Monsoon: हवामान विभागाचे वेगवेगळे अलर्ट नेमकं काय सांगतात, वाचा या लेखात
‘नेमिचि येतो पावसाळा,’ या उक्तीप्रमाणे दरवर्षी एप्रिल-मे महिन्यांत उन्हाळा शिगेला पोहचला की सर्वांचे लक्ष मॉन्सूनकडे लागते. याच सुमारास हवामान खात्याकडून मॉन्सूनविषयीचा अंदाजही वर्तविला जातो. मॉन्सून कधी येणार, सरासरीच्या किती टक्के पडणार, कुठे जास्त, कुठे कमी पडणार आदी माहिती हवामान खात्याकडून दिली जाते. आपल्या भारतासारख्या कृषिप्रधान देशासाठी चांगला मॉन्सून आवश्यक असतो. मॉन्सूनचा पाऊस चांगला झाला की पिकेही चांगली येतात. त्यामुळे, अर्थव्यवस्थेचे चक्र गतिमान होते. मॉन्सूनविषयी नेमकी माहिती फारच कमी जणांना असते. मॉन्सून म्हणजे काय, असा प्रश्न केला तर अनेकजणांना नेमके उत्तर देता येणार नाही. दरवर्षी बरसून अवघा निसर्ग फुलवत बळीराजाला सुखी करणाऱ्या मॉन्सूनविषयी माहिती असायलाच हवी.
मॉन्सून म्हणजे काय?
मॉन्सून हा मूळ अरबी भाषेतील शब्द आहे. ब्रिटिशांनी हा शब्द सर्वप्रथम वापरला. मॉन्सूनचा अर्थ जून ते सप्टेंबर या महिन्यांत आशिया खंडात पडणारा पाऊस असा होतो. मात्र, मॉन्सूनमध्ये केवळ पावसाचाच समावेश होत नाही. तर वाऱ्याची दिशा, तापमानात होणारी वाढ आदी गोष्टींही महत्त्वाच्या ठरतात. मॉन्सूनच्या वाटचालीवरही त्या परिणाम करतात. मॉन्सूनला मोसमी वारे असेही म्हटले जाते. हे वारे या ठराविक महिन्यांत वाहून पाऊस आणतात. ते नैऋत्य दिशेकडून येत असल्याने मॉन्सूनला नैऋत्य मॉन्सून असेही म्हटले जाते.
मॉन्सूनचे आगमन कसे होते?
मॉन्सूनचा संबंध सूर्याशी आहे. सूर्याच्या पृथ्वीशी होणाऱ्या कोनानुसार मॉन्सूनची अवस्था बदलते. उदा. सूर्य मकरसंक्रांतीला मकरवृत्तावर असतो, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यानंतर तो पूर्व गोलार्धात भ्रमण सुरू करतो. या प्रवासात सूर्य विषुववृत्त ओलांडत जूनच्या अखेरीस कर्कवृत्ताजवळ पोचतो. याच काळात पृथ्वीच्या वातावरणातील हवा तापू लागते. त्यामुळे समुद्राच्या पाण्याचेही तापमान वाढू लागते. हवेचा दाब कमी होऊन अधिक दाबाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वारे वाहू लागतात. हे वारे आपल्याबरोबर ढगही वाहून आणतात. याच ढगांमुळे मॉन्सूनमध्ये पाऊस पडतो.
मॉन्सून आला हे कसे ओळखतात?
हवामानशास्त्रज्ञ वाऱ्याची दिशा,गती यांचा अभ्यास करत असतात आणि त्यावरून मॉन्सून बद्दल अंदाज व्यक्त केला जातो. मॉन्सूनचे वारे कोणत्या दिशेने दाखल होत असतात. आकाश ढगांनी किती आच्छादलेले आहे, यावरूनही मॉन्सूनचे आगमन ओळखले जाते. हवामान खात्याने केरळमध्ये मॉन्सून आला आहे, हे ओळखण्यासाठी काही विशिष्ट ठिकाणे निश्चित केली आहेत. त्या ठिकाणी विशिष्ट प्रमाणात पाऊस पडल्यानंतर हवामान खात्याकडून मॉन्सून आल्याचे जाहीर केले जाते. काळात हवामान अंदाज वर्तविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान-उपग्रहांची मदत घेतली जाते. त्यामुळे हवामान अंदाजात अचूकता येण्यास मदत झाली आहे.
मॉन्सून सर्वप्रथम अंदमानात का येतो?
दरवर्षी मे महिन्यात अंदमान आणि निकोबारमध्ये मॉन्सून दाखल झाल्याची बातमी येते. त्यानंतर, मॉन्सूनच्या वाटचालीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहते. मॉन्सूनचे वारे नेहमी हवेच्या जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. हे वारे समुद्रावर तयार झालेले बाष्पाचे ढग पुढे नेत असतात. साधारणपणे या काळात उन्हाळा असल्यामुळे सूर्याच्या प्रखरतेने बंगालच्या उपसागरातील तापमान वाढते आणि हवेची कमी दाबाची क्षेत्रे तयार होतात. मॉन्सूनचे वारे अंदमानात २० ते २५ मेच्या दरम्यान ढग सर्वप्रथम वाहून आणतात. त्याचवेळी, मॉन्सून अंदमानात दाखल झाल्याचे जाहीर करण्यात येते. त्यानंतर, मॉन्सूनच्या या वाऱ्यांचा नैऋत्य दिशेने प्रवास सुरू होतो. केरळमध्ये पोहचण्याची मॉन्सूनची तारीख एक जून आहे. केरळमध्ये मॉन्सून पोहोचल्यानंतरच देशात मॉन्सून दाखल झाला, असे समजले जाते. वातावरणातील फरकामुळे मॉन्सून कधी नियोजित तारखेच्या लवकर येतो तर कधी त्याच्या आगमनाला उशीर होतो. यंदा मॉन्सून अंदमान तसेच केरळमध्ये नियोजित तारखेपेक्षा लवकर दाखल झाला. केरळमध्ये एक जूनला आल्यावर कर्नाटकमार्गे मॉन्सून तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच जूनपर्यंत व मुंबईसह मध्य महाराष्ट्रात १० जूनपर्यंत दाखल होतो. सूर्याच्या उत्तरायणामुळे पृथ्वीचा सूर्याशी असलेला कोन बदलतो. त्यातून सूर्याच्या प्रखरतेमुळे उत्तरेकडे हवेचा दाब कमी होत जातो तसा मॉन्सून उत्तरेकडे सरकतो. त्यानंतर, सूर्याचे दक्षिणायन सुरू झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते.
मॉन्सूनची वैशिष्ट्ये
- भारतात मॉन्सूनच्या चार-पाच महिन्यांच्या कालावधीत सुमारे पाच लाख वेळा वीज कोसळते. त्यामुळे दरवर्षी जवळपास दोन हजार जणांचा मृत्यू होतो.
- सध्याच्या काळात हवामानाचा अंदाज ही सामान्य बाब झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, संगणक, उपग्रह आदींच्या मदतीने हवामान खाते अंदाज वर्तवते. भारतात हवामानाचा पहिला अंदाज कधी वर्तविला गेला, हे तुम्हाला माहीत आहे का, आपल्या देशात १८८६ मध्ये सर्वप्रथम हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला. भारतात १८७१ पासून २०१९ पर्यंत सुमारे ९९ वर्षे सरासरीएवढा पाऊस झाला आहे. तर २६ वर्षे दुष्काळ पडला होता.
- भारतीय अर्थव्यवस्थेचा आधार आपल्या सुमारे ७० कोटी शेतकरी असणाऱ्या देशाची अर्थव्यवस्था आजही कृषीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. देशाच्या एकूण उत्पादनात या शेतकऱ्यांचा वाटा सुमारे १६-१७ टक्के आहे. त्यामुळे अर्थचक्राला चालना मिळण्यासाठी मॉन्सून महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे मान्सूनला भारतीय अर्थव्यवस्थेचा आधार असेही संबोधले जाते.
-भारतात मॉन्सूनच्या दोन प्रमुख शाखा आहेत. बंगालचा उपसागर तसेच अरबी समुद्रावरून मॉन्सूनचे वारे भारतात प्रवेश करतात. या दोन्ही वाऱ्यामुळे भारतात मॉन्सूनचा पाऊस कोसळतो.
-क्रिकेटप्रमाणे मॉन्सूनवरही मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो. दरवर्षी भारतात मॉन्सूनवर सुमारे २५,००० कोटींचा सट्टा लावला जातो, असा अंदाज आहे.
-भारतात मॉन्सूनमध्ये प्रचंड विविधता दिसून येते. संपूर्ण भारतात मॉन्सूनच्या काळात सरासरी ८९० मि.मी.पाऊस पडतो.ईशान्येकडे प्रचंड प्रमाणात पाऊस कोसळतो तर राजस्थान सारख्या वायव्येकडील राज्यात फारच कमी प्रमाणात पाऊस पडतो. मॉन्सून नाट्यमय घडामोडींसाठीही ओळखला जातो. अलीकडे अतिवृष्टीसारख्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. गेल्या वर्षी कोकण, चिपळूणला झालेली अतिवृष्टी तसेच या वर्षी आसाम, गुजरात मध्येही मोठ्या प्रमाणावर झालेली अतिवृष्टी ही याची काही उदाहरणे.
यलो, रेड, ऑरेंज अलर्ट म्हणजे काय?
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की अमुक शहराला, ठिकाणाला रेड, यलो, ऑरेंज, रेड अलर्ट दिला असे वाचण्यात येते. रंगांच्या आधारे अलर्ट जारी करण्यास जगभरातील हवामान खात्यांनी बारा-तेरा वर्षांपूर्वी सुरूवात केली. हा अलर्ट नेमका काय असतो? त्याविषयी माहिती घेऊयात.
रेड अलर्ट
जेव्हा एखाद्या भागात अतिमुसळधार पावसाचा किंवा अतिवृष्टीचा इशारा दिला जातो. तेव्हा तिथे रेड अलर्ट जारी केला जातो. नागरिकांनी शक्यतो घरीच राहण्याच्या सूचना दिल्या जातात. गंभीर परिस्थिती असेल तेव्हा दुर्मिळ स्थितीत जारी केला जातो. उष्णतेच्या तीव्र लाटांची शक्यता असल्यावरही हा अलर्ट जारी केला जातो. जीवन व मालमत्तेच्या सुरक्षिततेची ही वेळ आहे, असा रेड अलर्टचा अर्थ होतो. रेड अलर्टमध्ये नैसर्गिक आपत्तीत मोठे नुकसान होऊ शकते.
ऑरेंज अलर्ट
कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते याची सूचना देण्यासाठी ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून वापरला जातो. हा अलर्ट लक्षात घेऊन नागरिकांनी तयार राहायचे असते. वाहतूक ठप्प होणे आदी प्रकार घडू शकतात. त्यामुळे महत्त्वाचे काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे ,अशी सूचना दिली जाते.
यलो अलर्ट
मुसळधार पावसासाठी किंवा काहीवेळा विजांच्या कडकडाटासह तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडणार असल्यास यलो अलर्ट जारी केला जातो. नागरिकांनी सावध राहावे, त्यांची दैनंदिन कामे रखडू शकतात, असा या अलर्टचा अर्थ होतो. लोकांना सतर्क करणे हा या अलर्ट देण्यामागचा उद्देश आहे.
ग्रीन अलर्ट
कोणत्याही नैसर्गिक आपत्तीची शक्यता नसल्यास सर्व काही ठीक आहे, हा संदेश देण्यासाठी ग्रीन अलर्ट जारी केला जातो.
------------