केस कापल्यावर रक्त का येत नाही? घामाला दुर्गंध का ?विज्ञानात दडलीयेत साऱ्या प्रश्नांची उत्तरे | Premium Article | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hair Cuting}

केस कापल्यावर रक्त का येत नाही? घामाला दुर्गंध कसा येतो?

आपण नियमित केस कापतो(Hair Cutting), रोज भांगही(Combing) पाडतो. पण केस कापल्यावर रक्त का येत नसेल?(Why is there no bleeding after cutting the hair) केस ताठ का उभे रहात नसतील? (Why human hair is not stiff) असे प्रश्न अनेकांना पडतही असतील. खरंय आपल्या रोजच्या जीवनात (lifestyle) अशा असंख्य बाबी घडत असतात. ज्याची उत्तरे आपणास माहिती नसतात. पण त्याचे कुतूहल मात्र मनात नक्कीच असते. खरं तर अशा गोष्टी घडण्यामागे विज्ञान(Science) दडलेले असते. चला तर मग अशा काही रंजक प्रश्नांच्या मुळाशी जावून त्यामागील कारणे समजावून घेऊ आणि कुतूहल शमवूया....

हेही वाचा: तुमचा पाल्य तुमचे ऐकत नाही, काय करावे?

१) माणसाचे केस ताठ का नसतात? आणि हो, चाळीशीशी नंतर केस पांढरे का होतात?(Why human hair is not stiff? why white hair grow after forty?)

- आपण सारेच या केसांच्या बाबतीत खूप विचार करीत असतो. केस नीट छान असावेत हे आपल्यातल्या प्रत्येकाला वाटत असते. कारण चांगले केस असतात त्यांचे व्यक्तिमत्व खुलून दिसते. महिलांमध्ये तर केसांच्या विविध रचना करण्याची क्रेजच असते. अलीकडे पुरुषदेखील केसांच्या रचनेकडे अधिक गांभीर्याने पहात असल्याचे जाणवते. ज्यांच्या डोक्यावर विरळ केस आहेत त्यांना कायम आपल्या डोक्यावर कमी केस असल्याची भावना त्रास देत असते. असा हा केसांचा महीमा आहे. प्रत्येक माणसाचे केस वेगवेगळे असतात. म्हणजे कुणाचे केस रेशमासारखे मउ असतात तर कुणाचे कुरळे अगदीच स्प्रिंगप्रमाणे. खरं वैज्ञानिक परिभाषेत सांगायचे झाल्यास केस हा शरीराचा निर्जिव भाग आहे, असे सांगितले तर कोणालाही धक्का बसेल. मात्र वस्तुस्थीती तशीच आहे. केसांच्या मुळापाशी रक्त असते मात्र केसांमध्ये कधीही रक्त नसते. त्यामुळे केस कापले तर त्यातून रक्त येत नाही. केसाला चिमटा काढा, केस कापा, पिळा आपल्याला वेदना ती काय होत नाही. यातून रक्तही येत नाही. याचे कारण म्हणजे केसांतील पेशी या मृत असतात. म्हणूनच आपले केस ताठ उभे राहू शकत नाहीत.

प्रत्येकाला आपले केस काळे व दाट असावेत असे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र काही जणांचे केस पांढरे होतात. केसांचा रंग व वृद्धत्व यांचे काही नाते आहे का. म्हटले तर त्यात थोडे तथ्य आहे. वयाच्या चाळीशीशी नंतर केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढते. केसांना काळा रंग असतो तो केसात असलेल्या काळ्या रंगाच्या मॅलेनिन मुळे. हे मॅलेनिन त्वचेखाली असलेले मॅलॅनोसाईट नावाचे कोष तयार करतात. काही कारणांनी, वयोमानामुळे मॅलॅनोसाईट तयार करणारे हे कोष मृत होतात आणि त्यांचे काम थांबते. अर्थातच नवीन तयार होणाऱ्या केसांना मॅलॅनिनचा पुरवठा होत नाही त्यामुळे केस पांढरे दिसायला सुरूवात होते.

हेही वाचा: कौटुंबिक स्वास्थ हरपलं....घ्या 'या' गोष्टींचा शोध!

२) रोजच्या रोज स्वच्छ आंघोळ केल्यानंतरही का येत असेल बरं घामाचा दुर्गंध? (Why does the smell of sweat come even after taking a clean bath every day)

- घामाचा त्रास सर्वानाच होतो. घामाची दुर्गंधी नकोशी होते. घामाला दुर्गंधी येण्याची अनेक कारणे आहेत. घामामध्ये हवेतील जिवाणू मिसळल्यानेही दुर्गंध निर्माण होतो. परंतु, आपल्या शरीरातील घामाचा दुर्गंध हा फिश ओडर सिंड्रोमचे लक्षण असू शकते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. विशिष्ट प्रकारच्या जनुकातील बदलांमुळे हा परिणाम झालेला असतो. वैद्यकीय भाषेत सांगायचे झाले तर याला ट्रायमिथाइलअमिनुरिया असे म्हटले जाते. ट्रायमिथाइलअमाइन अधिक प्रमाणात स्रवल्यामुळे हा परिणाम दिसून येतो. कोलाइनची मात्रा अधिक असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे टीएमए तयार होतो. सोया, राजमा, अंडी यामध्ये कोलाइनचे प्रमाण चांगले असते. शारीरिक स्वच्छता ठेवल्यानंतरही काही जणांच्या चयापचयाच्या प्रक्रियेतील बिघाडामुळे आणि टीएमएमुळे घामाला दुर्गंध येतो असे संशोधकांचे मत आहे. फिलाडेल्फियातील शास्त्रज्ञांनी याबाबतचे संशोधन केले आहे. ट्रायमिथाइलअमिनुरिया अर्थात टीएमएचा उपचार विशिष्ट चाचणीशिवाय शक्य नाही. एफएमओ ३ या जनुकामध्ये बिघाड झाल्याने ट्रायमिथाइलअमिनुरिया होत असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. टीएमएला स्वतःचा असा तीव्र गंध असतो. परंतु, ट्रायमिथाइलअमिनुरियाचा त्रास असलेल्यांपैकी केवळ १० ते १५ टक्के लोकांच्या घामाला तीव्र दुर्गंध येतो. जनुकातील बदल किंबा बिघाड हा आई-वडिलांकडून मुलांकडे येऊ शकतो. इक्वेडोर आणि न्यू गिनीमधील लोकांमध्ये एफएमओ ३ ही जनुकांतील बदल मोठ्याप्रमाणात असल्याचे संशोधकांना आढळले. ब्रिटिश श्वेतवर्णियांपैकी एक टक्के लोकांमध्येही हा बदल दिसून आल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. जगभरातील बऱ्याच मोठ्या लोकसंख्येमध्ये हे बदल असू शकतात. ट्रायमिथाइलअमिनुरियाचा त्रास आहे का नाही हे तपासण्याचे काम अमेरिकेतील काहीच प्रयोगशाळांमध्ये होते. परंतु, आपल्या शरीराला किंवा घामाला दुर्गंध येऊ नये यासाठी खाण्यापिण्याच्या सवयी बदलणे गरजेचे आहे, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. कोलाइन हे पेशींची वाढ, चयापचय क्रिया आदींसाठी गरजेचे असते. आपल्या यकृतातही ते काही प्रमाणात तयार केले जाते. परंतु, खाद्यपदार्थांतून ते सर्वाधिक प्रमाणात शरीरात येते. याचे प्रमाण बिघडले की दुष्परिणाम दिसून येतात.

हेही वाचा: फुटबॉल विश्वाचे वर्ष २०२१!

३) कोवळ्या उन्हापासून आपल्या शरीरात कसे तयार होते ड जीवनसत्व ?(How does your body get the d vitamin from Sun Rays )

- सूर्य उगवताना तांबूस दिसतो कारण सूर्य आणि आपल्यामध्ये हवेचा थर जाड असतो. त्यातून येताना बाकीचे तरंग इतस्तत: फेकले जातात आणि तांबड्या रंगाच्या लहरीच आपल्यापर्यंत पोचतात. सूर्य वर चढेल तसतसा सूर्य किरणांना पार करायला लागणारा हवेचा थर कमी कमी होत जातो. अधिक तरंगलांबीच्या लहरी आपल्यापर्यंत पोचतात. मग सूर्याचा प्रकाश पांढुरका आणि प्रखर दिसायला लागतो. अशा प्रकाशात अतिनील ब किंवा अल्ट्रा व्हॉयोलेट बी प्रकारच्या तरंगलहरी असतात. त्या ड जीवनसत्त्व तयार करण्यासाठी आवश्यक असतात. कोलेस्टेरॉलपासून ड जीवनसत्त्व बनतं ते आपल्या त्वचेच्या वरच्या स्तरात. जितकी त्वचा सूर्यप्रकाशाला उघडी असेल तितक्या प्रमाणात ड जीवनसत्त्वाचे कच्चे रेणू तयार होतात. हे काम अगदी कोवळ्या उन्हात होऊ शकत नाही. सूर्य साधारण क्षितिजापासून पंचेचाळीस अंश वर आला की, हे काम सुरू होतं. सकाळच्या म्हणजे कोवळ्या नव्हे; पण चटका बसणार्‍याही नव्हे अशा उन्हातच आपलं शरीर ड जीवनसत्त्व बनवू शकतं. २५ ते ३० मिलीग्रॅम प्रती चौरस सेंटिमीटर.

मानवी शरीरात जीवनसत्त्व ड तयार होण्यासाठी कोलेस्टेरॉल कच्चा माल म्हणून लागते. कोलेस्टेरॉलमुळे शरीराला आवश्यक असणारी अनेक विकरे किंवा हार्मोन्स बनतात. त्या शिवाय सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पित्तरस. यकृतात कोलेस्टेरॉलचा वापर करून पित्तरस बनतो. हा पिवळसर हिरवा रंग असणारा पित्तरस लहान आतड्यात अन्न पचविण्याचं काम करतो. आपल्या शरीरात कोलेस्टेरॉल बनलेच नाही तर आपल्याला अनेक शारीरिक क्रिया करताच येणार नाहीत. कोलेस्टेरॉल आपला शत्रू नाही तर जन्माचा जोडीदार आहे. हे कोलेस्टेरॉल सूर्यप्रकाशाच्या मदतीनं त्वचेच्या वरच्या स्तरात ड जीवनसत्त्व तयार करतं, उन्हात जायचं ते त्यासाठी. सूर्यापासून प्रकाश मिळतो त्यात विविध प्रकारच्या प्रकाश लहरी असतात. त्यांपैकी अतिनील ब किंवा अल्ट्राव्हायोलेट प्रकारच्या तरंगलहरी ड जीवनसत्त्व बनण्यासाठी उपयुक्त असतात.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top