कौटुंबिक स्वास्थ हरपलं....घ्या या गोष्टींचा शोध |Family Health | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Family Health}

कौटुंबिक स्वास्थ हरपलं....घ्या 'या' गोष्टींचा शोध!

कोरोना काळात कौटुंबिक हिंसाचारात लक्षणीय वाढ झाल्याचे पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारींवरून लक्षात येत आहे. सुमारे पावणेदोन वर्षात कोरोनामुळे अनेक कुटुंबातील स्वास्थ हरपले आहे. कोठे कुटुंब प्रमुखाची नोकरीच गेली तर कोठे घरातील कर्त्या व्यक्तीचे किंवा कुटुंबाला बांधून ठेवणाऱ्या सदस्याचे कोरोनामुळे निधन झालेले असते. अशा परिस्थितीत कौटुंबिक स्वास्थ टिकवून ठेवणे ही मोठी जिकिरीची बाब बनली आहे. ते टिकवून ठेवण्यासाठी काय करता येईल...! (Family Health)

एरव्ही सकाळी बाहेर पडले की सायंकाळी उशिरा येणाऱ्या घरांतून गेल्या पावणेदोन वर्षात सर्व सदस्य एकत्रितरीत्या नांदत आहेत. घरात किंवा कुटुंबासोबत इतका काळ रमण्याची सवय नसलेल्यांना सुरुवातीच्या काळात हे पचायला जरा अवघड गेले. वर्षातील एखादी सहल सोडल्यास कुटुंबासोबत इतका काळ राहणे शक्य नसलेल्यांसाठी ही मोठी शिक्षाच होती. परंतु परिस्थितीने कुटुंबाला समजून घ्यायला भाग पाडले. परंतु यातून समजून घेण्यापेक्षा वादाचेच प्रसंग अनेकदा निर्माण झाले. त्यातून अनेक घरातील वाद विकोपाला जाऊन ते थेट पोलिस ठाण्यांपर्यंत गेले. मुळातच भारतीय संस्कृती ही एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कार करणारी आहे. एकेका घरात पंधरा-पंधरा सदस्य किंवा त्यापेक्षा अधिक सदस्य अगदी गुण्यागोविंदाने नांदत असत. आजही शहरी नव्हे परंतु ग्रामीण भागात एकत्र कुटुंब पद्धतीची वीण घट्ट आहे. एक कुटुंब एक चूल अशीच प्रथा आहे. या कुटुंबात तुलनेत मानसिक स्वास्थ्याचे प्रमाण चांगले असल्याचे अनेक उदाहरणांतून स्पष्ट झाले आहे. वाढत्या शहरीकरणामुळे कुटुंबातील हा एकजिनसीपणा लोप पावायला लागला. कुटुंबातील सदस्य संख्येवरही त्याचा परिणाम व्हायला लागला. परिणामी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आता तर ‘नॅनो फॅमिली’ ही संकल्पना रूढ होत असल्याने समस्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यासाठी कुटुंबव्यवस्था सुदृढ करण्यासाठी काही घटकांकडे आवर्जून लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कुटुंब व्यवस्थेत सर्वांत महत्त्वाचा घटक एकमेकांतील संवाद आवश्यक असतो. नेमका आताच्या काळात तोच कमी होत आहे. घरात सर्व सदस्य एकत्र असले तरी सर्वांची तोंड वेगवेगळ्या दिशेला किंवा मोबाईलमध्येच असतात. प्रत्येक सदस्य कोणत्या तरी स्क्रिनसमोर असतोच. घरातील संवाद हरपल्याने अनेक समस्या निर्माण होतात. कुटुंबात सुसंवाद राहिल्यास अनेक समस्यांवर कुटुंबातच तोडगा निघू शकतो.

हेही वाचा: तुमचा पाल्य तुमचे ऐकत नाही, काय करावे?

कुटुंब प्रबोधनाची गरज

कुटुंब व्यवस्था हा स्वस्थ समाजबांधणीला आवश्यक असा घटक आहे. त्यातूनच स्वस्थ राष्ट्रनिर्मिती होत असते. आरोग्यपूर्ण, सशक्त, आत्मनिर्भर, विजिगिषु, संस्कृती समृद्ध समाज निर्माणाचा पाया म्हणजे कुटुंब. व्यक्तिनिर्माणाच्या प्रक्रियेचे मूळ स्थान म्हणजे कुटुंब. योगयुक्त, रोगमुक्त, स्वस्थचित्त कुटुंब हेच समाजाला सम्यक विकास झालेल्या व्यक्ती प्रदान करते. मग व्यष्टी-समष्टी-सृष्टी-परमेष्टी हे चक्र गतिमान होते. यामध्ये काळाच्या ओघात काही दोष निर्माण होतात. कारण कुटुंब हे व्यक्तींच्यामुळे निर्माण होते. कुटुंबात नवीन सदस्य येतात. त्यांच्यावर व कुटुंबातील इतर सर्व सदस्यांवर जगात सतत घडणाऱ्या घटनांचा स्वाभाविक परिणाम होत असतो. त्यातून अनेकदा कुटुंबात दोष निर्माण होतात. हे दोष जीवनशैलीमधील बदलत्या संकेतांमुळे आकार घेतात किंवा यशस्वी व्यक्ती जीवनाच्या बदलत्या आदर्शांमुळे कुटुंबात नकळत प्रवेश करतात. यावर साकल्याने विचार केल्यास आपल्याला कौटुंबिक शक्तीचे महत्त्व अधोरेखित होऊ शकते. दोष निर्माण होणे हा जसा कुटुंब व्यवस्थेचा सहज घडणारा भाग आहे तसेच दोषांचा निचरा करून कुटुंब व्यवस्था विशुद्ध ठेवत राहणे हा सुद्धा सतत आग्रह पूर्वक करण्याचा आवश्यक भाग आहे.

हेही वाचा: अंटार्क्टिकाचे भवितव्य

असे आहेत काही दोष

- कुटुंबातील सदस्याची स्वतःच्या विश्वात राहण्याची सवय
- कुटुंबात संवादाचा अभाव
- असंतुलित जीवनशैली
- कुटुंबात सतत आजारपण असणे
- आपल्या संस्कृती विषयी अनास्था

- सण, परंपरा, कुळधर्म, कुळाचार यामध्ये रुची नसणे
- मानसिक दुर्बलता, भीती, अतिचिंता
- अर्थभानाचा अभाव
- कुटुंबाची कमाई आणि खर्चाच्या सवयी यात फरक असणे.
- प्रतिष्ठेच्या अनावश्यक कल्पनांमुळे अवास्तव खर्च होणे
- जीवनशिक्षणाचा अभाव
- पुस्तकी शिक्षणाकडे जास्त लक्ष देताना आपले आयुष्य चांगले कसे जगायचे हा विषय निसटून जातो
- कुटुंबात सामाजिक प्रश्नाबाबत न होणारा संवाद
- समाजभान नसणे
- समाजातील दुःख, लोकांच्या समस्या याची जाणीव नसते किंवा असली तरी आपल्याला काय करायचे ही मनोवृत्ती
- व्यापकतेचा अभाव
- कुटुंबातील सदस्य एकत्र विचार करण्याला महत्त्व देत नाहीत.
- कोणत्याही निर्णयात सर्वांना सहभागी करून घेतले जात नाही.

हेही वाचा: अंटार्क्टिकाचे भवितव्य

काय आहेत अडचणी


- पैसा मिळवणे, वस्तूंची खरेदी, गरजेपेक्षा मोठी घरे घेणे आणि अनावश्यकरीत्या कर्जाचे हप्ते वाढविणे.
- करिअरसाठी कुटुंब विभक्त होणे.
- एकतानतेचा अभाव. कुटुंबात देव, धर्म, पैसा, यश, चांगले-वाईट याबद्दल सगळ्यांचा एकविचार नसणे. त्यावर सकारात्मक चर्चा टाळणे.
- आहार-व्यवहार यातील विकृती
- रोजच्या झोपण्याच्या व सकाळी उठण्याच्या वेळा यामधील बेशिस्तपणा, व्यायामाची सवय, आवड नसणे,
- कधीही, काहीही कसेही खाणे, अंघोळ अयोग्य वेळी करणे किंवा न करणे
- स्त्री शक्तीच्या सन्मानाचा अभाव
- घरात स्त्रीला मारहाण करणे, सतत अपमानित करणे, स्त्रीच्या व्यक्तिमत्वाला किंमत न देणे.
- आध्यात्मिकतेचा अभाव
- समरसता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव
- आपल्या संस्कृतीतील शास्त्रीय पद्धतींचा अभ्यास नसतो.

काय करू शकतो

हे दोष अनेकदा तत्कालिक असतात. अनेकदा कुटुंबाचा कायमचा स्वभाव बनतात. म्हणूनच कुटुंबात दोषांचा विचार आणि दोष दूर करण्याची नित्य व स्वाभाविक व्यवस्था असणे गरजेचे आहे. तसेच दोष निर्माण होऊ नयेत यासाठी काही यंत्रणा असली पाहिजे. दोष तपासून पाहण्यासाठी आणि ते दूर करण्यासाठी कुटुंबात काही उपक्रम आवर्जून केले पाहिजे.

यासाठी खालील विषयांचा विचार करता येईल.

- कुटुंबातील सर्व सदस्यांचा सकारात्मक संवाद

- व्यक्तिगत किंवा कौटुंबिक संकल्प सर्व सदस्यांची चर्चा करून घेणे

- कुटुंबात कोणत्या न् कोणत्या कारणाने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे

- सामाजिक उपक्रमांमध्ये कुटुंबातील सदस्यांचा सहभाग वाढविणे (उदा ः पर्यावरणाविषयी जागरूकता, संस्कार वर्गात सहभाग)

- सहजशिक्षण ः घरात छोट्या छोट्या कृतींमधून सहज शिक्षण देण्याचा उपक्रम राबवायचा. मुलांचा सहभाग वाढवून घरातील स्वच्छता, साफसफाई, भाजी आणणे, भाजी निवडणे, व अन्य कामात मुलांची मदत घ्यायची

- सुजाण व प्रभावी पालकत्व निभवायचे. केवळ अधिकारातून, भीतीमधून संस्कार/बदल होत नाहीत. सुजाण व प्रभावी पालकत्व हे शिकवते. मुलांना सूचना देत असताना आपल्याकडून त्याचे पालन होते की नाही याची चाचपणी करायचे. उदा ः मुलाने त्याचा कपड्यांचा किंवा वह्या पुस्तकांचा कप्पा आवरून ठेवावा अशी आपली अपेक्षा असेल तर आपलाही कप्पा तसा ठेवावा. कपडे हँगरला किंवा हूकला व्यवस्थित अडकवून ठेवावेत.

- सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातील जीवनात ज्येष्ठांचा सहभाग महत्त्वाचा. घरातील ज्येष्ठ मंडळींची कौशल्ये काय आहेत, त्याचा घरात कसा उपयोग होऊ शकेल आवर्जून विचार केला पाहिजे. त्यांना आवडेल आणि त्यांना करता येईल अशा कामांत सहभाग वाढविणे. काहीही असले तरी घरातील ज्येष्ठांना योग्य तो मान दिला पाहिजे.

- निसर्ग भान आवश्यक आहे. घरात थोडी झाडे असावीत.

- पाण्याचा गैरवापर करू नये. निसर्गाविषयी कृतज्ञता असावी. ती केवळ बोलण्यापुरती नसावी. कोठेही ट्रिपला गेल्यावर आपल्या जवळील कचरा (विशेषतः प्लॅस्टिकचा) कोठेही न टाकू नये.

- योगयुक्त जीवनशैली महत्त्वाची आहे. आपण मुलांना पालक व्यायामाचे महत्त्व सांगत असतात. प्रत्यक्षात तेच व्यायाम करत नाही. मुलांनी सकाळी लवकर उठावे अशी पालकांची अपेक्षा असल्यास त्यांनीही त्या प्रकारची जीवनशैली अंगीकारली पाहिजे.

हेही वाचा: प्रत्येक स्वावलंबी महिलेला असल्या पाहिजे 'या' ६ स्मार्ट सवयी

सुसंवादासाठी काय कराल

सशक्त कुटुंबातून सशक्त समाज निर्माण होऊ शकतो. कोरोनाने आपल्याला कुटुंबाचे आणि एकत्रित कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. ते टिकवून ठेवणे आपल्या हातात आहे. यासाठी जाणीवपूर्वक परिश्रम करण्यापेक्षा काही सवयी लावून घेतल्यास सुखी कुटुंबाचा भाग होऊ शकतो

- कुटुंबातील सर्व सदस्यांनी दिवसभरात किमान एकदा तरी एकत्रित भोजन केले पाहिजे. त्यावेळी दिवसभरातील आपल्याबाबत घडलेल्या घडामोडींची माहिती कुटुंबातील अन्य सदस्यांना द्यावी.

- एकत्रित भोजन करत असताना कोणताच स्क्रीन समोर नसावा. शक्यतो मोबाईल, टी. व्ही. बंद ठेवावेत.

- कुटुंबातील सर्व निर्णय एकत्रित घेण्याचा सराव ठेवा. त्यामध्ये मुलांनाही जरूर सहभागी करून घ्या.

- एकमेकांच्या विश्वासाने कुटुंब अधिक समृद्ध होते, याचे भान जरूर ठेवा.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
टॅग्स :family
go to top