
''यश मिळवायचं असेल, तर रागावर नियंत्रण आवश्यक''
क्षुल्लक गोष्टींवर रागराग करुन आपली बहुमूल्य ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा तिचे रूपांतर तीव्र इच्छाशक्तीमध्ये करायला शिकणे, हीच खरी आनंदाची आणि यशाची गुरुकिल्ली आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर रागावर नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक आहे. ते शक्य झाल्यास आरोग्यप्राप्तीसह यशप्राप्ती निश्चित होऊ शकते.
गौतम बुद्धांनी म्हटले आहे की, मनात क्रोधभावना ठेवू नका, वैरभाव विसरा अन् आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंका! वैराने वैर कधीच शांत होत नाही, प्रेमानेच ते शांत होते! राग ही एक मनाची नकारात्मक अवस्था आहे. जे इच्छेविरुद्ध घडते आणि स्वीकारता येत नाही, तेव्हा रागाचा उगम होतो. मनाविरुद्ध घडणाऱ्या बाह्य घटनेला मनाने दिलेली ती एक नकारात्मक अशी तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया म्हणजे ‘राग’ किंवा ‘क्रोध’ होय. अपयश, ध्येयप्राप्तीच्या मार्गातील अडथळा, नैराश्य, वैफल्य, संशय, भीती यांवर मात करण्यासाठी आपल्या मनाने ती उभारलेली एक प्रकारची प्रतिकार यंत्रणा असते.
काही जणांना फालतू गोष्टींवर लवकर राग येतो तर काहींना उशिरा; काहींचा राग हा तीव्र स्वरूपाचा असतो तर काहींचा सौम्य. काही जण शब्दांच्या मार्गाने राग मोकळा करतात तर काही हिंसेच्या मार्गाने. राग हा आपल्या प्रगतीमधील सर्वांत मोठा अडथळा आहे. राग आल्यावर मानव एकाग्रता गमावून बसतो. त्यामुळे यशप्राप्ती होऊ शकत नाही. राग किंवा क्रोध हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे. बऱ्याचदा क्रोध अनावर झाल्यावर माणूस विचारशून्य होतो. अशावेळी घेतलेला कोणताही निर्णय योग्य नसतो. तो मला अपशब्द बोलला, त्याने मला वाईट रीतीने वागवले, त्याने माझ्यावर कुरघोडी केली, मला लुबाडले असे विचार ज्याच्या मनात वावरत असतात त्यांचा क्रोध कधीही शमत नाही. मात्र ज्याच्या मनात असे विचार येत नाहीत, त्याचा क्रोध शांत झालेला असतो.
आपल्यालाही राग येतो आणि असामान्य लोकांनाही राग येतो, पण ते लोक आपल्या रागातून निर्माण झालेल्या ऊर्जा व्यर्थ घालवत नाहीत, तिचा सकारात्मक वापर करुन विश्व बदलून टाकतात. मार्टिन ल्युथर किंग यांना राग आला आणि त्याने अमेरीकाच बदलून टाकली. नेल्सन मंडेला यांना कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या अन्यायाची चीड आली आणि त्यांनी आफ्रिका हादरून टाकली. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तेच केले. त्यांनी आपला राग एकदाच व्यक्त होऊन शांत होऊ दिला नाही, तो निखारा त्यांनी आपल्या हृदयात सतत पेटता ठेवला आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यातून मिळवलेले इंधन आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वापरले! थोर महापुरुष जे करू शकतात त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपणही तशी वाटचाल निश्चितच करू शकतो. खूप उंचावरून वेगाने पाणी खाली सोडले की वीज निर्मिती होते, एखाद्या खेळात राग वापरून यश संपादन केल्याचीही उदाहरणे आपण आजूबाजूला पाहतो.
रागामुळे व्यक्तीवर होणारा परिणाम
नैराश्याची भावना बळावते, रक्तदाब, मधुमेह वाढतो, हृदयविकाराची शक्यता वाढते, माणूस व्यसनाच्या आहारी जातो, आत्महत्या करावीशी वाटते.
काय आहेत रागाची लक्षणे -
हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढतो, सहनशक्तीचा बांध तुटतो, किरकोळ गोष्टीवरून चिडचिडेपणा वाढतो, मनाची अस्वस्थता वाढते, स्वभाव शंकेखोर होतो, घाम फुटतो, प्रत्येक कारणास दुसऱ्यांना दोषी ठरवले जाते, एखाद्याचा अपमान करणे, वर्तमानात सभोवतालचे भान नसणे.काहींना रडू कोसळते
क्रोधावर नियत्रंण मिळविण्याच्या महत्त्वाच्या टिप्स-
१) परिस्थितीचा स्वीकार करा
- समजा, एखाद्या लग्नसमांभाला जाण्याच्या निमित्ताने तुम्ही घराबाहेर पडला आहात, मात्र वाहतूक कोंडीत अडकला आहात. त्यामुळे सतत कर्कश हॉर्न वाजवून, आजूबाजुच्यांशी भांडून वाहतूक कोंडी सुटणार आहे का ? नाही ना! मग आपला रक्तदाब वाढवून त्रास आपल्यालाच होणार आहे. त्यामुळे यावर पर्याय म्हणजे आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करावा. लग्न लागल्यावरसुद्धा तुम्ही वधु-वरांना भेटून शुभेच्छा देऊ शकता याबाबत मानसिकता तयार करा अन् रिलॅक्स व्हा!
२) पर्याय शोधा
- एखाद्या प्रवासात मार्गक्रमण करत असताना वाटेत डोंगर आला, तर तो डोंगर हटविण्याचे सामर्थ्य तुमच्यात हवे, अन्यथा त्या डोंगराला वळसा घालून पुढे चालण्यास सुरवात करा. तरच आपल्याला ध्येयप्राप्ती होऊ शकते. भिंतीवर डोके आपटून आपलाच कपाळमोक्ष होणार आहे, हे माहीत असताना आपली ऊर्जा खर्च करणे निश्चितच चुकीचे आहे. त्यामुळे पर्याय शोधणे गरजेचे ठरते.
३) खुनशी वृत्तीचा त्याग करा
- रोजच्या जीवनात असे अनेक प्रसंग घडतात. त्यामध्ये कधीकधी तुमची काहीही चुक नसताना तुमचा अपमान केला जातो, क्षुल्लक गोष्टीवरून आपली भांडणे होतात, त्याचा राग मनात धरू नका. तिथल्या तिथे त्या क्रोधाचा निपटारा करून खून्नस काढण्याचा प्रयत्न करू नका.
४) चुकांतून बोध घ्या
- काही गोष्टी नकळत आपल्या हातून घडल्या जातात. त्याची खूप किंमत आपल्याला मोजावी लागते. तीच चूक वारंवार न करण्याची मनाशी खूणगाठ बांधा. नको त्या आठवणी कुरवाळत बसायचे नसते, त्या विसरायच्या असतात, पण त्यातून कमावलेला अनुभव, मिळालेला धडा मात्र आयुष्यभर आपोआप लक्षात ठेवायचा असत
५) दीर्घ श्वास घ्या
एखाद्या मनाविरुद्ध घटनेने आपल्याला प्रचंड राग आलेला असतो, आपले शरीर थरथर कापत असते, रक्तप्रवाह वाढलेला असतो, अशावेळी रागावर नियंत्रण आणण्याचा सोपा मार्ग म्हणजे दीर्घ आणि खोलवर श्वास घ्या. असे किमान दहा ते बारा वेळा करा. त्यामुळे तुमचे मन शांत होते.
उलट क्रमाने आकडे मोजा
- रागावर नियंत्रण मिळविण्यासाठी १ ते १०० आकडे उलट्या क्रमाने मोजायचे किंवा एबीसीडी उलट्या क्रमाने म्हणायची यामुळे वाढलेला रक्तदाब पूर्ववत होऊन आपला राग शांत होऊ शकतो.
७) मौन धारण करा
कधी कधी आपल्याला दुखावणारे आपलेच लोक असतात, अशा लोकांना जबर प्रत्युत्तर देऊन आपणच घायाळ होतो, अशा जखमा होतात, ज्या भरण्यासाठी आयुष्य जावे लागते. म्हणून अशा वेळी मौन पाळणे सोईस्कर ठरते. एखाद्या प्रसंगावर आपले मुद्दे मांडत असताना आपला तोल सुटू शकतो. शब्दाला शब्द वाढत जातो. त्यातून एखादा अनर्थ घडू शकतो. त्यामुळे 'मौनं सर्वार्थ साधनम्' या उक्तीप्रमाणे मौन धारण केल्यास आपल्या अडचणींवर मात निश्चित करता येऊ शकते
८) विरोधकांचे आभार माना
ज्या विरोधकांचा आपल्या राग येतोय, त्याच्यातही काही चांगले गुणसुद्धा असू शकतात, कधीतरी तुमच्या अडचणीला तो मदतीला धावून आला असेल, तो प्रसंग आठवून त्या विरोधकांचे आभार माना. राग निश्चित पळून जाईल
९ ) सकारात्मक विचार करा
- कायम नकारात्मक विचार करण्यापेक्षा जास्तीत जास्त सकारात्मक विचार करण्याकडे कल ठेवा. ‘अर्धा ग्लास रिकामा आहे’, असे म्हणण्यापेक्षा ‘अर्धा भरलेला आहे’ यामध्ये समाधान मानायला शिका. दुचाकीवरून जाताना ऊन लागते म्हणून चिडचिड करीत बसण्यापेक्षा जो पायी जात आहे, त्याच्याकडे बघून समाधान मानायला शिकले पाहिजे. आपल्याकडे चांगल्या प्रतीचे शूज नसल्याची खंत बाळगण्यापेक्षा जो पायाने अधू आहे त्याच्याकडे पाहून ईश्वराचे आभार मानायला शिकले पाहिजे.
१०) मनमुराद हसा
- कितीही वाईट परिस्थिती असो त्यातील संधीचा शोध घ्या. आपल्यातील त्रुटी पाहून हसा, विनोद करा. त्या प्रसंगांची मजा घ्या. त्यामुळे दुःखाची तीव्रता नाहिशी होईल. मग तुम्हीच ठरवा रागाचा वापर कशासाठी करायचा.
११) लोक काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करा
- दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक चांगल्या वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागते. चांगल्या कामाचे सर्वांकडून कौतुक होते, मात्र एखादे काम बिघडले तर अनेकांकडून टोमणे मारले जातात, टीका केली जाते. त्यामुळे आपले मानसिक संतुलन बिघडले जाते, आपली चिडचिड होती. त्यामुळे आपल्या अंतर्मनाला जे योग्य वाटते ते करा, लोक काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करा.
१२) क्रोधाचा शोध घ्या
- प्रत्येकाला राग येण्याचे काही ना काही कारण असते. कार्यालयीन कामाचा दबाव, कौटुंबिक समस्या ही राग येण्याची कारणे असू शकतात. तुमचे राग येण्याचे नेमके कारण शोधा. उदा. राग येण्याचे कारण असल्यास कामाचा प्राधान्यक्रम ठरवा आणि त्यानुसार काम करा.
रागामुळे मानवी शरीरातील हार्मोन्स अनियंत्रित होतात. शरीराची लवचिकता कमी होते. शरीरामध्ये सिरोटिन, डोकामिन वाढते, एड्रेनालाईनचे प्रमाण वाढते. भावनेवर विचारांचा ताबा मिळवणे हे सुज्ञ माणसाचे लक्षण समजले जाते. नवज्योतसिंग सिद्धूने एकाला जिवे मारले, सलमान खान चिडला की इतरांवर राग काढतो, याला इंपल्स डिसकंट्रोल म्हटले जाते. ऊर्मी व्यक्त केल्याशिवाय चैन पडत नाही. समाजातील समस्या वाढल्या आहेत, माणसांतील सहनशीलता संपली की क्रोध निर्माण होतो आणि जमावाची सहनशीलता संपली की दंगे घडतात. त्यामुळे भावनांवर विचाराचा ताबा असणे गरजेचे आहे अस मतं सुप्रसिद्ध सायकॅट्रीक्स डॉ विद्याधर वाटवे यांनी म्हंटलयं