Technology News- मुलं आॅनलाईन गेम खेळताहेत? मग हे नक्कीच वाचा.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गेमिंग क्षेत्र वाढतंय}
काय आहे आॅनलाईन गेमिंगची बाजारपेठ

मुलं आॅनलाईन गेम खेळताहेत? मग हे नक्कीच वाचा....

मनोरंजनाच्या विविध साधनांमध्ये देशातील मोबार्इल गेमिंग क्षेत्र झपाट्याने वाढत आहेत. गेमिंगचा थरार, आकर्षक बक्षीसे आणि अद्ययावत तंत्रज्ञान यामुळे या खेळास अनेकांची पसंती मिळत आहे. प्रामुख्यानं तरुण पिढी याकडे आकर्षित होते त्यामुळे काही काळजीही घेणं गरजेचं आहे....

देशात सध्या ३०० दशलक्षाहून अधिक लोक मोबाईल गेम खेळतात. संपूर्णपणे गेमिंग बाजार २०१९-२०२० मध्ये ३८ टक्के आणि २०२१-२२ या वर्षात ही बाजारपेठ ३७ टक्क्यांनी वाढली आहे. याचाच अर्थ गेल्या काही वर्षांपासून भारतात सोशल मीडियापेक्षा गेमिंग वेगाने वाढत आहे. भारताच्या सोशल मीडिया मार्केटमध्ये २०१९-२० मध्ये ११ टक्के आणि मागील आर्थिक वर्षात २६ टक्के वाढ झाली आहे. (Technology News Online Gaming on rise in India)

मोबाईल गेमिंगची (Mobile Gaming) बाजारपेठ सुमारे १.५ बिलियन डॉलर. एकूण गेमिंग मार्केटच्या सुमारे ८६ टक्के वाटा हा मोबाईल गेमिंगचा आहे. याउलट मोबाईल गेमिंगमध्ये चीनमधील गेमिंग मार्केट  ५९ टक्के आणि यूएसमध्ये फक्त २८ आहे. २०२५ पर्यंत देशातील मोबाईल गेमिंगमधून मिळणारा महसूल किमान पाच अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याची अपेक्षा अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे.

२०१६ पासून गेमिंगचे प्रमाण वाढले :

जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेल्या गेमने २०१६ साली डाउनलोडींगच्या प्रमाणात भारतात आघाडीचे स्थान मिळवले होते. कँडी क्रश सागा (Candy Crush Saga) त्यावेळी सर्वाधिक लोकप्रिय गेम होती. सबवे सर्फर्स आणि टेंपल रन -२ सारख्या वेगवान, आर्केड-शैलीतील अॅक्शन गेम्ससह एंडलेस रनर गेम्स देखील भारतीय गेमर्समध्ये आवडती आहे. स्थानिक पातळीवर प्रकाशित झालेल्या यशस्वी गेमचे एक उदाहरण म्हणजे ट्रेन सिम्युलेटर. २०१६ च्या क्रमवारीत हा गेम नंबर चारवर होता. टिमुझच्या इतर गेमने देखील आकर्षण मिळवले आहे. बाईक रेसिंग मॅनिया गुगल प्ले दैनंदिन डाउनलोडमध्ये २०१६ साली एन नंबरवर  होता. २०१५ ते २०१६ दरम्यान टिमुधने तयार केलेल्या सर्व गेमच्या डाउनलोडींगमध्ये एकत्रित अंदाजे २० पच वाढ झाली होती.  

अती गेमींग ठरत आहे डोकेदुखी :

अलीकडच्या काळात मोबाईल गेम हे केवळ टाइमपास म्हणून नाही तर वेळात वेळ काढून किंवा हातातील सर्व कामे बाजूला ठेवून खेळले जात असल्याचे दिसून येते. सुरवातीला गमतीशीर वाटणारा एखादा गेम कालांतराने इतक्या सवयीचा वाटू लागतो की त्याव्यतिरिक्त कोणतीही गोष्ट किंवा काम करण्याची इच्छा होत नाही. एवढंच नव्हे तर, सुरवातीला केवळ मनोरंजन म्हणून खेळला जाणारा हा गेम वापरकर्त्यांच्या मनाचा इतका ताबा घेतो की नंतर त्यात यशस्वी होणं, हे जणू खेळणाऱ्याच्या आयुष्यातील अंतिम ध्येय बनून जाते. साहजिकच मेंदूचा थकवा कमी करण्यासाठी खेळायला सुरवात झालेला गेम मेंदूचा ताण वाढवू लागतो व त्याचे विपरीत परिणाम दिसू लागतात.

शाळकरी मुलांमध्ये सर्वाधिक आकर्षण :

स्मार्टफोनच्या माध्यमातून एका क्लिकवर अनेक गेम उपलब्ध होत असल्याने कॉलेजियन्स आणि शाळकरी मुले त्यामध्ये अलगदपणे मोबाइलच्या मोहात अडकत आहेत. दर पाच ते सहा महिन्यांनी एखादा गेम तरुणाईला मोठ्या संख्येने आकर्षित करून घेत असल्याची उदाहरणे आहेत.

नवनवीन गेम, तरुण मनाला आकर्षित करणारी खेळाची पध्दत परिणामी तरुणांमध्ये त्या खेळाची सवय जडते. मध्यतंरी पोकेमॉन गो  या गेमने सर्वांना अक्षरश: वेड लावले होते. या गेममुळे काही मुलांना जीव गमवावा लागण्याच्या धक्कादायक घटना घडल्या. त्याआधी आणि नंतरही कँडी क्रश आणि क्वाइन मास्टर या खेळाची सध्या चलती आहे. बहुतांश गेम्स हे विनाशुल्क डाऊनलोड करता येतात. मात्र त्यामधील काही गोष्टींसाठी पैसे मोजावे लागतात. मोबाइलवरील गेमची सवय जडलेल्या मुलांमध्ये एकलकोंडेपणा, स्वत:च्या विश्वात हरवणे अशी लक्षणे दिसत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील मंडळीचे म्हणणे आहे.

या गेमला मिळतेय पसंती

- कॅण्डीक्रश

- तीनपत्ती

- स्नेक

- अँग्री बर्ड

- टेम्पल रन

- सबवे सर्फर

- फुटबॉल

- सॉकर

- रेस

- बर्न इट आउट

- बर्न द रोप

- बॉम्ब टॉस

- ब्लॉक ब्रेकर्स

- क्रिकेट वर्ल्ड  

पुण्‍याने मुंबईला मागे टाकले :

देशासह पुण्याचे स्थान देखील गेमिंगच्या बाबतीत अधोरेखांतिक होत आहे. ईस्‍पोर्ट स्किल गेमिंग व्‍यासपीठ मोबाईल प्रिमिअर लीगने (एमपीएल) सादर केलेल्‍या इंडिया मोबाईल गेमिंग रिपोर्ट २०२१ (आयएमजीआर) नुसार पुणे शहराने गेल्‍या वर्षी मोबाईल गेमर्सच्‍या आकडेवारींमध्ये जवळपास १७ टक्‍के वाढीसह मुंबईला मागे टाकले आहे. २०२१ मध्‍ये मुंबईच्‍या तुलनेत पुण्‍यामध्‍ये गेमर्सची संख्या लक्षणीयरित्‍या वाढल्‍यामुळे भारताची आर्थिक राजधानी तिच्‍या प्रतिस्‍पर्धी शहराकडून हरली. पु

णे, लखनौ व पटना सारख्‍या शहरांनी मुंबई, बेंगळुरू व कोलकता यांसारख्‍या मोठ्या शहरांना मागे टाकले आहे. पटनानंतर मुंबई व बेंगळुरू अनुक्रमे सहाव्‍या व सातव्‍या स्‍थानांवर होते, तर कोलकता १२व्‍या स्‍थानावर होते. मोबाईल गेमर्सच्‍या आकडेवारीच्‍या संदर्भात दिल्‍ली, जयपूर, पुणे, लखनौ व पटना भारतातील अव्‍वल पाच शहरे बनली आहेत. अहवालाच्‍या मते, जयपूर गेमर्सच्‍या आकडेवारीच्‍या संदर्भात २०२१ मधील दुसरे सर्वाधिक भारतीय शहर म्‍हणून उदयास आले आहे. आयएमजीआर २०२१ च्‍या मते, कॅरम, फ्रूट डार्ट, फ्रूट चॉप, क्रिकेट क्‍लॅश, रनर नं. १ हे काही टॉप गेम्‍स राजस्थानमधील गेमर्समध्‍ये अत्‍यंत लोकप्रिय ठरले.

एमपीएल व्‍यासपीठावर १.३ दशलक्ष ईस्‍पोर्टस् खेळाडूंची नोंद-

राष्‍ट्रीय स्‍तरावर चेस व पूल यांसारख्‍या मोबाईल ईस्‍पोर्टसच्‍या गेमर्सच्‍या आकडेवारीमध्‍ये लक्षणीय वाढ झाली. २०२१ मध्‍ये एमपीएल व्‍यासपीठावर १.३ दशलक्ष ईस्‍पोर्टस्खेळाडूंची नोंद झाली. जवळपास अर्ध दशलक्ष गेम्‍स व्‍यासपीठावर खेळले गेले, तर १७ दशलक्ष लाइव्‍ह दर्शकत्‍वाची नोंद झाली.

अनेक संशोधन अहवालांमधून निदर्शनास येते की, किफायतशीर स्‍मार्टफोन्‍सच्‍या उपलब्‍धतेसह हाय-स्‍पीड इंटरनेटने लहान शहरे व नगरांमधील अनेक लोकांना गेमिंगचा आनंद घेण्‍यास प्रवृत्त केले आहे. खरेतर गेमिंगसाठी मोबाईल-आधारित व्‍यासपीठांनी अनेकांना कौशल्‍य-आधारित गेम्‍स व स्‍पर्धा सुलभपणे उपलब्‍ध करून दिल्‍या आहेत.

२०२३ मध्‍ये २ बिलियन डॉलर्सहून अधिक महसूल निर्माण होवू शकतो :  

ईवायने नुकतेच अहवालामध्‍ये उल्‍लेख केला की, ऑनलाइन गेमिंगसाठी भारतीय स्‍थानिक बाजारपेठ २०१९ मधील ९०६ दशलक्ष डॉलर्सवरून जवळपास २२ टक्‍क्‍यांच्‍या सीएजीआर दराने २०२३ मध्‍ये २ बिलियन डॉलर्सहून अधिक महसूलापर्यंत वाढण्‍याचा अंदाज आहे. याचा अर्थ असा की, भारतीय बाजारपेठ झपाट्याने विकसित होत जागतिक स्‍तरावर अर्थपूर्ण योगदानकर्ता बनण्‍याची अपेक्षा आहे. ईवाय अहवालाने अधिक निदर्शनास आणले की,भारतातील ऑनलाइन गेमर्सची संख्‍या २०२० मधील ३६० दशलक्षवरून २०२२ मध्‍ये ५१० दशलक्षपर्यंत वाढण्‍याचा अंदाज आहे. यापैकी अंदाजे ८५ टक्‍के मोबाईल गेमर्स आहेत.

मुलांमध्ये ऑनलाइन खेळांचे वाढते व्यसन लक्षात घेऊन, शिक्षण मंत्रालयाने पालक तसेच शिक्षकांसाठी काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. या शिफारसींचा उपयोग मुलांमध्ये निर्माण होणारा मानसिक आणि शारीरिक तणाव कमी करण्यासाठी होणार आहे. तसेच ऑनलाइन गेमिंगच्या इतर परिणामांवर मात करण्यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी नेमके काय करावे, हे समजणे सोपे जाणार आहे.....

मुलं आॅनलाईन गेम खेळतात? मग हे नक्कीच वाचा....

-पालकांच्या परवानगीशिवाय गेममध्ये सांगण्यात आलेली खरेदी करण्यास अनुमती देवू नये. अॅप खरेदी टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ‘ओटीपी’आधारित पेमेंट पद्धतीचा अवलंब करण्यात यावा.

- सबस्क्रिप्शनसाठी अॅप्सवर क्रेडिट/ डेबिट कार्डाची नोंदणी करणे टाळावे. तसेच प्रत्येक व्यवहारासाठी निश्चित खर्चाची कमाल मर्यादा ठेवावी.

- गेम खेळण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या लॅपटॉप अथवा मोबाइलवरून मुलांना थेट खरेदी करण्याची परवानगी देवू नये.

- अज्ञात वेबसाइटवरून सॉफ्टवेअर आणि गेम्स डाउनलोड करू देवू नये.

- वेबसाइटसवर येणा-या लिंक्स, इमेज आणि पॉप-अप्सवर क्लिक करण्यापासून सावध राहण्यास सांगणे. कारण यामधून व्हायरसचा शिरकाव होवून संगणकाला हानी पोहोचू शकते. तसेच अशा लिंक्समध्ये मुलांच्या वयाला अयोग्य असणारी सामुग्री दिलेली असू शकते.

- कोणताही गेम डाउनलोड करताना इंटरनेटवर कोणतीही वैयक्तिक माहिती देवू नये, असा सल्ला द्यावा.

- मुलांनी गेममध्ये आणि गेमिंग प्रोफाइलवर असलेल्या लोकांबरोबर कोणतीही वैयक्तिक माहिती कधीही सामायिक करू नये.

- मुलांना वेब कॅमे-यासमोर कोणत्याही प्रकारे खाजगी संदेश किंवा ऑनलाइन चॅटव्दारे कुणाही अनोळखी व्यक्तींना आणि अगदी प्रौढांनाही माहिती देवू नये. यामुळे ऑनलाइन गैरवर्तन करणा-यांकडून संपर्क साधून किंवा इतर खेळाडूंच्या माध्यमातून धमकावण्याचा, बळजबरी करण्याचा धोका असतो.

- गेमिंगमुळे आरोग्याला हानी पोहोचत असल्याचे समजावून सांगावे तसेच विश्रांती न घेता दीर्घकाळ सतत गेममध्ये गुंतून राहू नये, असे सल्ला देण्यात यावा.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”