Time Machine: टाईम मशिन कवी कल्पना की प्रत्यक्षात उतरु शकणारे वास्तव? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टाईम मशीन खरंच प्रत्यक्षात येऊ शकतं?}
भूतकाळात डोकावणे शक्य आहे?

टाईम मशिन: कवी कल्पना की प्रत्यक्षात उतरु शकणारे वास्तव?

हॉलिवूडमध्ये १९८५ ला तयार झालेल्या ‘बॅक टू द फ्युचर’ या चित्रपटानं अनेकांना वेड लावलं होतं. एक शास्त्रज्ञ 'टाइम मशीन' तयार करतो आणि एक मुलगा अपघातानेच त्याचा वापर करतो. या मशीनमुळे तो भूतकाळात जातो. असे टाईम मशीन खरंच शक्य आहे की.....?

या कथेतला तो मुलगा त्याच शहरात असतो, पण हे शहर तीस वर्षांपूर्वीचे असते. शहराचा विकास नुकताच सुरू झालेला असतो. विशेष म्हणजे तो आपल्याच तरुणपणातल्या आई वडिलांना भेटतो. त्यांची भेट घडवून आणून त्याला माहित असलेलं भविष्य (Future) किंवा तो ज्या भविष्य काळातून आला आहे, तो तसाच घडावा यासाठी प्रयत्न करतो. कारण त्यात जर बदल घडला तर त्याचं अस्तित्वच नष्ट होणार असतं. (Time Machine fact or only fiction)

या चित्रपटाचे (Movie) पुढच्या पाच वर्षात आणखी दोन भाग आले. यामध्ये तो भविष्यातही जाऊन आपल्या मुलांना भेटतो. हे तिन्ही भाग लोकांना खूप आवडले. ते आवडण्यामागचं प्रमुख कारण टाइम मशीन बाबत लोकांना असलेली उत्सुकता. असं मशीन खरंच हातात असलं तर काय काय करता येऊ शकतं, याचा कल्पनाविलास करायला लोकांना खूप आवडलं

या चित्रपटाच्या आधीही आणि नंतरही टाइम मशीन (Time Machine) ही मध्यवर्ती संकल्पना ठेवून अनेक चित्रपट अनेक भाषांमध्ये तयार झाले. भारतातही असे चित्रपट तयार झाले आहेत. टाइम मशीनबाबतचं आकर्षण चित्रपटांमुळे निर्माण झालेलं नसून भविष्यात किंवा भूतकाळात (Past) डोकावण्याची मानवी (Human) इच्छा प्रबळ असून ती इच्छाच अशा चित्रपटांमधून व्यक्त होत आहे. ही इच्छा केवळ कलेच्या पातळीवर व्यक्त होत नसून अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञही टाइम मशीन तयार करण्यासाठी धडपडत आहेत.

आपण एखादी चूक केली तर पट्कन भूतकाळात ती चूक दुरुस्त करता येईल का? भूतकाळात जाऊन आपले आजचे वर्तमान आणि भविष्य बदलता येईल का? त्यासाठी आपल्याला भूतकाळात किंवा भविष्य काळात घेऊन जाणारे यंत्र तयार करता येईल का? या विचारातून टाइम मशीन तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चित्रपटांमध्येही अनेक शास्त्रीय आधार देत टाइम मशीन तयार केल्याचे दाखवतात. म्हणजेच, असे यंत्र तयार करणे खरंच शक्य आहे की ही एक परीकल्पना समजायची?

कॅनडातील ब्रोक विद्यापीठातील बराक शॉशनी यांनी याबाबत नुकताच एक शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, एक समांतर काळ निर्माण करता आला तरच टाइम मशीनद्वारे काळातून प्रवास करणे शक्य आहे. कारण या मशीनचा वापर करून आपण भूतकाळात बदल केला, तर आजचे वर्तमान बदलू शकते. तसेच, हा बदल करता येईल की नाही, याबाबतही संशोधक चर्चा करत आहेत. अर्थात, हे सर्व अद्याप चर्चेच्याच पातळीवर आहे, कारण अद्याप टाइम मशीन तयारच झालेले नाही.

चार दशकांपासून प्रयत्न

टाइम मशीन तयार करण्यासाठी संशोधकांनी खरंच खूप गांभीर्याने प्रयत्न केले आहेत आणि अजूनही ते सुरूच आहेत. भूतकाळ किंवा भविष्यकाळात जायचे तर वेळ आणि काळ यांची योग्य सांगड घालावी लागणार. हा सापेक्षतावाद आपल्याला प्रख्यात भौतिक शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी समजावून सांगितला. काळ आणि वेळेचा एकत्रित विचार करून अभ्यास केल्यास त्यांचे स्वरूप समजण्यास मदत होते. आइन्स्टाइन यांनी काळ-वेळाचं हे गृहीतक मांडून शंभर वर्षे उलटून गेली आहेत. या कालावधीत अनेक शास्त्रज्ञांनी अनेक प्रकारे त्याची चाचपणी केली आहे.

यामुळे विश्वाचं एकूणात स्वरूप कसं आहे, हे शास्त्रज्ञ आता आत्मविश्वासाने सांगू शकतात. या सापेक्षतावादाचा आधार घेऊन काळामध्ये मागे किंवा पुढे प्रवास करता येईल का, याची तपासणी करण्यासाठी मागील चार दशकांपासून प्रयत्न सुरू आहेत. सर्व शास्त्रीय आणि गणितीय आकडेमोड करून संशोधकांनी टाइम मशीन तयार करण्यासाठीचे सूत्र, म्हणजेच फॉर्म्युला कागदावर तयार केला आहे. पण त्याबरहुकूम यंत्र तयार करण्याचे सगळे प्रयत्न आतापर्यंत फसले आहेत. वास्तवात येऊ न शकणारे कोणतेही सूत्र किंवा विचार अर्थहीन असतात, हेच यातून सिद्ध झालेले आहे.

काही चूक होतेय का?

टाइम मशीनसंदर्भात आतापर्यंत तयार केलेली समीकरणे वास्तववादी नसावीत, असं म्हणावं लागेल. वास्तववादी नसण्याची दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे, टाइम मशीन तयार करण्याच्या एका पद्धतीमध्ये निगेटिव्ह ऊर्जा असलेल्या पदार्थाचा वापर आवश्यक आहे. वास्तविक पृथ्वीवर सगळीकडे फक्त पॉझिटिव्ह ऊर्जा असलेल्या पदार्थाचाच आढळ आहे. निगेटिव्ह ऊर्जा काही सहज उपलब्ध नाही की प्रयोग शाळेतही सहज तयार करता येत नाही. क्वांटम अभियांत्रिकीचा वापर करून अल्प काळासाठी अल्प प्रमाणात असा पदार्थ तयार करता येणे शक्य आहे.

मात्र , ही निगेटिव्ह ऊर्जा असलेला पदार्थ नियंत्रित प्रमाणातच राहील, याची काही खात्री नाही. दुसरा मुद्दा वास्तवापेक्षा तर्कावर आधारित आहे. काळातून प्रवास करणे हे तर्काला विरोधाभासी असल्याचे म्हणता येते. या संकल्पनेत विरोधाभास अनेक आणि अनेक प्रकारचे आहेत, पण सातत्याचा विरोधाभास हा समजायला सोपा आहे. म्हणजे, एखाद्या घटनेद्वारे तुम्ही भूतकाळातली एखादी घटना बदलली, पण त्या बदललेल्या घटनेमुळे तुम्ही मुळातच हा बदल घडवून आणण्याची शक्यता नष्ट होते.

आपण एक उदाहरण घेऊ. तुम्ही टाइम मशीनचा वापर करून पाच मिनिटे मागे गेलात आणि हे टाइम मशीनच नष्ट केलं तर? आणि आता मी हे मशीन नष्ट केलं असल्याने पाच मिनिटांनंतर मी त्याचा वापर कसा करणार? आणि आता ते मशीन नसल्याने मी मागे जाऊ शकत नाही आणि ते नष्टही करू शकत नाही. म्हणजेच, टाइम मशीन जर नष्ट झालं नसेल तरच मला ते नष्ट करता येईल. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी शक्य नाही, त्यामुळे ही कल्पना वास्तवात येणेही शक्य नाही.

विज्ञान कथांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये एक चुकीचा प्रकार नेहमी दाखवितात. टाइम मशीनच्या बाबतीत विरोधाभास निर्माण करता येतो, असे दर्शविले जाते. या कथांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये, टाइम मशीनचा वापर करून भूतकाळात जाणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही घटनेत बदल न करण्याचा सावधगिरीचा इशारा दिला जातो. विशेषत: भूतकाळातील स्वत:लाच न भेटण्यास बजावले जाते. वास्तविक भौतिकशास्त्रात, विरोधाभास हा प्रकारच नाही. ही एक संकल्पना आहे

काळातून प्रवास करणे ही अशक्य कोटीतील घटना असल्याचा दावा करणाऱ्यांचे आणखी एक स्पष्टीकरण आहे. भविष्यात जर टाइम मशीन तयार झाले असेल तर त्याचा वापर केलेला कोणीतरी भूतकाळात आला असेल; आणि आतापर्यंत असा कोणीही आढळला नसल्याने भविष्यातही हे मशीन तयार झालेले नाही, हे सिद्ध होते, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, असा कोणी भविष्यातून आलेला आपल्यात उपस्थित असला तरी आपल्याला समजणार कसे? त्याने आपली ओळखच सांगितली नाही तर तो भविष्यातून आला आहे, याची नोंदच होणार नाही, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

टाइम मशीनसाठी प्रयत्न

टाइम मशीन तयार करण्यासाठी आतापर्यंत अनेक प्रयत्न झाले आहेत. मार्लन स्कुली या शास्त्रज्ञाने फोटॉनचा वापर केला होता. त्यांनी सिग्नल फोटॉन आणि आयडलर फोटॉन असे दोन प्रकार करून हा प्रयोग करण्यात आला होता. गुंटर निमित्झ आणि अल्फोन्स स्टाहल्होफेन या दोन संशोधकांनी प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक वेगाने फोटॉनचा मारा करत आइन्स्टाईन यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताला आव्हान दिले होते. मात्र, या फोटॉन्सच्या प्रवासाचा काळ अत्यल्प होता आणि त्याद्वारे कोणत्याही माहितीचे वहन होऊ शकत नाही, हे त्यावेळी सिद्ध झाले.

प्रो. बराक शॉशनी यांचे संशोधन

टाइम मशीनचा वापर करून भूतकाळात जाणे आणि ते नष्ट करणे, हे शक्य कसे नाही, यावर शास्त्रज्ञांनी चर्चा केली. मात्र, प्रो. बराक यांच्या गृहितकानुसार, टाइम मशीनद्वारे भूतकाळात आपण एका वेगळ्याच काळाच्या पट्ट्यावर उतरलो, तर आपण काहीही करू शकतो. टाइम मशीनही नष्ट करू शकतो. त्यानंतर होणाऱ्या घटनांचा मूळ काळाच्या पट्टीवरील घटनांशी काहीही संबंध नसेल. त्यामुळे कोणताही विरोधाभासही नसेल. मात्र, एकाच विश्‍वात अशा काळाच्या वेगवेगळ्या पट्ट्या अस्तित्वात येऊ शकतात का?

ही सर्व वास्तवाला सोडून अवास्तवाबाबत विचार करणारी चर्चा अद्यापही संशोधनाच्या पातळीवर आहे. त्यामुळे त्याचा आपल्याला, आणि एकूणातच काय उपयोग, असे वाटू शकते. मात्र, अनेक अवास्तव वाटणाऱ्या प्रयोगांमधूनच अनेक शोधांचा जन्म झाला आहे. त्यामुळे टाइम मशीनबाबत अभ्यास करताना भौतिक शास्त्राचा, सापेक्षतावादाचा प्रचंड ऊहापोह होऊन त्यातून नवेच काही संशोधन हाती लागले, तर तोही फायदाच म्हणावा लागेल.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top