लहान मुलांनी अस्थिर, चंचल असणं हे ADHD चे लक्षण आहे का?

ADHD बद्दल जाणून घेण्याची गरज
ADHD in child
ADHD in child esakal

-- श्रद्धा कोळेकर

सहावीत शिकणारा आनंद (नाव बदललेले) याच्याविषयी पालकांच्या, शिक्षकांच्या तक्रारी वाढल्या होत्या...मुलं खेळायला घेत नव्हती.. आनंद एकटा पडत होता ... ज्याची भीती होती तेच घडले... सहावीत आनंद नापास झाला... पालक आनंदला घेऊन बालविकासतज्ज्ञांकडे घेऊन गेले.. डॉक्टरांनी आनंदला ADHD असल्याचे सांगितले... याच आनंदला दहावीत ७० टक्के मिळाले... हे ADHD म्हणजे काय, लक्षण काय, उपचार याबाबत पुण्यातील डॉक्टरांकडून जाणून घेऊया..

अटेन्शन डेफिसिट हायपरऍक्टिव्ह डिसॉर्डर (ADHD) म्हणजे काय ?

अटेन्शन डेफिसिट हायपरऍक्टिव्ह डिसॉर्डर (ए.डी.एच.डी.). ही एक वर्तुणुकीशी संबंधित अवस्था असून लहान मुलांमध्ये आढळून येते. एखादं मूल जर चंचल, एकाजागी न बसणारं, सतत काहीतरी उचापती करणारं, एका गोष्टीवर लक्ष केंद्रित न करणारं असेल तर आपल्याकडे त्याला सर्रास, खोडकर , डांबरट, आगाऊ, उचापती, खटपट करणारं मूल अशा उपाध्या दिल्या जातात.

पण अनेक पालकांना माहिती नसते की ही एक वर्तुणुकीशी संबंधित मेंदूची अवस्था आहे. पाश्चिमात्य देशात याविषयी बरीच जनजागृती झाली आहे.

मात्र भारतात त्याची फारशी माहिती नागरिकांना खासकरून पालकांना नाही. ही अवस्था मुख्यतः लहान मुलांमध्ये जरी आढळत असला तरीही मोठ्यांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये देखील हे आढळते.

ADHD in child
Parenting Tips : मुलांना कुटुंबाची काळजी घ्यायची सवय लावायचीय?, तर बाप म्हणून तुम्हीही असे वागा, मुलं आपोआप शिकतील

ADHD ची लक्षणे कशी ओळखावी?

सामान्यतः अनेक लहान मुलांमध्ये वरील लक्षणे आढळून येतात. लहान मुले म्हंटल्यावर दंगा करणार, या बाबी सामान्य आहेत असे पालकांना वाटणे साहजिक आहे. परंतु हे प्रमाण जेव्हा सामान्यपणे असणाऱ्या वर्तनापेक्षा अधिकचे असेल तर वेळीच निदान होणे गरजेचे असते.

पालकांना या मेंदूच्या अवस्थेची लक्षणे ओळखणे कठीण होते. अशा वेळी बालमानसशास्त्र तज्ज्ञांची (Child Psychiatry Specialist) मदत घेतल्याने याची लक्षणे ओळखणे सोपे होते.

१. एकाग्रता नसणे (Lack of attention )

२. खूप जास्त क्रियाशील असणे (Hyperactivity)

३. आवेशाने वागणे (Impulsive)

१. एकाग्रता नसणे (Lack of attention )- या प्रकारात व्यक्ती एकाग्रता ठेऊन काम करू शकत नाही. कोणत्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. सतत जागा बदलत राहणे, कृती बदलत राहणे असे प्रकार होतात. कोणी जर काही सूचना देत असेल तर ते ऐकून न घेणे, आपल्याच तंद्रीत असणे.

सतत वस्तू विसरणे. एखादी कृती पूर्ण न करता दुसरी कृती करणे, एखादे काम करायला घेतले तर मध्येच ते विसरून जाणे. सूचना विसरणे, निरोप पोहोचवता न येणे. सर्वजण एक गोष्ट करत असतील तर त्यात सहभागी न होता आपले वेगळे काम सुरु करणे. कोणतीही भाषणे, बोलणे जास्त वेळ न ऐकू शकणे अशी लक्षणे सामन्यात आढळून येतात.

२. खूप जास्त क्रियाशील असणे (Hyperactivity)- एखादे काम खूप ऊर्जा वापरून करणे. लहान मुले मुख्यतः यात एका जागी अजिबात बसत नाहीत. उंच जागेवर चढून उड्या मारणे, बसल्या जागी देखील सतत चुळबुळ करणे, वस्तू उचलायला धावणे, आजूबाजूच्या जड वस्तू हलविण्याचा प्रयत्न करणे, बैठे खेळ खेळण्यास फारसा रस नसणे.

ज्या गोष्टी करण्यात जास्त शारीरिक ऊर्जा लागते त्या गोष्टी सतत करणे अशा गोष्टी लहान मुले करताना दिसतात तर मोठ्या व्यक्ती पेन, शर्टाची बटणे, हातातील वस्तू यांच्याशी खेळत बसताना दिसतात.

ADHD in child
World Mental Health Day : मुलांचे मानसिक आरोग्य मजबूत करण्याची गरज, तुमच्या कामी येतील 'या' टिप्स

३. आवेशाने वागणे (Impulsive) - म्हणजे कोणतीही कृती ही आवेगाने करणे. अशा कृतींमध्ये परिणामांची चिंता केली जात नाही. म्हणजे लहान मुलांना अनेकदा पळताना, सायकल चालविताना पडण्याचे भान राहत नाही इतक्या आवेगाने ते एखादी कृती करतात. यामध्ये समोरून येणारा धोका जाणून घेण्याची क्षमता देखील मुलांमध्ये नसते.

किंवा आपल्यामुळे दुसऱ्या कोणाला इजा होऊ शकते याचे देखील भान मुलांमध्ये राहत नाही. बोलतानाही अति प्रमाणात बडबड करणे, समोरच्या व्यक्ती बोलत असताना त्यांना मध्येच थांबवून आपण बोलणे, मोठ्याने आवेगाने बोलणे, कधी कधी चिडून एखादी कृती करणे असे प्रकार लहान मुलांमध्ये दिसतात.

ADHD कोणत्या कारणामुळे होते?

ही अवस्था अनुवंशिकता, मेंदू संरचनेत बिघाड, वेळेआधी झालेली प्रसुती, जन्माच्या वेळी कमी वजन भरणे, गर्भावस्थेतील मातेची व्यसने, मेंदूला मार लागल्याने यापैकी कोणतेही कारण असू शकते.

परंतु अद्याप यावर ठोस असे संशोधन न झाल्याने खात्रीने यातील कोणतेच कारण सांगता येणार नाही. पाश्चात्त्य देशात या विषयाबाबत अनेक केस स्टडी, निरीक्षणे नोंदविण्यात येत आहेत. वैद्यकीय पातळीवर देखील अनेक संशोधने केली जात आहेत.

ADHD in child
Stress In Child : का वाढतोय मुलांवर एवढा ताण? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

ADHD संदर्भात कोणत्या चाचण्या किंवा तपासण्या केल्या जातात?

ADHD ओळखण्यासाठी कोणतीही एक चाचणी नाही. मेंदूशी संबंधित अवस्था असल्याने ते कोणत्या टप्प्यावर आहे, त्याची लक्षणे किती तीव्र आहेत याचा तज्ज्ञांकडून अभ्यास केला जातो. त्यानुसार त्यांना वर्तणुकीशी संबंधित थेरपी दिल्या जातात.

अनेकदा वर्तणूक औषधांनी कमी करता येते. पालक किंवा कुटुंबियांशी चर्चा करून त्यांचा हा विकार आणखी वाढू नये यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत समुपदेशन केले जाते.

व्यक्तीबाबत घडलेल्या मोठ्या चांगल्या वाईट घटनांचा अभ्यास केला जातो. या अवस्थेच्या वाढीला पोषक वातावरण आजूबाजूच्या परिस्थितीतून मिळणार नाही याची काळजी घेतली जाते.

लहान मुलांचे निदान कधी होणे गरजेचे?

लहान मुलांच्या मेंदूचा विकास हा वयाच्या तीन वर्षापर्यंत सर्वाधिक वेगाने होत असतो. त्यामुळेच याच काळात त्याला वाढीच्या दृष्टीने पोषक वातावरण मिळणे आवश्यक असते. या अवस्थेचे निदान लवकर होणे शक्य नसते कारण वयाच्या तीन वर्षांनंतर लक्षणे अधिक तीव्रतेने दिसतात.

त्यामुळे तीन वर्षाच्या पुढे या मुलांच्या वेगवेगळ्या पद्धतीने तपासण्या केल्या जातात. परंतु लक्षणे दिसल्यास पालकांनी याबाबत जागरूक राहणे आणि वेळीच बालमानसशास्त्र तज्ज्ञांची भेट येणे उपयुक्त ठरते.

मोबाईल, टीव्हीवर पहिल्या जाणाऱ्या कार्टूनचा परिणामही होतो

याबाबत बालविकास तज्ज्ञ डॉ. सुनील गोडबोले सांगतात की, ADHD ही अवस्था थेट मानसिक आजाराशी संबंधित नसली तरीही आजूबाजूच्या वातावरणाने वाढणारी किंवा कमी होणारी अवस्था आहे.

आज आपली मुलं जी कार्टून पाहतात त्यातील जवळपास प्रत्येकच पात्र हे अत्यंत वेगवान आणि बेधडक असते. त्यांच्या कृतीत वेग, आरडाओरडा या गोष्टी सर्रास असतात. या गोष्टी मुलं आत्मसात करतात आणि त्याप्रमाणेच वागू लागतात.

या वेगाची सवय लागलेल्या मुलांना शाळेतल्या बाईंचा वेग कमी वाटू शकतो आणि त्यातून लक्ष न देणे, ऐकून न घेण्याची क्षमता वाढणे असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळेच निवडक कार्टून पाहायला देणे, जे मुलं पाहत आहे त्या बद्दल त्यांच्याशी चर्चा करणे, त्यातील खऱ्या खोट्या गोष्टी त्यांना सांगणे गरजेचे आहे.

बालमानसोपचार तज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ला सांगतात की, "ADHD हा आजार नाही तर मेंदूच्या संरचनेत बदल झाल्याने झालेली एक अवस्था आहे. अस्वस्थ , चंचल असणाऱ्या मुलाला बडवून, ओरडून प्रश्न सुटत नाहीत. तो असं का वागतो आहे याचे कारण शोधणे आणि त्यानुसार त्याला मदत करणे गरजेचे आहे.

शिक्षा करून शरीर शांत करता येईल, पण मुलाचं मन शांत करायचं असेल तर त्याला कोणतेही लेबल न लावता त्याला काय होतंय याचा शास्त्रीय अभ्यास होणे गरजेचे आहे."

आकडेवारी काय सांगते?

* ADHD बाबत भारतात समुपदेशन, प्रशिक्षण, जागरूकता असे प्रयत्न सुरु झाले असले तरीही शासकीय पातळीवर कोणतेही सर्व्हेक्षण झालेले नसल्याने आकडेवारी उपलब्ध नाही. परंतु अनेक सामाजिक आणि आरोग्यविषयक संस्था या विषयात स्थानिक पातळीवर काम करतात.

* सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रेव्हेन्शन या संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणात २०२३ या वर्षात वय वर्षे पाच ते नऊ या गटात जगभरात साधारण १२ कोटी ९० लाख मुलांना हा विकार आहे.

* अमेरिकेत प्रत्येक १० मुलांमागे ६ मुलांना ADHD आहे.

ADHD in child
Over Emotional लोकांशी बोलताना 'या' ४ गोष्टी लक्षात ठेवा

भारतात डॉक्टरांच्या संघटनेकडून काम

भारतातील वेगवेगळ्या राज्यातील डॉक्टरांच्या चमुने या विषयात डेटा कलेक्शनचे काम सुरु केले आहे. भारतीय बाल आरोग्य संघटनेच्या माध्यमातून हे काम सुरु केले आहे.

इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स यांच्या वतीने जाहीर केलेल्या २०२२ च्या आकडेवारीनुसार भारतात ११ टक्के मुलांना ADHD आहे. मात्र यावर व्यापक सर्व्हेक्षण होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. सुनील गोडबोले यांनी व्यक्त केले.

शाळा आणि शिक्षकांना प्रशिक्षण

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सरकारने सध्या ADHD संदर्भात समुपदेशन सुरु केले आहे. तसेच राज्याच्या सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये देखील याविषयी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. स्थानिक पातळीवर देखील जागरूक पालक, डॉक्टर यांच्याकडून प्रयत्न केले जातात.

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता मायकल फेल्प्सलाही ADHD

ऑलिम्पिकमध्ये स्विमिंगमध्ये आठ सुवर्णपदके जिंकणाऱ्या मायकल फ्लेप्स या खेळाडूला देखील ADHD आहे. मात्र आपल्याला उर्जेला जर योग्य वळण दिलं तर माणूस काय करू शकतो हे त्याच्या उदाहरणावरून समजते.

खेळ आणि व्यायाम हे तुमच्याला उर्जेला योग्य दिशा देण्यास मदत करतात. या सगळ्याकडे कोणतेही लेबल न लावता सकारात्मकतेने पाहणे गरजेचे असल्याचे डॉ.सुनील गोडबोले यांनी सांगितले.

----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com