जगभरातील नागरिकांना मायदेशी पाठविणारा ‘कतार'! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जगभरातील नागरिकांना मायदेशी पाठविणारा ‘कतार'!}

अफगाण पेचप्रसंगात जगभरातील बहुतांश देशांना नागरिक मायदेशी आणण्यासाठी कतारच मदतीला आला.

जगभरातील नागरिकांना मायदेशी पाठविणारा ‘कतार'!

sakal_logo
By
धनंजय बिजले

एकाच वेळी अमेरिका आणि तालिबानी संघटनेचे खुनखार दहशतवादी या दोघांशीही सख्य ठेवण्यात यश मिळवलेला कतार हा जगातील एकमेव देश ठरला आहे. अफगाण पेचप्रसंगात जगभरातील बहुतांश देशांना नागरिक मायदेशी आणण्यासाठी कतारच मदतीला आला. आज अफगाणिस्तानला आकार देतानाच जागतिक राजकारणात आपले आगळेवेगळे स्थान निर्माण करण्यात कतार यशस्वी ठरू लागला आहे.

हेही वाचा: सामान्य माणसांची असामान्य श्रीमंती!

३१ ऑगस्टच्या मध्यरात्री बाराच्या ठोक्याला अमेरिकेचा शेवटचा सैनिक अफगाणिस्तानमधून बाहेर पडला आणि अमेरिकेच्या अफगाण युद्धाची नामुष्कीजनक अखेर झाली. पाठोपाठ तालिबानने सत्ता ताब्यात घेतली. तालिबानच्या या नव्या राजवटीत काबूलच्या विमानतळावर पहिले विमान उतरले ते कतार एअरवेजचे. अर्थात त्यांना तालिबाननेच आमंत्रित केले होते. या विमानातून उतरलेल्या कतारच्या तंत्रज्ञांनी काबूल विमानतळाचा ताबा घेतला आणि देखभाल सुरु केली. आज काबूलहून नेहमीप्रमाणे विमाने उडत आहे याला कारणीभूत कतार आहे. एकाच वेळी अमेरिका आणि तालिबानी दहशतवादी या दोघांशीही सख्य ठेवण्यात यश मिळवलेला कतार हा सध्या जगातील एकमेव देश ठरला आहे. अफगाण पेचप्रसंगात कतारने जागतिक राजकारणात आपले आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे. हे कसे घडले याचा मागोवा घेणे आवश्यक आहे.

तालिबानी दहशतवाद्यांशी मधुर संबंध

कतारने अफगाण पेचप्रसंगात केवळ अमेरिकेलाच नव्हे तर भारतासह जगातील बहुतांश देशांना मदत केली. अफगाणिस्तानात अडकलेला कोणत्याही देशाचा नागरिक तेथून सुखरूपपणे बाहेर पडला तो केवळ कतारच्या मदतीनेच. सर्वच देशांना कतारचीच मदत घेणे भाग पडले. जगभरातील बहुतांश देशातील नागरिक कतारची राजधानी असलेल्या दोहा विमानतळावरूनच आपापल्या मायदेशी परतले.

हेही वाचा: ''स्पर्धा परीक्षेच्या उमेदवाराला प्रेम करण्याचा अधिकार नाही?''

याचे कारण होते तालिबान राजवटीशी असलेले कतारचे मधुर संबंध. अफगाणिस्तानाचा ताबा घेतल्यानंतर तालिबानी म्होरक्यांशी चर्चा कोण करणार?, त्यांच्याशी संवाद कसा साधला जाणार? याबाबत सारे जग गोंधळलेले होते. येथे सर्वांना आधार ठरला तो कतार. यामुळे जागतिक राजकारणात कतारला सध्या अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. जागतिक शहरांच्या सत्ताकेंद्रात दोहाने आता बरीच आघाडी घेतली आहे.

तालिबानवर पकड ठेवण्यासाठी संयुक्त अरब अमिराती, पाकिस्तान त्याचप्रमाणे सौदी अरेबिया आसुसलेले होते. पण त्यांच्या तोंडचा घास कतारचे हिरावून घेत आपले स्थान ठळक केले आहे. चीनने कितीही प्रगती केली असली तर अजूनही अमेरिकाच जागतिक महासत्ता आहे. हे स्थान पुढील दशकभर तरी चीन नक्कीच घेवू शकणार नाही. अशा वेळी अमेरिकेचा विश्वासू सहकारी म्हणून कतारने आपले स्थान निर्माण केले आहे. अफगाणिस्तानात कोणतेही पाऊल टाकण्याआधी आतापर्यंत पाकिस्तान व सौदी अरेबियाची मदत घेतल्याशिवाय अमेरिकेला पर्याय नव्हता. किंबहुना त्यांच्याशिवाय अमेरिकेचे पानच आतापर्यंत हलतच नव्हते. मात्र कतारने ही जागा घेत या दोन्ही देशांचे महत्त्व कमी केले म्हणण्यापेक्षा जणू संपवूनच टाकले.

हेही वाचा: मैदानावरच्या रणरागिणींचे पुढचे पाऊल!

ताबिलानशी कतारचे असलेले संबंध काही एका रात्रीत तयार झालेले नाहीत. अफगाणिस्तानात लढताना दहा वर्षांपूर्वीच अमेरिकेच्या हे पुरते लक्षात आले होते. त्यामुळे अफगाणिस्तानात कधी ना कधी राजकीय तोडगा काढावाच लागणार हे अमेरिकेच्या चांगलेच लक्षात आले होते. आज आपल्याला २०२१ मध्ये अमेरिका अफगाणिस्तानातून बाहेर पडताना दिसत आहे पण गरज पडल्यास तालिबानशी चर्चेचा मार्ग अमेरिकेने फार आधीच तयार करण्यास सुरवात केली होती. २०१० मध्येच अफगाणिस्तानात आदिवासी कौन्सिलची स्थापना करण्यात आली होती. त्यायोगे काही तालिबानी नेत्यांना परदेशात संरक्षण देण्याची योजना होती. त्यामुळे गरज पडल्यास तालिबानशी शांतता चर्चा करणे शक्य होईल. पुढे २०१३ मध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर कतारने तालिबानला दोहा येथे राजकीय दूतावास सुरु करण्यास परवानगी दिली. अर्थात अमेरिकेचा या गोष्टीला पाठिंबा होताच. तालिबानची ही वकिलात आपल्या देशात सुरु व्हावा असा सौदी अरेबियाचा मोठा प्रयत्न होता. पण अमेरेकिचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपले मत कतारच्या पारड्यात टाकले आणि अफगाणिस्तानच्या प्रश्नात कतारच्या भूमिकेला अनन्यसाधारण महत्त्व येण्यास सुरवात झाली. पुढे २०१८ मध्ये तालिबानचा सहसंस्थापक असलेला मुल्ला अब्दुल घनी बरदार यांची अमेरिकेच्या इशाऱ्यावरून पाकिस्तानी तुरुंगात सुटका करण्यात आली. हाच बरदार कतारमधील तालिबानच्या वकिलातीचा प्रमुख बनला. अशा प्रकारे अमेरिकेने आपला अफगाण परतीचा मार्ग कतारच्या मदतीने प्रशस्त करण्यास सुरवात केली.

पुढे अफगाणिस्तानातील प्रत्येक राजकीय घडामोडीत पडद्यामागे कतार महत्त्वाची भूमिका अदा करीत राहिला. सप्टेंबर २०२० मध्ये अश्रफ घनी यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन अफगाण सरकार व तालिबान यांच्यातील बहुचर्चित चर्चेत कतारची निर्णायक भूमिका होती. तालिबानच्या दोहामधील कार्यालयामुळे कतारचे जगभरातील दहशतवादी संघटनांशी निकटचे संबंध प्रस्थापित झाले. त्याचा उपयोग कतारला जागतिक राजकारणात प्रभाव टाकण्यासाठी होत राहिला.

हेही वाचा: अखेर तालिबान्यांना झाली उपरती!

अरब जगताचा आवाज‘अल जझीरा़'

गेल्या काही वर्षांत ‘अल जझीरा़' या दूरचित्रवाहिनीने जगात आपले वेगळे स्थान निर्माण केले. अगदी ओसामा बीन लादेनपासून ते अल जवाहिरीपर्यंत दहशतवादी संघटनेच्या प्रत्येक म्होरक्याने आपला व्हीडीओ अल जझारीवर प्रसिद्ध करण्यात धन्यता मानली. या वाहिनीच्या माध्यमातून जगभरातील दहशतवादी जगाशी संपर्क साधत राहिले. येथे एक माहिती देणे फार महत्त्वाचे आहे ते म्हणजे अल जझीरा ही वृत्तवाहिनीची मालकी कतारच्या राजघराण्याकडे आहे. अरब जगताचा आवाज बनलेल्या या वाहिनीमुळे कतारविषयी साऱ्या अरब जगतात वेगळे स्थान निर्माण झाले यात शंका नाही. कतारच्या राजगराण्याने मालकी असली तरी या वाहिनीमध्ये फारशी ढवळाढवळ न करता तिला शक्य तितके स्वातंत्र बहाल करण्याचा प्रयत्न केला. बीबीसीच्या धर्तीवर ही वाहिनी उभी करण्यात आली होती. त्यामुळे अल्पावधीतच ती लोकप्रिय बनली. गेल्या काही वर्षांत या वाहिनीने साऱ्या जगात आपले वेगळे स्थान निर्माण केले. आतापर्यंत जगाला सीएनएन, बीबीसी अशा पाश्चिमात्य देशांतील वाहिन्यांवरून अरब जगतातील घडामोडी कळत असत. पण अल जझीराचा उदय झाल्यानंतर हे चित्र बदलले. अरब जगतातील घडामोडी त्यांच्या भाषेतून, नजरेतून जगापुढे येवू लागल्या. २०११ मध्ये झालेल्या अरब स्प्रिंगमध्येही अल जझीराने निर्णायक भूमिका अदा केली होती. थोडक्यात या वाहिनीच्या जोरावरच कतारची वेगळी प्रतिमा होण्यास मदत झाली. कतारने ती कसोशीने वाढवत नेली. आज अमेरिका, चीन, रशिया, जर्मनी अशा जगातील सर्व ताकदवान राष्ट्रांना कतार हा महत्त्वाचा विश्वासू भागीदार देश वाटतो यातच सारे काही येते.

हेही वाचा: सहकारी बँकिंग क्षेत्र ‘सॉफ्ट टार्गेट’ होतंय?

मध्य पूर्वेतील प्रत्येक संकटात आता कतार महत्त्वाची भूमिका अदा करीत आहे. त्याचप्रमाणे अफगाणिस्तानात सत्ता स्थापन करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. आज अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आली आहे. त्यामुळे तेथे कोणाशी चर्चा करायची, नव्या राजवटीशी कशाप्रकारे राजनैतिक संबंध प्रस्थापित करायचे असा मोठा प्रश्न जगभरातील बहुतांश देशांना पडलेला आहे. त्या सर्व देशांना आज कतार जणू आधार बनू पहात आहे. अफगाणिस्तानात अडकलेल्या नागरिकांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी अनेक देशांना याआधीही कतारनेच मदत केली होती. दोहा मार्गेच अनेक देशांचे नागरिक मायदेशी परतले होते. आता पुन्हा कतारच अनेक देशांच्या मदतीला धावून जात आहे. त्यामुळे कतारचे जगभरातील बहुतांश देशांशी उत्तम संबंध निर्माण होत आहेत. याच्या जोरावर येत्या कळात जागतिक राजकारणात कतार महत्त्वाची भूमिका अदा करण्यात यात शंका नाही. गेल्या काही वर्षांत सौदी अरेबियाने मध्यू पूर्वेचे निर्विवाद नेतृत्व केले होते. आता ती जागा वेगळ्या प्रकारे कतार घेवू पहात आहे.

go to top