या खाणीतून सोने मिळत होते तोपर्यंतच या खाण्याचे वैभव होते तो या खाणीचा सुवर्णकाळ होता. मात्र सोने मिळणं बंद झाल्यानंतर खाणीच्या वैभवाला दृष्ट लागली. सोनं मिळण्याची शाश्वती नसल्याने सरकार किंवा कोणत्याही खासगी कंपनीकडून कोलारमध्ये प्रकल्प राबविला जात नाही.
कोणत्या देशाकडे किती सोने?(टनांमध्ये)
अमेरिका ८१३३
जर्मनी ३३६६
इटली २४५१
फान्स २४३६
रशिया २२४१
चीन १९४८
स्वित्झर्लंड १०४०
जपान ७६५
भारत ६२६
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”