.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई : माझ्या ऑफिसमध्ये खूप पॉलिटिक्स चालतं, मॅनेजर त्याच्या माणसांनाच पुढे करतो, आमच्या इथे चार – पाच सहकारी आहेत... ते सतत मला टार्गेट करतात, मला डावलंल जाते, कामात मदत करत नाही....क्षेत्र कोणतंही असो पण साधारण बऱ्याचदा आपल्या कानावर पडणारी ही वाक्यं. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या गोष्टींबाबत इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात रिल्स आहेत. हे रील मोठ्या प्रमाणात शेअर देखील केले जातात. हे गंमतीने जरी शेअर होत असतील तरीही ऑफिसमधील या 'ओपन सिक्रेट' विषयावर शोध घ्यायचं ठरवल.
खरंच ऑफिस पॉलिटिक्स काय असतं, ऑफिस पॉलिटिक्सला तुम्ही सामोरे कसे गेले पाहिजे, या गटबाजीच्या राजकारणाचा तुम्ही भाग होऊ नये यासाठी तुम्ही काय केले पाहिजे याची उत्तरं आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेतली. कंपनी सेक्रेटरी असणाऱ्या १४ वर्ष कॉर्पोरेट कंपनीत काम करणाऱ्या आणि 'लाईफ आणि कॉर्पोरेट कोच' कल्पना सदाफुले आणि कॉर्पोरेट सायकॉलॉजिस्ट डॉ. वृषाली राऊत यांनी याबाबतची माहिती दिली.
माझ्या कंपनीत मुलांबाबत फार 'फेव्हरिजम' आहे. आमच्या मॅनेजरला असं वाटतं की मुलींना टाईमपास करायचा म्हणून त्या नोकरी करतात. त्यांना प्रमोशनची तितकी गरज नाही. त्यांच्यावर घरच्या जबाबदाऱ्या असतात त्यामुळे त्यांना मोठी पदं देऊ नये. अशात जेव्हा अंतर्गत भरती निघते त्यावेळी मॅनेजरकडून काही ठराविक मुलांचीच नावे वरिष्ठ पदासाठी सुचवली जातात. त्यातही अनेकदा जे त्यांचे ऐकणारे असतात त्यांना रेकमेंड केलं जातं. एका युके बेस कंपनीत काम करणारी सुषमा सांगत होती.