Railway Accident: अपघात रेल्वेचे, इतिहासाच्या पानात दडलेले! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघात रेल्वेचे, इतिहासाच्या पानात दडलेले!}
कुठे घडला रेल्वेचा जगातला पहिला अपघात

अपघात रेल्वेचे, इतिहासाच्या पानात दडलेले!

रेल्वेला जसा इतिहास आहे तसा रेल्वेच्या अपघातांनाही..आपल्या देशात वर्षातून एखादा रेल्वे अपघात होतच असतो. त्याच्या बातम्याही धडकी भरविणाऱ्या असतात...मुंबईसारख्या सतत धावत्या शहरात उपनगरी गाड्यांखाली सापडून मृत्यूमुखी पडलेल्यांचीही संख्याही मोठी आहे...जगभरात अगदी सुरुवातीच्या काळात घडलेल्या रेल्वे अपघातांची ही माहिती...(which was first railway accident in the world)

जगात रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेली पहिली व्यक्ती कोण असा प्रश्न साहजिकच वाचकांच्या मनात येईल...उपलब्ध माहितीनुसार इंग्लंडमध्ये घडलेल्या एका अपघातात एक व्यक्ती रेल्वेची धडक बसून मृत्यमुखी पडली. हीच व्यक्ती रेल्वे अपघातात मृत्यमुखी पडलेली पहिली व्यक्ती.

इंग्लंडच्या याॅर्कशायरमधले सर्वात मोठे शहर म्हणून लीड्स ओळखले जाते. याच लीडस् शहराकडून मिडलटन रेल्वे मार्गावरुन डेव्हिड ब्रूक हा एक सुतार काम करणारा माणून चालत येत होता. मि़डलटन रेल्वे म्हणजे काय हे देखिल जाणून घेणे औत्सुक्याचे आहे.

मिटलटन रेल्वे ही जगातील सर्वात जुनी व आतापर्यंत चालू स्थितीत असलेली रेल्वे आहे. इंग्लंडच्या लीडस् या शहराची ही रेल्वे. १७५८ मध्ये ही रेल्वे सुरु झाली. आता या रेल्वेला पुरातन रेल्वेचा दर्जा प्राप्त झाला आहे. १९६० पासू ही रेल्वे द मिडलटन रेल्वे ट्रस्टच्या स्वयंसेवकांकडून चालवली जाते.

तर अशा मिडलटन रेल्वेच्या मार्गावरुन डेव्हिड ब्रूक चालत होता. नेमके त्या वेळी हिमकणांचे वादळ सुटले होते. त्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. वादळामुळे ब्रूकला येणाऱ्या मिडलटन रेल्वेच्या मालगाडीचा अंदाज आला नाही आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ही झाली रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या जगातल्या पहिल्या व्यक्तीविषयी माहिती. पण जगातला पहिला प्रवासी रेल्वेचा अपघात कधी झाला, हे देखील जाणून घेऊन. हा अपघात घडला होता ९ नोव्हेंबर, १८३३ रोजी. अमेरिकेच्या न्यू जर्सी प्रांतातल्या स्पाॅट्सवूड आणि हाय टाऊन या शहरांना जोडणाऱ्या कॅमडेन अँबाॅय रेल्वेमार्गावर हा अपघात झाला. या अपघातात या प्रवासी रेल्वेचा एक डबा उलटला आणि त्यात या डब्यातल्या २४ पैकी १२ प्रवासी गंभीर जखनी झाले होते.

जगभरात विविध देशांमध्ये रेल्वेचे जाळे जसे पसरत गेले, तशी रेल्वे अपघातांची व्याप्तीही वाढत गेली. जगातला पहिला मोठा रेल्वे अपघात १८४२ च्या मे महिन्यातील ८ तारखेला फ्रान्समध्ये घडला. वर्सेलिसहून पॅरिसला जाणाऱ्या १५ डब्यांच्या एक्स्प्रेस गाडीच्या दोन इंजिनांपैकी एका इंजिनाचा अॅक्सेल तुटला आणि वेगात असलेल्या गाडीचे अनेक डबे एकमेकांवर चढले. या अपघातामुळे गाडीला आग लागली. मात्र, डब्यांचे दरवाजे बंद असल्याने प्रवाशांना बाहेर पडता आले नाही आणि ४८ जणांचा या अपघातात होरपळून मृत्यू झाला.

प्रसिद्ध इंग्लिश लेखक चार्ल्स डिकन्स हा देखील एका रेल्वे अपघातातून बचावला होता. तो प्रवास करत असलेली ट्रेन इंग्लंडच्या केंट परगण्यातील स्टेपलहर्स्ट येथे घसरली. ९ जून १८६५ रोजी ही घटना घडली. या अपघातात दहा जण दगावले. डिकन्स मात्र वाचला. मात्र, असे म्हणतात की त्यावेळी बसलेल्या मानसिक धक्क्यातून डिकन्स सावरु शकला नाही. या घटनेनंतर पाच वर्षांनी तो मरण पावला.

३१ जुलै, १८१५ रोजी इंग्लंडच्याच डरहॅम काऊंटी येथे झालेल्या एका रेल्वे अपघाताची फारशी चर्चा झाली नाही. याचे कारण हा अपघात सार्वजनिक रेल्वेमार्गावर झाला नव्हता. ज्या मुळे हा अपघात झाला त्याचे कारण इंजिनच्या बाॅयरलचा स्फोट हे होते. स्टीम हाॅर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या इंजिनाचा बाॅयलर फुटला.

हा जगातला पहिला बाॅयलर अॅक्सिडंट म्हणून नोंदवला गेलाच या शिवाय मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी झालेला अपघात म्हणूनही याची इतिहासात नोंद झाली. या अपघातात १६ जणांना आपले प्राण गमवावे लागले. या इंजिनाचा प्रवास पाहण्यासाठी अनेक जणांनी आसपास गर्दी केली होती. त्यातील अनेक जण या अपघातात मृत्युमुखी पडले होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
टॅग्स :accidentrailway
go to top